छत्रपती राजाराम महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक दिन –
६ मे १९२२ रोजी कोल्हापूरचे पंचप्राण राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे देहावसान झाले. केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. आता छत्रपतींच्या गादीवर युवराज राजाराम महाराजांचा राज्याभिषेक होणार होता मात्र जनतेचे लक्ष एका वेगळ्याच कारणाने त्यांच्याकडे लागले होते. राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीने होणार याबद्दल शंकाच नव्हती मात्र राज्याभिषेकाचे पौरोहित्य ब्राह्मण पुरोहीत करणार कि छत्रपती शाहू महाराजांनी स्थापिलेले मराठा पुरोहीत करणार, याबद्दल रयतेमध्ये कुतुहल होते. मात्र एवढ्या दुःखातही राजाराम महाराजांनी आपली निस्सिम तत्त्वनिष्ठा सोडली नाही. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक मराठा पुरोहितांकडूनच करवून घेण्याचे ठरविले.(छत्रपती राजाराम महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक)
दि. ३१ मे १९२२ रोजी श्रीमत् क्षात्रजगदगुरुंच्या नेतृत्वाखाली श्री शिवाजी वैदिक विद्यालयाच्या मराठा पुरोहितांनी वेदोक्त पद्धतीने महाराजांचा राज्याभिषेक केला. क्षत्रिय पुरोहितांकडून झालेला हा भारतातील पहिलाच राज्याभिषेक होता. मराठा पुरोहितांकडूनच राज्याभिषेक करवून घेण्याचा राजाराम महाराजांचा निर्णय हा त्यांचा वडिलांच्या तत्वांशी व विचारांशी बांधिलकी जपणारा तर होताच शिवाय शाहू महाराजांनी सुरु केलेली लोकोद्धाराची अनेक कार्ये त्यांच्या नंतरही त्याच ताकदीने सुरु राहतील याबद्दल रयतेला आश्वासित करणारा होता.
या राज्याभिषेक समारंभानंतर ‘श्रीमद्युवराज राजाराम छत्रपति’ यांनी ‘श्रीमत् क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर श्रीमन्महाराज राजाराम छत्रपति हिंदूपद-पातशहा’ अशी छत्रपतींची वंशपरंपरागत बिरुदावली धारण केली. महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्यास करवीर राज्याचे सर्व इनामदार, सरदार व जहागिरदार तसेच इंदूर, देवास, मुधोळ, रामदुर्ग, सावंतवाडी, सांगली, कुरुंदवाड, मिरज, अक्कलकोट वगैरे संस्थानांचे संस्थानिक उपस्थित होते.
KarvirRiyasatFB