स्वराज्याचे तिसरे छत्रपती ‘राजाराम महाराज’
त्यांचे सिंहगडावरील समाधी स्मारक –
‘बाळ पालथे जन्माला आले, पातशाही पालथी घालेल’ असेल उद्गार शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजेंच्या जन्मावेळी काढले होते. राजगडावर २४ फेब्रुवारी १६७० मध्ये त्यांचा जन्म झाला.
संभाजी महाराज यांचे निधन झाले, तेव्हा ते विशीत होते. रायगडावर औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने वेढा घातला. गडावर राजघराण्यातील मंडळी होती. महाराणी येसूबाई, पुत्र शिवाजी (शाहू), तसेच राजाराम राजे गडावर होते. वेढा पडताच, येसूबाई यांनी राजाराम राजेंना वाघ दरवाजा मार्गे बाहेर पडायला सांगितले.
राजारामराजे रायगड सोडून आधी प्रतापगड मग पन्हाळा आणि शेवटी जिंजी इथे पोहोचले. सोबत रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी, शंकराजी सचिव आदी मंडळी होती. औरंगजेब एक-एक किल्ले घेत होता. नोव्हेंबर १६८९ मध्ये अखेर रायगड पडला. येसूबाई आणि शाहू कैदी झाले.
झुल्फिकारखानाने राजाराम राजेंच्या पाठलाग केला. जिंजीला वेढा पडला. हा वेढा थोडा थोडका नव्हे तर तब्बल ८ वर्ष चालू होता. शेवटी १६९८ मध्ये राजारामराजे तिकडून निसटले आणि प्रतापगडावर आले. मध्यंतरी संताजी-धनाजी तल्या पराक्रमी संताजी घोरपडे यांचे निधन झाले. राजारामराजेंनी अनेक वेळा मोगली फौजेवर हल्ले केले.
परंतु दुर्दैवाने ०३ मार्च १७०० मध्ये त्यांचे सिंहगडावर निधन झाले. स्वराज्याचे तिसरे छत्रपती निद्रस्त झाले. त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी वृंदावन आणि छत्रीवजा समाधी बांधली. समाधीची व्यवस्था पुढे चोख राखली गेली.
टिळक बंगल्यावरुन सरळ गेल्यावर गडाच्या कडेला ही समाधी आहे. राजस्थानी शैलीत याची रचना आहे. विशेष म्हणजे समाधीच्या मागील बाजूस गंडभेरूंड शिल्प आहे.
– वारसा प्रसारक मंडळी
फोटो – श्री कला.