महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,30,064

कबरीतून अकबराची हाडे काढून जाळणारा योद्धा

By Discover Maharashtra Views: 1958 3 Min Read

कबरीतून अकबराची हाडे काढून जाळणारा योद्धा | राजाराम जाट –

४ मार्च १७७२, मराठ्यांनी पानिपतचा प्रतिशोध म्हणून नजीबखानाची कबर उद्ध्वस्त केली, हे तुम्ही ऐकले असेल  वा वाचले असेल. मात्र या घटनेच्या ८४ वर्षे आधी कोणीतरी अकबराची कबरही उद्ध्वस्त करून त्याचे हाडे जाळल्याचे तुम्हाला माहीत आहे का? इ. स.१६०५ साली  अबूल फतेह जलालूद्दीन मुहम्मद अकबर याचा आग्रा येथे  मृत्यू झाला. आग्र्याजवळ शिकंदरा येथे त्याची कबर बांधली गेली. मात्र १६०५ च्या ८३ वर्षांनंतर त्याची कबर पुन्हा उकरून त्याची हाडं जाळून टाकणारा एक योद्धा होता. त्या योद्ध्याचं नाव होतं राजाराम जाट!

इ. स. १६८५ मध्ये औरंगजेब दक्षिणेत चालून आला. प्रचंड फौज, शस्त्रसाठा आणि युद्धसामुग्रीसह त्याने दख्खनवर स्वारी केली. ह्याच वेळेचा फायदा घेऊन सिंसानी ह्या खेडेगावाच्या जमीनदाराने, रामचंद्र जाटाने अनेक जाटांना एकत्र करून त्यांना युद्धशिक्षण दिले आणि स्वतःची जणू एक सेना उभारली, लहान लहान गढ्यांना मजबूती दिली.  जाटांच्या ह्या बडांला  आणि त्यांच्या अनिर्बंध हालचालींना आग्र्याच्या सुभेदाराला आळा घालता आला नाही. जाटांनी रस्ते बंद केले, खेडे लुटली आणि आधारखान नावाच्या प्रसिद्ध तुराणी योद्ध्याला ठार मारले. ह्याा उदव्यापाला आळा घालण्यासाठी औरंगजेबाने खानजहान कोकलताश, आपला नातू बेदारबख्त यांसारख्या सरदारांना पाठविले. मात्र अपयश मिळविण्याशिवाय यांना या कामगिरीत काहीही मिळवता आले नाही.

इ. स. १६८८ मध्ये राजाराम जाटाने हैदराबादचा  मीर इब्राहीम उर्फ महाबत  हा पंजाबच्या सुभेदारीवर जात असतांना त्याच्यावर हल्ला केला आणि लगेचच सिकंदरा येथील बादशहा अकबराची कबर लुटली आणि अकबराची हाडे ओढून काढली आणि रागाने विस्तवात फेकून दिली. तेथील गालीचे, सोने-चांदीची भांडी वगैरे जिन्नस बरोबर नेले.

या घटनेचा उल्लेख निकोलाओ मनूची आणि ईश्वरदास नागर करतात. मनूची आपल्या स्टोरीओ डी मोगोर ह्याा ग्रंथात म्हणतो, “कबरीच्या इमारतीला ब्रॅाझचे जे मोठे दरवाजे होते ते मोडून त्यांनी आपल्या लुटालुटीस सुरुवात केली.. तेथे असलेले अतिशय मौल्यवान दगड आणि सोने आणि चांदी यांचे पत्र  त्यांनी चोरले . त्यांना नेता येणे जे शक्य नव्हते त्याचा त्यांनी नाश केला. . अकबराची हाडे त्यांनी ओढून काढली आणि रागारागाने विस्तवात फेकून जाळून टाकली.” ईश्वरदास आपल्या फुतूहात-इ-आलमगिरी यात म्हणतो,”Through the reports of Akbarabad, it was brought to the notice of Emperor that the accursed rebel had appeared at Sikandra plundered the tomb of Hazarat Ashani (Akbar) situated there and had taken away all its carpets, gold and silver had damaged its building also.” यामुळे तेथील नायब सुभेदाराची, मुहम्मद बाका याची मनसब बादशहाने कमी केली.

अकबर बादशहाची हाडे उकरून जाळणाऱ्या हा राजाराम जाट पुढे लवकरच ४ जुलै १६८८ रोजी युद्धात गोळी लागून ठार झाला.

संदर्भ –
औरंगजेबाचा इतिहास-जदुनाथ सरकार (मराठी अनुवाद)
स्टोरीओ डी मोगोर – निकोलाओ मनूची  (इंग्रजी अनुवाद)
फुतुहात इ आलमगीरी – ईश्वरदास नागर (इंग्रजी अनुवाद)

©अनिकेत वाणी

Leave a Comment