महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,717

रेणापुरचे राजेहाके घराण्याचा ऐतिहासिक राजवाडा, समाधी स्थळ व बारव

By Discover Maharashtra Views: 2694 3 Min Read

रेणापुरचे राजेहाके घराण्याचा ऐतिहासिक राजवाडा, समाधी स्थळ व बारव.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर हे ऐतिहासिक शहर असून सध्या ते तालुक्याचे ठिकाण आहे. लातूरचे उल्लेख राष्ट्रकुट काळापासून मिळतात. राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष यांच्या काळातील शिलालेख मध्ये लट्टलुर असा लातूरचा उल्लेख मिळतो. तर मराठ्यांच्या उत्कर्ष काळात हा भाग बहुतांश पणे निजामाच्या ताब्यात दिसून येतो. याच लातूर च्या रेणापूर ची पारंपरिक वतनदारी हाके घराण्याकडे असून त्यांना राजे हा किताब होता. हा किताब कधी पासून त्यांच्या घराण्याकडे चालू होता हे स्पष्ट कळत नाही परंतु रेणापुरचे राजेहाके यांचेच सोयरे असलेले राजे पांढरे , राजे कोकरे, राजे मदने , या घराण्याकडे शिवकाळात व त्याच्या पूर्वीपासून राजे किताब दिसून येतो त्यामुळे कदाचित हाकेना देखील शिवकाळापासूनच राजे किताब असावा.

रेणापूर च्या राजे हाके शाखेतील मानसिंग राजे हाके हे ज्ञात मूळपुरुष असून ते छ. शाहू महाराजांच्या काळात सक्रिय दिसून येतात.  निजाम व पेशवे यांच्या झालेल्या चकमकी मध्ये मानसिंग राजे हाके निजामाच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसतात. तर त्याच वेळी दाभाडे व पेशवे यांच्या मध्ये वैमनस्य निर्माण झाले असता , मानसिंग हाके यांनी दाभाडे यांची न्याय बाजू घेतल्याचे दिसून येते.  ह्याच काळात मानसिंग राजेहाके यांचे पुत्र खंडेराव राजेहाके हे मराठ्यांच्यावतीने दिसतात.

रेणापूर मध्ये  ऐतिहासिक रेणुका माता मंदिर असून ते अहिल्यादेवी होळकर यांनी बांधल्याचे सांगितले जाते. तेथील हलती दीपमाळ वैशिष्ट्यपुर्ण आहे. तसेच गावात राजे हाके व ब्राम्हण पाटील यांचा एकत्रित राजवाडा आहे.  राजवाडा मोठा ऐसपैस असून दोन मोठे प्रवेशद्वार आहेत. आत मधे चौसोफा असून धान्य ठेवण्याचे कोठारे आज ही सुस्थितीत आहेत. बांधकाम आजही मजबूत असून आजही राजे हाके कुटुंबीय वाड्यात वास्तव्यास आहे.

गावातील आणखी एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे राजा राणी यांची समाधी म्हणजेच मानसिंग राजे हाके व त्यांच्या पत्नी यांची समाधी होय. मध्यकाळातील वास्तुना साजेशी अशी मुस्लिम प्रभाव असलेली ही समाधी असून ह्या जोड समाध्या आहेत. वरती घुमट असून चार बाजूस मिनार आहेत. अतिशय भव्य असणाऱ्या ह्या समाध्या राजे हाके घराण्याचे वैभवशाली परंपरेची साक्ष देतात. समाधीच्या बाजूस  बारव बांधली असून प्रशस्त अशी बारव आहे. तिच्या पाण्याचा वापर समाधीच्या पूजेसाठी होत असावा.

ज्यांना राजे हाके घराण्याची ऐतिहासिक माहिती जाणून घेण्याची ईच्छा आहे त्यांनी नक्कीच एक वेळ रेणापूर गावाला भेट द्यावी.

धन्यवाद

संदर्भ : सरंजामी मरहट्टे . राजे हाके घराणे

फोटो साभार – कृष्णा गुडदे

माहिती संकलन
मधुकर हाक्के
मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ.

Leave a Comment