महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,14,268

अप्रतिम पुष्करणी व ऐतिहासिक बेल्हे

Views: 3888
7 Min Read

अप्रतिम पुष्करणी व ऐतिहासिक बेल्हे.

श्री. छत्रपती संभाजी राजांनी सोळाव्या शतकात श्रीमंत सरकार नबाब मीर कासीम यांच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील गढीवर स्वारी केली होती.

श्रीमंत सरकार मीर कासीम यांनी बांधलेल्या गढीच्या दक्षिण- पूर्व दिशेला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेली व मध्ययुगात निजामशाहीकडे जाण्यासाठी अतिशय जवळची समजली जाणारी वेस डौलदारपणे उभी असल्याचे दिसत असले तरी वापराविना ती भग्नावस्थेत झाल्याचे दिसते.
या वेसेची उभारणी महसुली कारभाराचे अधिकार क्षेत्र असलेल्या श्रीमंत सरकार नबाब मीर कासीम यांनी निजामशाहीशी जवळीक साधण्यासाठी केली होती. त्याच पद्धतीची एक वेस पश्‍चिम दिशेला आहे. पश्‍चिमेच्या वेसेतुन प्रवेश करून याच निजामशाहीकडील वेशीतून छत्रपती संभाजी राजे गढीवर स्वारी करून बाहेर पडले होते, असा उल्लेख जयपूर येथून प्रसिद्ध होणार्‍या औरंगजेबाच्या द-दरबार-इ-मुअल्ला (जयपूर) या वर्तमानपत्रात 29 डिसेंबर 1684 रोजीच्या अंकात होता. लेखिका कमल गोखले यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या पुस्तकात मराठा-मुघल संघर्षात याबद्दलचा उल्लेख आढळून येतो.
पुढे याच #बेल्हे गावच्या गढीची जहागीरदारी जुन्नरच्या नवाब मिर कासिम यास मिळाली होती. पुढे या नवाबास एक कन्यारत्न झाले व तो पुत्र प्राप्ती पासुन वंचितच राहीला. त्याने आपल्या लाडक्या कन्येचा विवाह गुजरातमधील सुरत गावच्या नवाब आलम खानशी लावून दिला. बेल्हे गावचा नवाब पुढे कालवश झाला व या गढीची जहागिरी सुरतच्या नवाबाकडे गेली.

पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर बेल्हे गाव वसलेले आहे. साधारण पणे १९३० च्या दशकात बेल्हे ग्रामपंचायत व बाजाराची सुरुवात झाली. सुरुवातीला बाजार हा जुन्या आळकुटी रस्त्यावरील टका वस्ती या भागात भरत होता. त्या वेळेचे त्याचे स्वरूप म्हणजे भाजी पाला किराणा सामान, कडधान्य, बाजरी, ज्वारी, गहू, असा सर्व गावरान सकस व रासायनिक खतापासून मुक्त अशा प्रकारची धान्ये मुबलक प्रमाणात मिळत असत. त्या वेळी बाजारात खरेदी विक्री करत असताना वस्तू विनिमय जास्त चालत असे. त्या वेळचे चलन म्हणजे भोकपड्या पैसा, घोडा छाप पैसा तांब्याचे चलन, कथलाचे दोन पैसे, एक आणा, पितळी दोन आणे, चांदीचे चार आणे, आठ आणे, राणी किंवा राजा छाप चांदीचा रुपया अशा प्रकारचे चलन वापरात असे. त्या वेळी बाजारात येणाऱ्या व्यापारी व ग्राहकांची संख्या हि शंभर ते दीडशे च्या घरात असायची. सोळा आण्याच्या रुपया मानला जात असे त्या सोळा आण्याला मनभर म्हणजे चाळीस किलो धान्य मिळत असे. सोळा आण्याला चाळीस अंडी व दीड ते दोन रुपयाला गावरान कोंबडी मिळायची. दोन पैश्यांची केळी संपूर्ण घराला पुरत असत.बाजारात होणारी ये-जा हि पायीच असे. माल वाहतुकीसाठी बैलगाडी व घोडागाडी वापरली जात असे. बाजारात येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पानकोळी समाजाकडून पखाली मार्फत केली जायची. त्या नंतर बाजारातील वर्दळ वाढू लागल्याने व टका येथील जागा कमी पडू लागल्याने १९४० नंतर बाजार हा बेल्हे गावात त्या वेळेचे नबाब ह्यांच्या गढी जवळ व मारुती मंदिराच्या आसपास भरू लागला. परंतु येथेही जागा कमी पडू लागल्याने १९४५ नंतर बेल्हे बाजारचे स्थलांतर आजच्या ठिकाणी म्हणजे गावातून जाणाऱ्या कल्यान – अहमदनगर महामार्गावर लागत असणाऱ्या मोकळ्या ६-७ एकर क्षेत्रावर भरपूर झाडे असणऱ्या ठिकाणी झाले. त्या वेळी बाजारावर ग्रामपंचायत नियंत्रण असायचे. त्या मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून गावात विकास कामांना चालना मिळायची. त्यावेळेपासून सर्व शेतकरी व व्यापारी यांची जागा ठरलेली असायची. त्यात कापड दुकानदार, जुन्या कपड्याचा बाजार, अंडी व कोंबडी बाजार,सुकी मासळी बाजार, मसाले, किराणा समान, धान्याचा भुसार बाजार, चप्पलांचा व चामड्यांचा वस्तू ह्या एका बाजूला असायच्या व भाजीपाला आणि फळ फळावळ इतर गरजेच्या वस्तू ह्या एका बाजूला असायच्या आजही परंपरे नुसार तसेच दृश्य दिसते.

