महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,52,864

स्वराज्यद्रोही काझी हैदर, अस्सल मुघल अखबारांमधून

By Discover Maharashtra Views: 1609 5 Min Read

स्वराज्यद्रोही काझी हैदर, अस्सल मुघल अखबारांमधून –

काझी हैदर विषयी श्री नागेश सावंत Nagesh Sawant  यांनी मागे एक पोस्ट लिहिली होती. ती येथे वाचता येईल :- वकील काझी हैदर.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सगळे मिळून जे बारा मुसलमान नोकरीला होते त्यातला काझी हैदर हा दुसऱ्या गटातला, म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्या मुसलमानांना तांत्रिक कारणांसाठी नोकरीवर ठेवले होते त्या गटातला मुसलमान होता.(स्वराज्यद्रोही काझी हैदर) छत्रपती शिवाजी महाराजांकडे नोकरीला असलेले  इतर मुसलमान कोण होते हे जाणून घेण्यासाठी माझा हा लेख पाहावा – शिवाजी महाराजांच्या सेवेत मुस्लीम.

काझी हैदर हा शिवाजी महाराजांच्या पदरी पारसनवीस, म्हणजे फार्सी पत्रव्यवहार करण्यासाठी घेतलेला मुन्शी होता. सुरवातीच्या काळात फार्सी पत्रव्यवहाराचा मराठी लोकांना फारसा अनुभव नसल्याने या काझी हैदरला फार्सी पत्रव्यवहार करणारा मुन्शी म्हणून नोकरीवर ठेवलेले होते. पुढे नील प्रभू हा हिंदू मनुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदरी पारसनवीस म्हणून नोकरीवर होते. पुढे या नीलप्रभूचा मुलगा गोविंदप्रभू हा देखील पारसनवीस म्हणून छत्रपती संभाजी महाराजांकडे नोकरीला होता. त्याने लिहिलेला दुर्ज-अल गवाहिर ( रत्नांचा करंडा ) हा फार्सी पत्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे.

हा काझी हैदर १६८३ साली स्वराज्य सोडून औरंगजेबाला जाऊन मिळाला. औरंगजेबाचा दरबारी इतिहास असलेल्या मआसिर ए आलमगिरी या ग्रंथात तो औरंगजेबाला येऊन मिळाल्याची नोंद पुढील प्रमाणे आहे

*फार्सी*
काझी हैदर मुन्शी ए सिवा ब-इरादत ए बंदगी रक्मे दौलत
बर नासीए ताले कशीद

*मराठी*
सिवाचा (छत्रपती शिवाजी महाराजांचा) मुन्शी काझी हैदर बादशाहकडे सेवेच्या इच्छेने आला.

~ संदर्भ, मआसिर ए आलमगिरी, मूळ फार्सी, पृ.२३४

औरंगेजेबाला येऊन मिळाल्यावर या काझी हैदरने जे स्वराज्यविरोधी उद्योग केले त्याचे तपशील मुघल अखबारांमध्ये मिळतात. ते अखबार पुढील प्रमाणे आहेत –

*अखबार क्रमांक १*
जुलूस २८, मोहरम ५ ( २ डिसेंबर १६८३ )

*फार्सी*
काज़ी हैदर अर्ज नमूद कि मुहम्मद हुसैन क़ाज़ी चौल खती नविश्ता कि दर मुल्क-इ ग़नीम गिरानी बिसयार शुदा। चुनाँचि अज़ बंदर सूरत वगैरा बंदर ब-अहमदाबाद रसद गला व सर्ब व बारूत ब-मकहुर मी-रसद. अगर सैद  लुतफुल्ला गुजराती कि मनसब दो सद पंजाही ज़ात पंजा सवार दर हुजूर अस्त वाक़िफ़-इ हाल इन सरजमीन अस्त ताईन शुद व ता रसद गला बंद नुमायद व  अनक़रीब मकहुर अजेज़ शुद. हुक्म शूद ऊ रा ब-नज़र ब-गुजरानन्द।

*मराठी*
काझी हैदरने अर्ज केला तो असा – चेऊलचा काझी मुहम्मद हुसैन याने मला पत्र लिहिले आहे की, शत्रूच्या ( म्हणजे मराठ्यांच्या ) प्रांतात महागाई खूप आहे. पण सुरत व इतर बंदरे आणि अहमदाबाद वगैरे ठिकाणे येथून शत्रूस अन्नधान्याची रसद, शिसे, दारू वगैरे पोहचत आहे, हुजूर असलेला आणि २५० जात व ५० स्वार असा मनसबदार सय्यिद लुत्फुल्लाह  गुजराती इकडील भागाशी परिचीत आहे. त्यास इकडे नेमले तर रसद जाते ती तो बंद करील व शत्रू (म्हणजे मराठे) त्रासून जाईल. (बादशाहाचा) हुकूम झाला की, त्यास (म्हणजे अर्जास) नजरेखालून घालावे.

*अखबार क्रमांक २*
जुलूस २८, मोहरम ६ ( ३ डिसेंबर १६८४ )

*फार्सी*
अर्जदाश्त आतिशखान बराये दीदन किला कोथलागड ब-तसर्रुफ़ पादशाही आमदा अस्त। ब-नजर गुज़ाश्त मअरुज दाश्ता बूद।  तौरे कि क़ाज़ी हैदर तारीफ़ इन किला ब-अर्ज रसानीद हमान तौर अस्त चुनाँचि अज़ आमदन इन किला तमाम तल कोकन दर तसर्रुफ़-इ-दौलत-इ काहिरा ख़्वाहद आमद।  बाद मताली अज़ रुए महरबानी काज़ी हैदर रा ख़िताब खानी व दह हजार रुपिया इनाम म-रहमत नमुदा। दो हजारी ज़ात पानसद सवार बूद पांसदी ज़ात इजाफे फरमूदंद।

*मराठी*
बादशाही अमलाखाली आलेला कोथळागड पाहण्यासाठी आतिशखानाचा अर्ज आला. तो नजरेखाली घातला. त्यात ‘काझी हैदरने वर्णिल्याप्रमाणे खरोखरच तो किल्ला आहे. तो हाती आल्यामुळे संबंध तळकोकणच बादशाही अमलाखाली येईल’  असे होते. यावर काझी हैदरवर कृपा करून त्याला खानाची पदवी आणि दहा हजार रुपये बक्षिसी दिली. तो दोन हजार जात व पांचशे स्वारांचा मनसबदार होता. त्यांत पांचशे जातीची वाढ फर्माविली.

हे दोन्ही मूळ अखबार बिकानेरच्या पुरालेखागारात आहेत. त्याची छायाचित्र या पोस्ट सोबत जोडलेली आहेत.

संदर्भ –
१) मआसिर ए आलमगिरी, साकी मुस्तैदखान, मूळ फार्सी
२) ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६, श्री ग.ह.खरे
३) बिकानेर पुरालेखागार येथील फार्सी अखबार

सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

Leave a Comment