राजापूर | Rajapur –
मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं रम्य गाववजा शहर आहे. राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर शहरापासून तीन-साडेतीन किलोमीटरवर उन्हाळे नावाचं गाव लागतं. तिथे दर तीन वर्षांनी गंगा प्रकटते. गंगावतरण झाल्यावर महाराष्ट्र तसंच गोव्यातीलही दूरदूरच्या ठिकाणांवरून भाविक तिथं येतात.
जिऑलॉजिकल सर्व्हे विभागातील इंग्रजकालीन अधिकारी सी. जे. विल्किन्सन याने कोकणातील भूगर्भरचनेबाबत अभ्यास केला होता. त्याच्या अभ्यासाधारे रत्नागिरीच्या गॅझेटमध्ये राजापूरच्या गंगेबाबत उल्लेख आढळतो. ते पाणी भूगर्भातील हालचालींमुळे सायफन प्रणालीने प्रवाहित होत असावे, असे त्यात म्हटले आहे. मेदिनी पुराणातही त्याचा उल्लेख आहे. स्थानिक दंतकथेनुसार, गंगाजी साळुंके नावाचा कुणबी दरवर्षी पंढरपूरला जात असे. वयोमानानुसार त्याला जाणे जमेनासे झाले, त्यावेळी शेतात काम करताना तो रडू लागला. तेव्हा त्याची आयुष्यभरची सेवा पाहून शेतातल्या एका वटवृक्षाजवळ प्रत्यक्ष गंगा प्रकटली. दंतकथेचा उल्लेखही गॅझेटियरमध्ये आहे.
गंगेचे झरे ३१५० चौरस यार्ड परिसरात आहेत. तेथे मुख्य काशिकुंडासह दगडाने बांधलेली एकूण चौदा कुंडे आहेत. सर्व कुंडांतून पाणी वाहू लागले, की ‘गंगा आली’ असे म्हणतात. गंगेच्या जवळ उन्हाळे येथे गरम पाण्याचे झरे आहेत. त्या ठिकाणी स्नान करून नंतर गंगास्नानाची परंपरा होती; तसेच, गंगास्नानानंतर तीन-साडेतीन मैलांवरच्या धूतपापेश्वराला गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याचाही प्रघात होता. गंगेचे पाणी नेऊन आपल्या देवघरात पूजण्याचीही पद्धत आहे.
कविवर्य मोरोपंत १७८९ मध्ये गंगास्नानासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सव्वीस कडव्यांचे ‘गंगाप्रतिनिधीतीर्थ’ नावाचे गीती वृत्तातील काव्य लिहिले. डॉ. हेराल्ड एच. मान आणि एस.आर. परांजपे यांनी ‘इंटरमिटंट स्प्रिंग्ज अॅट राजापूर इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी’ नावाचा प्रबंध तयार केला होता. ते दोन्ही उल्लेख ‘राजापूरची गंगा’ या पुस्तकात आहेत.
गंगा येण्याची घटना १३९४ च्या सुमारास सुरू झाली असावी असा अंदाज आहे. मात्र तशा नोंदी आढळत नाहीत. शिवाजी महाराजांनी दोनदा गंगास्नान केल्याचा उल्लेख आहे. इंग्रजांची राजापूर येथील वखार १६६१ साली लुटल्यावर शिवाजी महाराजांनी गंगास्नान केले होते. तसेच, १६६४ मध्ये गागाभट्टांनी तेथे घेतलेल्या ब्राह्मण सभेच्या वेळीही महाराज गंगास्नानाला आले होते. गंगा उन्हाळ्यात आली तर पाऊस त्यावर्षी काहीसा पुढे जातो असा अनुभव आहे.
Manoj V Kamble