महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,50,932

जिजाऊंचे मातृत्व व शिवरायांचा जन्म

By Discover Maharashtra Views: 3997 7 Min Read

जिजाऊंचे मातृत्व व शिवरायांचा जन्म

राजमाता जिजाऊ साहेब चरित्रमाला भाग 11

जिजाऊंचे मातृत्व व शिवरायांचा जन्म – शहाजीराजे व जिजाऊंचे स्वराज्याचे स्वप्न साकार होण्यासाठी व महाराज शहाजीराजांना पराक्रमाचा वारस मिळण्यासाठी जिजाऊंना पुत्र हवा होता. जिजाऊंची आस होती एका पुत्राची.शिवरायांच्या वेळी जिजाऊंना कडक डोहाळे लागले होते . त्यांना गरोदर अवस्थेत असताना हत्तीवर बसावे , गडावर फिरावे ,शुभ्र छतावरी सिंहासनावर बसावे ,निशान उभारावे,चौर्या ढाळून घ्यावे, धनुष्यबाण,भाला – तलवार- चिलखत धारण करून लढाया कराव्या, गड जिंकावा, विजय मिळवावा. मोठमोठे दानधर्म करावे, धर्मस्थापना करावी, असे नाना प्रकारचे चमत्कारीक डोहाळे होत असल्यामुळे आपल्या गर्भातील बाळ तेजस्वी होईल अशीच जिजाऊंची भावना दृढ झाली होती.

जिजाऊंना सुरक्षेसाठी म्हणून शहाजीराजांनी बाळंतपणासाठी शिवनेरीचे किल्लेदार विजय विश्वासराव यांच्याकडे सोपवले होते.विश्वासराव तर शहाजीराजांनी दाखवलेल्या विश्वासानेच धन्य झाले होते. किल्लेदार विश्वासराव स्वतः आणि त्यांचे सारे सहकारी अतिशय काळजीपूर्वक जिजाऊंची व्यवस्था पाहत होते .एका फार मोठ्या तालेवार सरदारांच्या ,साक्षात महाराज शहाजी राजे यांच्या लाडक्या राणीसाहेब खास बाळंतपणासाठी म्हणून या शिवनेरी गडावर आल्या होत्या.जिजाऊंच्या पोटी सहा पुत्र जन्मले होते.परंतु पुढे दोनच पुत्र नावारुपाला आले.

गडावर एका सुरक्षित खोलीत बाळंतपणाची सर्व व्यवस्था करण्यात आली होती.भिंतीवर कुंकवाने ठिक ठिकाणी स्वस्तिके व शुभचिन्हे रेखण्यात आली होती. दाराच्या दोन्ही बाजूंना मंगल देवतांची चित्रे काढण्यात आली होती. बाळबाळंतीणीला आशीर्वाद द्यायला अनेक देव-देवता तत्परतेने भिंतीवर उभ्या होत्या. स्वस्तिक,कमळ ह्यांनी छताला आच्छादून टाकले होते. प्रवेशद्वारापाशी साक्षात ब्रह्मा -विष्णूच पहारेकरी म्हणून उभे होते. खोलीत सतत तेवते दीप ठेवण्यात आले होते.
आता दाटली होती फक्त उत्कंठा!

फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली. आकाशातल्या चांदण्या हळूहळू विरघळू लागल्या. सगळी सृष्टी उजळू लागली.बालसूर्याच्या स्वागतार्थ स्वर्गाचे देव जणू पूर्वेकडे ओंजळी भरभरून गुलाल उधळू लागले. पूर्वा रंगली. वारा हर्षावला. पाखरे आकाश घुमवू लागली. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई- चौघडा वाजू लागला आणि अत्यंत गतिमान सप्तअश्व उधळीत उधळीत बालसूर्याचा रथ क्षितिजावर आला!
आणि किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला. वाद्ये कडाडू लागली. संबळ झांजा झणाणू लागल्या. गडावरच्या नगारखान्यात सनई चौघडा झडू लागला.नौबत सहस्त्रशः दणाणू लागली. नद्या,वारे ,तारे ,अग्नी सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा! तो दिवस रत्नांचा ! तो दिवस कौस्तुभाचा, अमृताचे ! त्या दिवसाला उपमाच नाही. तीनशे वर्षे शिवनेरीच्या भोवती घिरट्या घालीत होती ! आज त्यांना नेमकी चाहूल लागली ! कोणत्या शब्दात त्या सुवर्ण क्षणाचे मोल सांगू?अहो , केवळ शतकां -शतकांनीच नव्हे, युगायुगांनीच असा शुभ क्षण निर्माण होतो. त्याचे मोल अमोल ! जिजाबाईसाहेबांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला !( दि.19 फेब्रुवारी, शुक्रवार, 1630 )

गडाचे तोंड साखरेहून गोड झाले. आईसाहेबांच्या महालापुढे पखालीतून आणि घागरीतून धो धो धबधबलेले पाणी बारा वाटा वाहत निघाले. खळाळणारा ओघ वेशीला आला ! ओघ वेशीला आला ,पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाऊंना झाला! पुत्र शहाजीराजांना झाला! पुत्र सह्याद्रीला झाला ! महाराष्ट्राला झाला ! भारतवर्षाला झाला ! प्रत्येक जलओघ वळसे घेत घेत दिल्लीच्या, विजापूरच्या, गोव्याच्या, मुरूडजंजिर्याच्या आणि गोवळकोंड्याच्या वेशीकडे धावत होता.तेथल्या मग्रुर सुलतानांना बातमी सांगायला की, आला आला !सुलतानांनो , तुमचा काळ जन्माला आला ! तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तख्तांच्या चिरफळ्या उडविण्याकरिता कृष्ण जन्माला आला !!

