महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,261

जिजाऊंचे माहेर सिंदखेडराजा | राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग १

By Discover Maharashtra Views: 4277 3 Min Read

जिजाऊंचे माहेर सिंदखेडराजा

जिजाऊंचे माहेर सिंदखेडराजा  – राजमाता जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थान व माहेर सिंदखेड राजा- हे नगर म्हणजे ऐतिहासिक तीर्थक्षेत्रच म्हणावे लागेल. सिंदखेड राजा म्हणजे शिवशक्तीचे तथा शिवशाहीचे उगमस्थान आहे .म्हणूनच ते स्वराज्याचे प्रेरणास्थान आहे, स्फूर्तिस्थान आहे. महाराष्ट्रातील मराठी मंडळांचे मुकुटमणी म्हणजेच सिंदखेडकर समशेर बहाद्दर लखुजी जाधवराव प्राचीन काळी सिंदखेड हे स्थान आलापूर या नावाने ओळखले जाई. ‘सिंधुरम’ नावाच्या राजाने हे गाव वसविले म्हणून त्याचे नाव सिंदखेड असे पडले. यादव सम्राट महाराज यांची सातवी पिढी म्हणजे लखुजीराजे जाधवराव.

सिंदखेडचे लखुजी जाधवराव आणि देवगिरीचे यादव हे एकाच कुळातील असून एकाच वंशातील आहेत. देवगिरीच्या यादव घराण्याची सिंदखेड येथील जाधव घराणे ही एक शाखा आहे. यादव किंवा जाधव हे एकाच वंशातील आहेत. जाधवरावांच्या पाचव्या पिढीतील लक्ष्मण सिंह उर्फ लखुजीराव हे एक शूर व कर्तबगार पुरुष होते. सिंदखेड राजा येथे आपली सन 1576 च्या सुमारास आपल्या जहागिरीची राजधानी स्थापन केली.आज जरी सिंदखेड जाधवरावांचे म्हणून ओळखले जात असले तरी या घराण्याचे मूळ गाव हे नव्हे.लखुजी राजे येथे येण्यापूर्वीच सिंदखेडच्या काझी घराण्याला सन 1450 च्या सुमारास सिंदखेड परगाणा जहागिर म्हणून मिळाला होता. लखोजी जाधवरावांच्या कडे अनपेक्षितरित्या हा परगाणा आला. सन 1576 च्या सुमारास लखुजीराव जाधव यांनी सिंदखेड राजा येथे आपल्या जहागिरीची राजधानी स्थापन केली. त्यांची राहणी व रुबाब स्वतंत्र राजा सारखाच होता. विठ्ठल देव उर्फ विठोजी आणि त्यांची पत्नी ठाकराई यांच्या पोटी सन 1550 च्या दरम्यान लखुजीराजे यांचा जन्म झाला. विठोजीराजे यांच्या मृत्यूनंतर म्हणजे सन 1570 च्या दरम्यान लखुजीराजे आपल्या वतनावर रूजू झालेले दिसून येतात .लखुजीराजांनी सिंदखेड राजा येथे आपल्या वतनदारीचे प्रमुख ठिकाण निर्माण केलेले दिसून येते. तेथूनच ते आपला कारभार पाहत होते. सुरुवातीच्या काळात लखुजीराजे जाधवराव हे निजामशहाच्या पदरी पंचहजारी मनसबदार होते.

लखुजीराजे हे अत्यंत शूर ,हुशार, आणि पराक्रमी,मुत्सद्दी , तोलामोलाचे सरंजामदार होते. आपल्या मुत्सद्देगिरीने त्यांनी निजामशहाला दौलताबादचा किल्ला मिळवून दिला. निजामशहाने खुश होऊन शिंदखेड परगाना दिला असे अनेक परगाने निजामाने खुश होऊन लखुजीराजे यांना दिलेले दिसून येतात.  लखुजीराजे यांनी सिंदखेड परगण्यांची देशमुखी मिळवली आणि तेथेच ते कायमचे वास्तव्य करू लागले. लखुजीराजे जाधवराव यांचे निजामशाहीत बरेच वजन वाढले. निजामशाहीनेही लखुजीराव यांचे स्वागत करून त्यांना जहागिरीचे शाही लेखी फर्मान दिले . अशाप्रकारे लखुजी जाधवराव यांना जहागिरी व मनसब प्राप्त झाली .

लखुजीराजे यांनी सिंदखेडला स्वतःसाठी वाडा, त्याभोवती गढी , आजूबाजूला अनेक छोटे-मोठे तलाव, बागा इत्यादीची निर्मिती केली. आपला वाडा तीन मजली बांधला होता. महाराष्ट्रातील मराठ्यांचे मुकुटमणी म्हणजे सिंदखेडकर समशेरबहाद्दर लखुजी जाधवराव होय. लखुजी राजे यांचे वडील विठोजी जाधवराव यांच्यापासून ते अखेरच्या बाजीराव जाधवराव यांच्यापर्यंत म्हणजे सन 1665 ते 1859 या अडीचशे तीनशे वर्षांच्या काळात या जातिवंत शूर घराण्यात एकापेक्षा एक असे पंधरा-सोळा पराक्रमी पुरूष जन्माला आले. त्याच प्रमाणे जिजाऊंसारख्या तेजस्विनी, वीरपत्नी व वीरमाता याच घराण्यात प्रकट झाल्या.

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला क्रमशः

लेखन – (इतिहास लेखिका) डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
संदर्भ :- राजमाता जिजाऊ साहेब

Leave a Comment