महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,114

राजमाता जिजाऊंची तुला

By Discover Maharashtra Views: 3474 6 Min Read

राजमाता जिजाऊंची तुला –

(राजमाता जिजाऊ साहेब ग्रंथमाला भाग २५)

शहाजीराजांच्या अकाली निधनाने जिजाऊंच्या मनावर साचलेले दुःखाचे तसेच नैराश्याचे सावट दूर करावे , या हेतूने ५ जानेवारी १६६५ रोजी छत्रपती  शिवाजी राजांनी स्वराज्य   कार्यात सतत सावध राहून योग्य मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या मातेची सुवर्णतुला केली. आपल्या मातेविषयी शिवरायांच्या मनात प्रचंड श्रद्धा होती. आपल्या आईला प्रचंड दीर्घायू व आरोग्य प्राप्तीकरिता त्यांची सुवर्णतुला करण्यात आली. शिवाजीराजे एके दिवशी मातेच्या दालनात बसले असता बोलता-बोलता जिजाऊ साहेबांनी आपली एक इच्छा शिवबांजवळ व्यक्त केली होती.येत्या  सूर्यग्रहणाच्या निमित्ताने ग्रहणकाळात मनसोक्त दानधर्म करण्याची आमची इच्छा आहे.यावर  स्मितहास्य करत शिवबा जिजाऊंना  म्हणाले “आऊसाहेब आमची देखील एक इच्छा आहे .आऊसाहेब तुम्ही आमच्या माताच नव्हे तर गुरु सहकारी व सल्लागार देखील आहात. आजपर्यंत प्रत्येक प्रसंगी आपण आम्हाला साथ दिलीत, प्रेरणा दिलीत. लहानपणापासून आपण आमच्यावर स्वराज्याचेच संस्कार केलेत. आज आम्ही फक्त तुमच्यामुळेच सर्व काही करू शकलो. तुमची शिकवण आणि मार्गदर्शन यामुळेच आम्ही इथवर आलो आहोत. आपणच आम्हाला घडवले आहे.आऊसाहेब हे स्वराज्य आहे ते फक्त आपल्यामुळेच. म्हणूनच या ग्रहणात आम्ही आपली सुवर्ण तुला करण्याचे ठरवले आहे.”(राजमाता जिजाऊंची तुला)

आईच्या शब्दाची किंमत खूप मोठी असते. शिवबासारखा मातृभक्त पुत्र  त्यांना लाभला होता. शिवबाने त्यांच्या कितीतरी इच्छा पूर्ण केल्या होत्या. तुला विधीसाठी परिवारासोबत महाबळेश्वरला आले होते. त्यांच्यासोबत सोनोपंत डबीरही आले होते .आईसाहेबांच्या तुलेसाठी विपुल सोने महाबळेश्वरी रवाना झाले होते. महाबळेश्वराचे मंदिर माणसांनी भरून गेले होते. ग्रहणकाळ सुरू झाला होता. भटू पाध्यांनी वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली. शिवरायांनी पहाटेच्या मुहूर्तावर तुलेच्या रुपेरी पार्ड्यांची सविध पूजा बांधली, आणि शिवरायांनी आऊ साहेबांना पारड्यात बैठक घेण्याची विनंती केली. राजांना आणि महाराजांचा आधार घेत आऊसाहेब पारड्या जवळ आल्या.

हळदी कुंकवाची  चिमूट सोडून नेहमीसारखे जगदंब जगदंब म्हणीत आऊसाहेबांनी पारड्यात आपले सोनपुतळ उजवे पाऊल घातले. सदर महालात घ्यावी तशी बैठक त्यांनी या पारड्यात घेतली. क्षणात पारडे फरस बंदीवर टेकले. मग राजे ,पुतळाबाई राणीसाहेब आणि शंभुराजे दोन हातांनी सोनमोहरांची ओंजळ दुसर्या पारड्यात  रिक्त करू लागले .मंत्रघोष चालूच होता . कित्येक मंडळी मोठ्या उत्सुकतेने हा मातृपूजनाचा सोहळा बघण्यात जमली  होती. कित्येक जण तर केवळ आऊसाहेबांचे दर्शन घेण्याच्या अभिलाषेने आले होते.काही लोक दानाच्या आशेने आले होते. पंचगंगा हे अत्यंतिक आनंदाने सोळा निरखीत होत्या कृष्णामाई तर  स्वतःला भाग्यशाली समजत होती. कारण तिच्याच  तीरावर हा पुण्य सोहळा रंगत चालला होता. नजर टाकाल तिकडे गर्द हिरवी वनश्री, मंदिरांचे मंगल वातावरण, मंत्रघोष चालू आहे. पंचगंगा खळाळत वाहत आहेत आणि ह्या साऱ्यांच्या मधोमध एक मुलगा आपल्या आईला सोन्याने तोलून धरित आहे. खरेच कल्पनेतील दृश्यांनीही आपण सुखावून जातो आहोत मग त्यांनी हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवला असेल ते तर किती भाग्यवान असले पाहिजेत?

