राजस सुकूमार असा विठ्ठल –
तुकाराम महाराजांनी “राजस सुकुमार मदनाचा पुतळा” अशी ओळ ज्याच्याकडे पाहूनच लिहिली असावी अशी ही सुंदर विठ्ठल मुर्ती. सिंधुरवदन गणेशामुळे सर्व परिचित असलेल्या खाम नदीकाठच्या शेंदूरवादा (ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) या गावात एका छोट्या लाकडी माळवदाच्या वाडा वजा मंदिरात राजस सुकूमार मुर्ती ठेवलेली आहे. शिवकालीन संत मध्वमुनीश्वरांचे हे ठिकाण. इथे त्यांची समाधी आहे. जहागीरदार कुटूंबियांनी मध्वमुनीश्वरांचा आश्रम नक्षीदार कमानी दगडी ओवर्याी असा भव्य बांधुन काढला आहे.
मध्वमुनीश्वर नियमित पंढरपुरची वारी करायचे. शरिर थकल्यावर त्यांनी विठ्ठलाला पत्र लिहिलं आणि येणं शक्य नाही असं म्हणत इथूनच नमस्कार केला. मग विठ्ठलाने त्यांना दृष्टांत देवून मीच तूझ्याकडे येतो असं सांगितले. तीच ही विठ्ठल मुर्ती. दरवर्षी मध्वमुनीश्वरांचा उत्सव साजरा होतो तेंव्हा ही मुर्ती मिरवणुकीने मध्वमुशीश्वर आश्रमात नेली जाते.
समचरण कर कटीवर ठेवलेले अशी ही काळ्या पाषाणातील देखणी मुर्ती. याच मंदिरात गरूडाचीही छोटी मुर्ती आहे. विठ्ठलाच्या प्राचीन सुबक देखण्या मुर्ती फार थोड्या आहेत. आणि ज्या आहेत त्या काहीश्या ओबडधोबड. शिवाय प्राचीन अशी विठ्ठलाची मंदिरेही फारशी नाहीत. पंढरपुर शिवाय पानगांव (ता. रेणापुर जि. लातुर) हाच एक ठळक अपवाद. हे प्राचीन विठ्ठल मंदिर शिल्प सौंदर्याने नटलेले आहे.
विठ्ठलाची मुर्ती एकटीच असते. सोबत रूक्मिणी नसते. अगदी पंढरपुरलाही रूक्मिणी मंदिर वेगळे आहे. यावर अरूण कोलटकर यांची वामांगी नावाची अप्रतिम कविता आहे. नंतरच्या काळात विठ्ठल रूक्मिणी यांच्या मुर्ती एकत्र तयार केल्या जायला लागल्या. या विठ्ठल मुर्तीचे पाय अतिशय देखणे आहेत. “पायावर डोकं ठेवणं” याला वारकरी संप्रदायात वेगळे महत्व आहे.
राजस सुकूमार असा विठ्ठल देखणी दूर्मिळ विठ्ठलमुर्ती जरूर पहा. या गावावर एक छोटा video आम्ही केला आहे. यावर लेखही मी माझ्या blog वर टाकला आहे. जरूर पहा. (छायाचित्र सचिन जोशी शेंदूरवादा)
– श्रीकांत उमरीकर