महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,59,428

छत्रपती राजाराम महाराज व जानकीबाई विवाह | 15 मार्च 1680

By Discover Maharashtra Views: 3396 4 Min Read

छत्रपती राजाराम महाराज व जानकीबाई विवाह | 15 मार्च 1680 –

प्रतापराव गुजर यांनी स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करले. त्यांची स्मृती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 15 मार्च 1680 मधे प्रतापराव गुजरांच्या कन्या जानकीबाई यांचा विवाह छत्रपती राजाराम महाराजांशी लावून दिला व स्नुषा म्हणून जानकीबाई यांना रायगडावर आणले.छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रथम पत्नी म्हणजे जानकीबाई राणीसाहेब. सेनापती प्रतापराव गुजर यांच्या त्या कन्या .या घराण्याने  छत्रपती शिवाजी राजांसाठी आपले प्राण पणाला लावलें. महाराजांची खूप सेवा केली या ऋणातून थोडेसे उतराई होण्यासाठी शिवरायांनी आपले धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांचे बरोबर जानकीबाई यांचा विवाह केला मात्र या विवाहाला छत्रपती संभाजी महाराज व येसूबाई राणीसाहेब यांना बोलावले गेले नव्हते. हे दोघे पती पत्नी पन्हाळगडावर विवाहाच्या आमंत्रणाची वाट पहात राहिले होते.परंतु रायगडावरील कट कारस्थानामुळे शंभूराजेंना विवाहाला बोलावले गेले नाही.

प्रतापराव गुजर म्हणजे शिवछत्रपतींचा निधड्या  छातीचा शूर सेनानी. महाराजांचे बोल मनाशी लावून बेहेलोल खानावर बेफान होऊन तुटून पडले आणि हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी धारातिर्थी  आत्मसमर्पण केले.अशा असामान्य सेनापतीच्या इमानाचे व प्राणाचे मोल समजणारे शिवछत्रपती होते. प्रतापराव गुजरांच्या हिंदवी स्वराज्यातील ऋणातून अंशतः मुक्त होण्यासाठी त्यांची कन्या आपल्या धाकट्या पुत्रास करून ,त्यांना स्नुषा म्हणून रायगडावरील राजप्रासादात शिवरायांनी मोठ्या सन्मानाने  आणले.

दशरथाचा पुत्र राजाराम यांची जशी जानकी ,तशी याही राजारामाची ही जानकी असे समजून महाराजांनी त्या आवडत्या स्नुषेचे नाव “सौभाग्यवती जानकीबाई”असे ठेवले. महाराजांना काय माहीत की नियतीने त्यांच्या जानकीच्या भाळी काय लिहून ठेवले आहे?

अनेक घडामोडींनी पुरेपुर भरलेल्या शिवछत्रपतींच्या  आयुष्यात पार पडलेले  शेवटचे कार्य म्हणजे आपल्या धाकट्या पुत्राचा प्रतापराव गुजर यांची कन्या जानकी बाईंशी रायगडावर  घडवून आणलेला विवाह .हा विवाह  समारंभ महाराजांनी मोठ्या थाटामाटात रायगडावर लावून दिला.त्यावेळी शिवाजी महाराजांनी खुप दानधर्म केला असा ऊल्लेख सभासद बखरीत आढळून येतो. मराठ्यांच्या इतिहासात राणी जानकी बाईंचे  दोन उल्लेख फक्त आढळतात.  पहिला म्हणजे  त्यांच्या लग्नाचा आणि दुसरा त्यांच्या मृत्यूचा.संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसूबाई राणी साहेब ,शाहूराजे व इतर राजपरिवारातील मंडळी यांना औरंगजेबाने कैद करून आपल्या छावणीत नेले. त्यावेळी जानकीबाई राणीसाहेब रायगडावर होत्या.  यांच्याबरोबर शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई राणीसाहेब यांनाही मोगलांनी कैद करून  नेले.जानकीबाई या इतिहासातील खरोखरच एक दुर्दैवी स्त्री ठरल्या. हिंदवी स्वराज्याचे पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर यांची कन्या, शिवछत्रपतींची स्नुषा म्हणून रायगडावरील राजप्रासादात जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी आपल्या भावी जीवनाची कितीतरी रम्य स्वप्ने रंगवली असतील !

रायगडाच्या  पाडावाने  ही स्वप्ने तर ढासळीच, शिवाय नशिबी तीस वर्षाची प्रदीर्घ  कैद आली!अशी कैद शिवछत्रपतींची  दुसरी स्नूषा येसूबाई राणीसाहेब यांच्याही  नशिबी आली हे खरे ,पण आपला पुत्र मराठ्यांचा राजा बनल्याचे पाहण्याचे  भाग्य येसूबाईंना मिळाले.मोगली कैदेत  अनंत यातना भोगल्या तरी आयुष्याच्या अखेरीस आपला भाग्योदय येसूबाईंना पाहता आला .पण या जानकी बाईंसाहेबांचे काय ?मोगली आक्रमणाच्या रुपाने हिंदी स्वराज्यावर कोसळलेल्या भयानक संकटाची एक मूक साक्षीदार म्हणूनच जानकीबाई राहिल्या. जानकीबाई जेवढ्या दुर्दैवी तेवढ्यात उपेक्षित… इतक्या की बिचार्या  केव्हा कालाधीन झाल्या हे सुद्धा इतिहासाला ज्ञात नाही .शिवाजी महाराजांना काय माहित की नियतीने या जानकीबाईंच्या  भाळी काय  लिहून ठेवले होते. पौराणिक काळात  जानकीस  14 वर्षाचा वनवास भोगावा लागला,  परंतु या राजाराम पत्नी जानकीबाई यांच्या आयुष्यात दुप्पट म्हणजे 28 वर्षाहून अधिक काळ वनवासाच्या अग्निदिव्यातून जावे लागले .

छत्रपती राजाराम महाराजांच्या खास मर्जीतला त्यांचा सेवक गिरजोजी यादव व त्यांचे बंधू अर्जोजी यादव यांच्यामध्ये झालेल्या कराडच्या देशमुखीच्या विभाजन पत्रात जानकीबाई संबंधी महत्त्वाचा मजकूर आढळून येतो. सन १६८९ साली  रायगडास जुल्फिकारखानाचा वेढा बसल्यानंतर छत्रपती  राजाराम महाराज गडावरून निसटून प्रतापगडावर आले आणि तेथून त्यांनी राणी जानकीबाई व शाहू राजे यांना आणण्यासाठी आपला सेवक गिरजोजी यादव यांना पाठविल्याचा महत्त्वाचा मजकूर आढळून येतो.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

1 Comment