प्रथम मान मातेला या न्यायाने जिजाऊंना एका पारड्यात बसवले होते. दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहरा टाकल्या जात होत्या. तुला दानाबरोबर विधीवत मंत्रोच्चार होऊ लागले होते. तूला होताना जिजाऊना खूपच समाधान वाटत होते. कारण त्यांच्या तुलेएवढे सोने गोरगरिबांना वाटले जाणार होते.आपल्या पुत्राच्या कार्याने जिजाऊ अत्यंत आनंदी होत होत्या.आईच्या देहाची तुला होऊ शकेल. पण तिच्या वात्सल्याची, ममतेची, प्रेमाची,तिच्या अवघ्या आऊपणाची तुला कोण आणि कशी जोखणार ? जिजाऊसाहेबांना तर या सुवर्णतुला पेक्षाही शिवबाचेच जास्त कौतुक वाटत होते. खरोखर फर्जंद असावे तर असेच .त्यांच्या मनी विचारांचा फेर पडलाच .महाराजही मनातल्या मनात म्हणत होते, आई तुलेस अपुर्या ह्या गे सुवर्णराशी , समतोल तुळणा फक्त होईल काळजाशी !

खरोखर राजांनी शक्य असते तर काळीजही काढून दिले असते आपल्या आईच्या तुलेला. पण ते शक्य नव्हते. कारण भोसले कुळाचा वारसदार जन्मानेच केवळ स्वराज्यासाठी बांधला गेला होता. आजवर आऊसाहेबांनी शिवरायांना स्वराज्य कार्यासाठी घडविले होते.अन सार्या जनरीतींकडे पाठ फिरवून त्याही केवळ स्वराज्यासाठीच शहाजी राजांच्या पश्चात माघारी राहिल्या होत्या. खरोखर आऊसाहेबांना आपल्या काळजाने तरी जोखता येईल का नाही असा प्रश्न पडला होता राजांना.कारण आऊसाहेब होत्याच अशा कोणालाही न समजणार्‍या.

संभाजीराजांच्या बाल मनातही अनेक विचार तरंग उठत होते. मागे एकदा आऊसाहेबांनी त्यांना सांगितलेली सत्यभामा, रुक्मिणी देवी आणि प्रभु श्रीकृष्णाची कथा त्यांना आठवत होती. सत्यभामा अशीच सुवर्ण झालीत राहिली, पण तुला झाली नाही .मग आता रुक्मिणीदेवींनी  अत्यंत श्रद्धेने एका तुळशीदलावर श्रीकृष्ण असे लिहून पारड्यात ठेवले तर दोनही  पारडी सम समान झाली.आमच्या आऊजीही अशाच आहेत.आमचीही अत्यंत श्रद्धा आहे आमच्या आऊजींवर ! मग आता आम्ही जरी एका तुळशीदलावर जगदंब एवढेच लिहून ते दुसऱ्या पारड्यात ठेवले तर आमच्या आऊजींची  तुला सिद्ध होईल का? असा प्रश्न त्या लहानग्या जीवाला पडला होता.

तुलादाना नंतर  हे सर्व सोने गरीब रयतेला वाटून टाकले होते. दृष्ट लागेल असा सोहळा महाबळेश्वरी पूर्ण करण्यात आला होता. आपल्या मातेची दानधर्माची इच्छा अभिनव पद्धतीने  शिवरायांनी पूर्ण केली होती. शिवरायांच्या अतुलनीय मातृप्रेमाची महती साऱ्या महाराष्ट्राने डोळे भरून पाहिली होती.

आपल्या पुत्राचे अलौकिक प्रेम पाहून जिजाऊ धन्य धन्य झाल्या होत्या. माय – लेकरांचे  हे प्रेम पाहून सारी रयत धन्य धन्य झाली होती. राजमातेने भरल्या डोळ्यांनी आपल्या लेकराला आशीर्वाद दिला होता. महाराजांच्या भावविश्वातील एक सुखांत असा सोहळा पार पडला होता. आईसाहेब शिवबाला प्रोत्साहान, सल्ला, प्रेरणा, आशीर्वाद कायमच देत आल्या होत्या. तुला झाल्यानंतर जिजाऊंनी आपल्या लेकरासाठी उदंड आयुष्य मागितले होते.

तुलादाना नंतर दुसऱ्या दिवशी  सर्वजण राजगडी परत आले. आऊसाहेब तुला दानाने अत्यंत समाधान झाल्या होत्या. शहाजीराजांच्या पश्चात आऊसाहेबांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहून  तुला विधीनंतर महाराज मालवण कडे परतले  व नव्या दमाने नियोजित कार्यात मग्न झाले  जिजाऊ राजगडावर येऊन मोठ्या जोमाने कार्यरत झाल्या होत्या धन्य धन्य ती माता व धन्य धन्य पुत्र.राजमाता जिजाऊंची तुला.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment