महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,36,084

राजकोट | Rajkot Fort

By Discover Maharashtra Views: 4286 4 Min Read

राजकोट | Rajkot Fort

मराठी माणसाचा समुद्रावरील मानबिंदू असलेला किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला सिंधुदुर्ग हि ओळख या किल्ल्यामुळेच मिळाली आहे. असे म्हणतात कि मालवणला जाऊन सिंधुदुर्ग न पहाता येणे म्हणजे देवळात जाऊन देवदर्शन न करता येणे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक आवर्जुन सिंधुदुर्ग किल्ला पहायला जातात. पण देवळात जाताना नंदीचे अथवा कासवाचे दर्शन करावे लागते हा संकेत मात्र विसरतात. असेच काहीसे सिंधुदुर्ग किल्ला व त्याच्या आसपास असलेल्या किल्ल्याबाबत घडते. शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधताना त्याच्या रक्षणासाठी आसपासच्या परिसरात पद्मगड, राजकोट(Rajkot Fort), सर्जेकोट या उपदुर्गांची साखळी निर्माण केली. सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटक जात असले तरी या दुय्यम किल्ल्याकडे कोणी फिरकत नसल्याने दुर्लक्षित झालेले हे किल्ले आज ओस पडले आहेत.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उत्तरेस समुद्रात शिरलेल्या एका उंच भुशीरावर राजकोटचा किल्ला बांधलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ला ते राजकोट हे अंतर सरळ रेषेत मोजल्यास ३ हजार फुटापेक्षा कमी आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जमिनीकडून होणाऱ्या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. मालवण शहरात मेढा भागात असलेल्या जयगणेश मंदिराकडून किल्ल्यावर चालत जाता येते. साधारण आयताकृती आकाराचा हा किल्ला ३ एकर परिसरावर पसरलेला असुन किल्ल्याचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला आहे. तीन बाजुस समुद्र व एका बाजुस जमीन अशी या किल्ल्याची रचना असुन किनाऱ्याकडे उभे राहिले असता समोरच उंचवट्यावर एक वास्तु दिसते. हि वास्तु किल्ल्याच्या समुद्राकडील दिशेने असलेल्या बुरुजावर उभी आहे. या बुरुजाकडे जाताना एका मोठया झाडाखाली महापुरुषाची घुमटी दिसते. किल्ल्याच्या या सपाट भागात मोठया प्रमाणात मासळी सुकत घातलेली असल्याने कुबट वास सहन करावा लागतो.

बुरुजावरून समोरच सिंधुदुर्ग किल्ला व दूरवर पसरलेला अथांग सिंधुसागर दिसतो. या बुरुजावरून समुद्र्काठाने पुढे आल्यावर उध्वस्त झालेला दुसरा बुरुज दिसतो. या बुरुजाच्या पुढे जमिनीच्या बाजूने असलेली किल्ल्याची तटबंदी आजही शिल्लक असुन या तटबंदीची उंची ५-६ फुट आहे. या तटबंदीच्या बांधकाम सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. या तटबंदीच्या काठाने पुढे जाताना तटबंदी बाहेर बंदीस्त आवारात इंग्रज अधिकाऱ्यांच्या चार समाधी पहायला मिळतात. तटबंदीच्या टोकाला ढासळलेला तिसरा बुरुज असुन तटबंदीला लागुनच एक बांधीव विहीर आहे. किल्ल्यात पाण्याची एकमेव सोय असलेल्या या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे.

तटबंदीच्या काठाने पुढे आल्यावर एक घर असुन या घराच्या पुढील भागात किल्ल्याचा सुस्थितीतील चौथा बुरुज आहे. या बुरुजावर तोफांचा मारा करण्यासाठी मोठमोठया जंग्या आहेत. बुरुजाला लागुन किल्ल्याच्या आवारात तीन चार घरे आहेत. या ठिकाणी आपली अर्ध्या तासाची गडफेरी पुर्ण होते.

राजकोट किल्ल्याची बांधणी सिंधुदुर्गबरोबर इ.स १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली गेली. इ.स.१७६३ साली पोर्तुगीजांनी सिंधुदुर्गवर हल्ला केला असता जवळच्या एका लहान दुर्गावर मराठ्यांचे २०० लोक व सहा तोफा असल्याचा उल्लेख येतो. हा दुर्ग बहुदा राजकोट अथवा सर्जेकोट असावा. सन १७६६ मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे रहाण्यासाठी परवानगी मागितली होती. इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या १ ऑक्टोबर १८१२ च्या तहानुसार राजकोट व सिंधुदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इ.स.१८६२ साली इंग्रजांनी केलेल्या किल्ल्याच्या पाहणीत किल्ल्यावर एक तोफ असुन तटबंदी मोठया प्रमाणात मोडकळीस आलेली होती.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment