रहाळकर राम मंदिर –
नागनाथपारावरून शनिपाराकडे जाताना डाव्या हाताला श्रीरामतीर्थ या इमारतीमध्ये एक राम मंदिर आहे. तेच रहाळकर यांचे श्री पट्टाभिषिक्त राम मंदिर. या मंदिराच्या नावाची पाटी वेलींनी झाकली गेल्यामुळे हे मंदिर लवकर लक्षात येत नाही. हे मंदिर सुमारे १८३ वर्ष जुने आहे.
या राम मंदिरात श्रीरामाची सिंहासनाधिष्टीत पंचायतन मूर्ती बघावयास मिळते. श्रीराम कार्याचा व स्थळांचा ऐतिहासिक अभ्यास केलेले कै• श्री अमरेंद्र गाडगीळ यांनी ही मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असल्याचे सांगितले. प्राचीन ग्रंथांमध्ये रामरायाच्या अभिषेकाचे जे वर्णन आहे तशी हि मूर्ती आहे, म्हणून त्याला पट्टाभिषिक्त श्रीरामपंचायतन म्हटले जाते. सिंहासनावर बसलेले श्रीराम-सीता डावीकडे शत्रुघ्न व उजवीकडे लक्ष्मण व भरत आहेत. तसेच भालदार-चोपदार, नल-नील, जाम्बूवान, सुग्रीवादी आहेत. एकाच संगमरवरी दगडात हे सर्व कोरुन शिल्पकाराने ही किमया केली आहे.
या मंदिरातील रामपंचायतन मूर्ती काही कारणामुळे काकिर्डे सराफांकडे गहाण म्हणून ठेवली होती. ती विकण्याचा मानस त्यांनी प्रकट करताच, श्री गणेशराम बाबा रहाळकर रामदासी यांनी ती पाहिली व त्यांचे मनात ती मूर्ती भरली. परंतु द्रव्याभावी ती त्यांना विकत घेता आली नाही व खिन्न मनाने ते घरी परतले. काही दिवसांनी श्री काकिर्डे सराफ यांना पोटशूळ झाला. त्यांनी बरेच उपाय केले पण कशानेही त्यांना बरे वाटेना. एक दिवस पहाटे स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला की, सदर मूर्ती गणेशराम बाबा रहाळकर रामदासी यांचेकडे पोचवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर श्री काकिर्डे सराफ यांनी सदर मूर्ती सवाद्य मिरवणूक काढून पालखीतून श्री गणेशराम बाबा रहाळकर यांचे घरी विनामूल्य पोचविली. त्यानंतर काकिर्डे सराफ यांचा पोटशूळ कमी झाला.
थोड्या दिवसांनी गणेशराम बाबा रामदासी यांनी या वास्तुत भव्य मंदिर बांधून रंगपचमी फाल्गुन व ५ शके १७६० मार्च सन १८३८ या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. समर्थ संप्रदायानुसार येथे मूर्तीची उपासना गेली १८३ वर्षे चालू आहे. मंदिराचा सभामंडप फारच जुना झाल्यामुळे नवीन सभामंडप सन १९९९ साली सध्याच्या मालकांनी बांधला व रंगपंचमी शके १९२२ दि.२५ मार्च २००० यादिवशी श्रीरामचरणी समर्पण केला.
गुढीपाडव्यापासून रामनवमी पर्यंत इथे रामाचे नवरात्र असते. आवर्जून सांगावे असे इथले १ वैशिष्ट्य म्हणजे, रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीला कौसल्येचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून एखाद्या गरोदर स्त्रीला बोलावून तीचे यथोचित डोहाळे जेवण केले जाते. ही पध्दत् इतरत्र कुठेही बघायला मिळत नाही. डोहाळे जेवण व श्री रामजन्माचा सोहळा बघण्यासारखा असतो. गेली १८३ वर्षे रामसेवेची हि परंपरा रहाळकर कुटुंबियांकडून अविरत चालू आहे.
संदर्भ :
रहाळकर परिवार
फोटो २,४,६ : सौ. जान्हवी पाटणकर
पत्ता :
https://goo.gl/maps/KApB5LJYo63YJSDX6
© आठवणी इतिहासाच्या