ह्या बाजाराचे वैशिष्ठ्य म्हणजे बैल बाजार हा बाजार एका बाजूला ४-५ एकरात भरत असयचा. ह्या बाजारात जवळपासच्या गावातील बैल व इतर जनावरे विक्री साठी यायची. तसेच प्रामुख्याने पंढरपुरी (खिलारी), गावठी, भडोशी या जातीचे बैल पंढरपूर, सातारा सांगली, इस्लामपूर, मंगळवेढे, कर्नाटकातील बेळगाव व ईंडी या ठिकाणाहून जातिवंत बैल विक्रीसाठी येत असत. या बैलांसाठीचे खरेदीदार हे परजिल्ह्यातून म्हणजे लासलगाव नाशिक, लोणी प्रवरा, जामखेड, टोकावडे, म्हसे, मुरबाड, सरळगाव, यासह इतरही ठिकाणाहून येत असत. पूर्वी आजच्या सारखी वाहतुकीची सोय नसल्याकारणाने जनावरांची वाहतूक हि पायीच केली जायची. १९४० च्या दरम्यान हा बाजार शनिवार पासूनच सुरु होऊन तो मंगळवार दुपारपर्यंत चालू असायचा. येणाऱ्या व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची जेवनाची व्यवस्था अतिशय अल्पदरात सोनाबाई शिंदे, सावित्राबाई बनकर, महादू संभेराव, बबनराव जगताप, रंगनाथ पोपळघट, कासाबाई बांगर यांच्या जेवणाच्या खानावळी होत्या. त्यात प्रामुख्याने मटकी उसळ,
पुरी, असा जेवणाचा बेत असायचा. हे जेवण फक्त काही आण्यात, व चहा दोन पैश्यात मिळत असे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भोवतालच्या तीन विहिरीमधून करण्यात यायची. विहिरीतून पाणी बदलीने ओढून व हंड्याने डोक्यावर घेऊन एक पैशाला तांब्या व एक आण्याला एक हंडा विक्री होत असे. तसेच जनावरांच्या पिण्यासाठी व्यापाऱ्यांना दोन पैशांना हंडा या प्रमाणे विक्री होत असे. तरी देखील एक महिला दिवसभरात साधारणपणे दहा ते बारा रुपयांची कमाई पाणी विक्री करून करत असे.
प्रामुख्याने येथील असलेल्या पुरातन पुष्करणीचा पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असे. आजही ही पुष्करणी अंतिम घटका जरी मोजत असली तरी तीची सुंदरता कायम आहे. जुन्नर तालुक्यातील सर्वात सुंदर पुष्करणी म्हणुन मी तर या ऐतिहासिक वास्तूचा निश्चितच उल्लेख करेल. जवळपास 50×40 फुट लांब रूंदी असलेली ही पुष्करणी पहाताच क्षणी लक्ष वेधून घेते. पुर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूला मध्यभागी पुष्करणीत उतरण्याचे मार्ग असून या पुष्करणीच्या दक्षिण आणि उत्तरेस 3×2 उंची व रूंदिचे 5 -5 मोठे दगडी शिल्पमुर्ती ठेवण्यासाठी कोनाडे आहे तर पुर्व व पश्चिमेस 2 – 2 कोनाडे आहेत. पुष्करणीच्या एकही कोणाड्यात कोणत्याही प्रकारची मुर्ती दिसून येत नाही. त्या मुर्ती त्यानंतरच्या कालखंडात जाणिवपुर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला असावा? असे वाटते. सुंदर अशा मोठ मोठ्या तोडीत पुष्करणीचे सुंदर असे बांधकाम करण्यात आले आहे.

सध्या पुष्करणीचा वापर स्थानिक ग्रामस्थ पोहण्यासाठी करत आहे. ही पुष्करणीचे बांधकाम वेगळ्याच शैलीत असल्याचे दिसून येत असल्याने तीचे संवर्धन करणे खुप गरजेचे आहे. आजपर्यंत मी ज्या पुष्करणी पाहील्या त्यापैकी सर्वात मोठी व सुंदर असलेली ही #पुष्करणी होय. बाँम्बे गॅझिटियर मध्ये ज्या बेल्हे गावातील पुष्करणीचा उल्लेख आढळतो ती हीच पुष्करणी होय. सध्या स्थानिक या पुष्करणीला टक्याची बारव म्हणुन संबोधतात.

या पुष्करणीचे संवर्धन होणे गरजेचे असल्याने अनेक संस्थानी पुढाकार घेऊन या ऐतिहासिक ठेव्यास पुनरर्जिवित करने गरजेचे आहे यासाठी प्रयत्न केले जावेत हीच सदिच्छा.
बेल्हे ग्रामस्थ श्री. सुधाकरजी सैद यांच्या सोबतीत या पुष्करणीस भेट देण्याचा योग आला व त्यांच्याकडून स्थानिक पातळीवरील माहीती संघटीत करून ती आपल्यासमोर मांडता आली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

माहिती साभार – निसर्गरम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज आणि वेबसाईट

श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)

Leave a Comment