हाजाराजांकडे बातमीची साखरथैली रवाना झाली. या वेळी राजे दर्याखांन रोहिड्यांशी लढण्यात गुंतले होते.
गडावर शीतल सुगंधी वारे वाहू लागले .गडाच्या परिसरातील खेड्यापाड्यात ही पुत्रजन्माची बातमी पसरली .थोर मनाच्या शहाजीराजांना व तितक्याच थोर हृदयाच्या जिजाऊसाहेबांना पुत्रलाभ झाला , हे समजल्यावर जुन्नर मावळ आनंदून गेले.
” महाजनहो ! पृथ्वीचे भाग्य उदेले ! या भूमंडळाचे ठायी अति थोर सौभाग्यमूहूर्तावर हा कुमार जन्माला आला आहे! त्याची कुंडली अत्यंत मोठ्या अशा भाग्ययोगांनी परिप्लुत आहे.अहो , हा सुपुत्र दिग्विजय करील!हा परम साहसे करील ! आपली किर्ती दिगंताला पोहोचविल ! हा आपल्या सत्तेत गिरीदुर्ग, जलदुर्ग ,वनदुर्ग, स्थलदुर्ग ठेवील ! श्रांत पृथ्वीस शांत करील ! सकल भूमीचे ठायी हा सुपुत्र यशकिर्तीप्रताप महिमा वाढवून चिरंजीव होईल!”

हे शुभ भविष्य ऐकून कारभाऱ्यांनी माना डोलावल्या.मुद्रा आनंदल्या .त्यांना धन्य धन्य वाटले.ओंजळी भरभरून दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणांची त्यांनी संभावना केली. इवलेशे बाळ ते ! त्याला अजून धड रडता सुध्दा येत नव्हते. पण त्याच्याकडून अपेक्षा केवढ्या मोठ्या! आईसाहेबांच्या सौम्य मातृद्रृष्टीतही त्याच अपेक्षा दाटलेल्या होत्या. तो सह्याद्री तर आनंदाने खदखदत होता. जणू म्हणत होता ,अरे ह्या पोराची कुंडली विती दीडवितीच्या अशा चिठोऱ्यावर काय मांडता ! सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पसरलेल्या ह्या अफाट आकाशावर ब्रह्मदेवाने यांची कुंडली केव्हाच मांडून ठेवली आहे!

पाचव्या दिवशी धनुष्यबाण, तलवार वगैरे हत्यारे बाळंतघरात पुजण्यात आली. बारावा दिवस उगवला.आज बाळाचे बारसे होते. बारसे मोठ्या थाटामाटाचे झाले. शिवनेरीगड बाळाचे बारसे जेवला. मानपानाच्या मांनकरणी, मायबहिणी,सुईणी , कुळंबिणी जमल्या. पाळणा सजून – सावरून बाळाची केव्हाची आतुरतेने वाट पाहात होता.
आईसाहेबांनी मांडीवर बाळ घेतले.बाळानेही मोठाच थाटमाट केला होता. जरीचे अंगडे.जरीचे कुंचडे.मोठाच रुबाब होता बाळाचा !कुंचड्याला कडेने मोती व मध्यभागी लावलेले सोन्याचे पिंपळपान बाळाच्या कपाळावर रूळत होते. गळ्यात दृष्टीची पोत आणि सोन्यात जडविलेले वाघनख घातले होते.त्याला पाचू जडविले होते.शिवाय सोन्याची जिवती बाळाच्या छातीवर विराजली होती. हातात बिंदल्या, मनगट्या होत्या. पायात लखलखीत चाळवाळे होते .डोळ्यात काजळ घातले होते. कपाळावरती तीठ लावले होते.

बाळाचे नाव ठेवण्यात आले. शिवाजी ! शिवाजीराजे ! शिवाजीराजे
बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणूनच बाळाचे नाव ठेवले ‘शिवाजी’ तीनच अक्षरे, शि -वा -जी ! पण त्यातील एका अक्षरात रामायण साठवले होते ! एका अक्षरात महाभारत साठवले होते! एका अक्षरात शिवभारत साठवले होते! अन तीनही अक्षरात महान भारत घडविण्याचे चिरंजीव सामर्थ्य साठविलेले होते. गड शिवनेरी मोठा भाग्याचा. शिवाजीराजाला म्हटली गेलेली अंगाईगीते या गडाने ऐकली होती. शिवाजीराजेही मोठे भाग्याचे. त्यांना पहिले स्नान व पहिले प्राशन घडले ते गंगा – यमुनांचे ! ते कसे ? शिवनेरीवर पाण्याची टाकी आहे. त्यातील एका टाक्याचे नाव आहे ‘गंगा ‘आणि दुसऱ्याचे नाव आहे’ यमुना’! गडकोटांनी, नद्यांनी, देव-देवतांनी, सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांनी आणि मावळच्या खेड्यापाड्यांनी वेढलेल्या गडावर शिवाजीराजांचा जन्म झाला.जन्मतःच त्यांचे नाते जडले किल्ल्यांशी, तटांशी ,बुरूजांशी. शिवनेरीवर सह्याद्रीच्या कुशीत रात्रीच्या अंधारात ऊषःकाल झाला! तीनशे वर्षाच्या भिषण काळोखानंतर पूर्वा उजळली ! उषःकाल झाला!

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Comment