राजेमहाडीक वाडा, तारळे…
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे गावात राजेमहाडिक या शूर घराण्याचे आठ वाडे आहेत. त्यातील ३-४ वाड्यात त्यांचे वंशज राहतात. एका वाड्यात शाळा आणि वसतीगृह आहे. वाड्याजवळ असलेले राममंदिर, बारव पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाड्यामधे आड,तलवार, दांडपट्टे, ढाल, भाले, पालखी अशा विविध गोष्टी पहायला मिळतात.गावाच्या बाहेर नदी संगमावर शंभूराजेंची मुलगी भवानीबाई महाडिक यांची समाधी आहे राजे महाडिक घराण्याने आपला वेगळाच दबदबा स्वराज्य निर्मितीच्या काळात कर्नाटक प्रांतात निर्माण केला.(राजेमहाडीक वाडा, तारळे)
कृष्णाजीराजे राजेमहाडिक इ.स १६१४ला युसूफ आदिलशाच्या लुटालूटीत मरण पावले.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करण्यास सुरूवात केल्यावर कृष्णाजींचे बंधू कानोजी राजांना येवून मिळाले. हे इ.स १६५० ला युध्दात मरण पावले.शहाजीराजेंचे हरजीराजेंवर चांगलेच लक्ष होते. छञपती शिवाजी महाराज यांनी हरजी राजेमहाडीक यांच्या कर्नाटकातील कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला. त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने 1668 ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला.
हरजीराजे कांचीवर चाल करून गेले त्यांच्या पराक्रमापुढे कांची ही नमली कांची जिंकून घेतली. संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छञपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी हरजीराजेंनी जिंजीत शौर्य पराक्रम गाजवला.
औरंगजेबाचा सरदार झुल्फीफिरखान जिंजीत चालून आल्यावर घमासान झालेल्या युध्दात २९ सप्टेंबर १६८९ ला जिंजी कर्नाटक येथे वीर मरण आले.तारळे गाव व बाजूच्या २८ गावे राजेमहाडिकांना इ.स. १७०८ ला वतन म्हणून मिळाले.अंबिकाबाईंचे पुञ शंकरजी राजेमहाडीक यांचा छञपती संभाजी महाराज यांची मुलगी भवानीबाई यांच्या सोबत विवाह झाला.शंकरजी राजेमहाडीक यांचा युध्दात मृत्यू झाल्या नंतर भवानीबाई या नदीकाठी सती गेल्या होत्या. तेथे त्यांची समाधी आहे.(राजेमहाडीक वाडा, तारळे)
टीम-पुढची मोहीम