महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,073

पुत्रवल्लभा | कोरवलीच्या सुरसुंदरी

By Discover Maharashtra Views: 1317 2 Min Read

पुत्रवल्लभा –

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र ५ –

कोरवली येथील सुरसुंदरींच्या समूहांमध्ये मनमोहक आणि चित्तास वेड लावणाऱ्या ज्या तारुण्यसुलभ यौवना आहेत. त्यामध्ये पुत्र वल्लभा ही वेगळ्या पद्धतीची अशी सुरसुंदरी आहे. शिल्पप्रकाश या ग्रंथात अशा पद्धतीच्या अप्सरांचा उल्लेख मात्र मूर्ती म्हणून केला जातो.क्षीर्णाणव या ग्रंथांमध्ये हिला पुत्रवल्लभा असे नाव  आहे. अशा पद्धतीच्या मूर्ती कलाकारांना मंदिरावर स्थित करण्यास फार आवडत असाव्यात असे दिसते.

जिथे जिथे सुरसुंदरी आढळतात त्या अनेक मंदिरांवर महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर या पद्धतीचे कोरीव शिल्प पहावयास मिळते. पाहताक्षणी ही  सुरसुंदरी पाहणाऱ्याच्या नजरेत भरते.इतर सुरसुंदरी प्रमाणेच हि प्रभाव टाकणारी मातृमूर्ती आहे. हिच्या मस्तकाच्या पाठीशी प्रभावळ असल्यामुळे तिच्या मुखावर विलक्षण तेज चढलेले आहे. देहुडा अवस्थेत तरीही त्रिभांगा स्थितीत उभी असणारी ही पुत्रवल्लभा आपल्या करामध्ये आपल्या सानुल्या बाळास घट्ट पकडून उभी आहे. बाळास खेळवणारी किंवा रिझवणारी अशी ही माता आहे. म्हणूनच तिने आपल्या  डोक्याशी उचललेल्या उजव्या करकमलामध्ये फळाची किंवा फुलाची एक डहाळी पकडलेली आहे.

ज्याप्रमाणे लहान मुलांना खेळण्यासाठी खुळखुळा असतो, तशीच ही फुलांची व पानांची डहाळी आहे. डाव्या बाजूस घट्ट पकडलेली तिचे बाळ हात उचलून त्या डहाळीस पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या पुत्राची चाललेली ही धडपड अर्थात बाळलीला कौतुकाने पाहण्यासाठी तिने आपली मान थोडीशी डावीकडे झुकलेली आहे. नजर बाळावरी खिळलेली आहे. मातृ मूर्ती असल्याने कलाकारांनी तशी लक्षणे ही च्या मार्फत अबोलपणे सांगितली आहे. हीच्या हातातील मनगट्या अशी  आणि दंडाशी घट्ट बसलेल्या अलंकार तिच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देणारी आहेत.

वयाला साजेशी केशरचना व कर्णभूषणे आहेत. गळ्यामध्ये घातलेले दोन्ही अलंकार उठावदार आहेत. त्यामध्ये स्तनहार थोडा खंडीत झाला असला तरीही त्याची शोभा अवर्णनीय आहे.कटिसूत्र,उरूद्दाम आणि मुक्तदाम यामुळे ह्या शिल्पास उठाव आलेला आहे. देहुढा अवस्थेतील पायावर घसरत खाली आलेला वस्त्राचा सोगा कलाकाराने कल्पकतेने दाखवलेला आहे.पादवलय आणि पादजालक मुळे तिची दोन्ही चरणकमल लक्षवेधक आहेत. एकूणच ठसठशीत अंग बांधायची किंचित वाटणारी तरीही हालचालींमध्ये मोहकता असणारी ही मातृमूर्ती खूप वेगळी वाटते.

कितीही आकर्षक रीतीने ती उभी असली तरीही आपल्या तान्हुल्यास मात्र तिने   काळजीने डाव्या हातावर घेतलेले आहे. डोळ्यातून तिचे वात्सल्य ओसांडताना दिसते. मंदिरा मध्ये येणाऱ्या भक्तगणांना हि मातृत्वाचा संदेश देत आहे असे वाटते

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a Comment