राजमाता जिजाऊसाहेब व शिवाजी राजे बंगळूरला शहाजीराजांच्या भेटीला
राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग १३
राजमाता जिजाऊसाहेब व शिवाजी राजे – १६ एप्रिल १६४० रोजी छत्रपती शिवाजीराजे व सईबाई राणीसाहेब यांचा विवाह झाला.या विवाह सोहळ्याला शहाजीराजे येऊ शकले नव्हते, म्हणून राजमाता जिजाऊ साहेब, शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब बंगळूरला शहाजी राजे यांना भेटावयास गेले.
शहाजीराजे विजयावर विजय मिळवीत होते. पण त्यांचा कल शक्यतोवर ही स्वतंत्र राज्ये टिकवण्याकडे होता. खंडण्या, तह, करार, मांडिलक्या घडवून आणून ही राज्ये टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मांडली होती. त्यामुळे ह्या सर्व राजे लोकांना शहाजीराजांबद्दल विलक्षण आदर वाटू लागला होता. रणदुल्लाखान तर राजांवर बेहद्द खूश झाला. त्याने राजांना बंगळूर शहर प्रेमपूर्वक भेट म्हणून दिले.
हे बंगळूर शहर म्हणजे पूर्वीच्या स्वतंत्र विजयनगरच्या साम्राज्याचा एक मुलूख होता. आता शहाजीराजे बंगळूरास राहू लागले होते. शिवाजीराजे यांचे थोरले बंधू संभाजीराजे, धाकट्या आई तुकाबाईसाहेब, बंधू व्यंकोजीराजे व इतर सर्वांची आता बेंगलोरमध्ये एकत्र भेट होणार होती. शहाजीराजे यांच्या संसारात जणू दिवाळीच साजरी होणार होती. कारण असा कौटुंबिक सोहळा पुन्हा अनुभवायला मिळणार नव्हता.
बंगळूर हे खरोखरच सौंदर्य, संरक्षण,आणि आरोग्य या तीनही दृष्टींनी अतिशय अप्रतिम असे शहर होते. सारे शहर कसे आखीव रेखीव होते. उंच तट,भव्य वेशी, डौलदार – घाटदार बुरुज, मोठमोठे चौक होते. सुंदर कारंजी होती. तलाव होते. रस्त्यांच्या दुतर्फा हिरवीगार झाडे होती. विस्तीर्ण बाग बगीचे होते. त्यांत सुंदर सुंदर फुले उमलली होती. सुंदर बसविलेल्या बाजारपेठा होत्या. लोकही मोठे सुस्वभावी होते. आल्यागेल्याची हसतमुखाने स्वागत करणारे होते. शहाजीराजांना हे शहर फार फार आवडत होते.
शहाजीराजांनी आपला खासा असा राजवाडा बांधला. अगदी त्याच थाटात सजविलाही होता. बागा, कारंजी, पुष्करिणी, महाल, पागा आणि खलबतखानाही होता. राजांनी एकूणच सगळा थाट एखाद्या सार्वभौम राजासारखा इथे ठेवला होता. शहाजीराजांच्या दरबारीही त्यांनी अनेक गुणवाणांचा संग्रह केला होता. अनेक तर्हेच्या उत्तमोत्तम वस्तू, शस्त्रे पदरी बाळगली होती. गुणवंत कलावंत, शास्त्री पंडित, कवी, गवई, नर्तक – असे अनेक लोक दरबारी होते. शिवाय तोफा, हत्ती, घोडे यांनी राजांचे सैन्य नेहमीच सुशोभित असे. मुत्सद्दी, राजकारणधुरंधर व अनेक पराक्रमी योद्धे ह्यांचा उत्कृष्ट मिलाफ म्हणजे महाराज शहाजीराजांचा दरबार ! एकूण बंगळूरामध्ये एक खानदानी, उच्च अभिरुची संपन्न, राजस संस्कृती आणि कलात्मकता असलेला एक नवा हिंदु राजा उदयाला आला होता.
राजांच्या सभामंडपाला ‘नवगजी’ असे नाव होते. ह्या नवगजीत उजेडाचा लखलखाट असे. वरील छत्र नेत्रांना थंडावा देणारे होते. विविध मासे व कासवे यांची चित्रे यावर काढली आहेत असा रूजामा नवगजीत अंथरलेला असे. सर्व सेवक समुदाय आधीच येऊन राजांची मार्ग प्रतीक्षा करीत असे. अनेक मराठा क्षत्रियांच्या संबंधाने ही नवगजी गजबजून गेलेली असे. अश्या ह्या नवगजीत भालदार – चोपदारांच्या ललकार्यांतून ,ज्यांच्या मस्तकी चांदव्याची अब्दागिरी धरली आहे व ज्यांच्याा भोवती चवरीवाले चवर्या ढाळीत आहेत असे महाराज शहाजी राजे हातात तलवारीची मूठ लटकावीत धीरोदात्त गतीने प्रवेश करून, सार्यांचे मानाचे मुजरे घेत घेत, सिंहाकृती स्तंभावर बसविलेल्या विलोभनीय सिंहासनावर विराजमान होत असत .
शहाजीराजांचा तेथील वावर हा एखाद्या स्वतंत्र हिंदू राजा सारखाच होता. नारोपंत, बाळकृष्णपंत, रघुनाथपंत, जनार्दनपंत असे मुत्सद्दी कारभारी राजांचा सारा कारभार पाहत होते. पहाटे शेज घराजवळ कुडमुडे जोशी व शाहीर लोक, गायक सुमधुर स्वरात भुपाळ्या व भक्तिगीते गाऊन राजांना सुखशय्येवरून उठवीत असत. त्याच वेळी विश्वनाथभट ढोकेकर उच्चआवाजात गिर्वावाणीत प्रातःस्मरणे म्हणत.मग राजांच्या पदरीचे इतर काही ब्राह्मण पुण्याहवाचन करीत. पूण्याहवाचन म्हणजे राजांना तो दिवस सुखाचा जावो, अशी मंत्रयुक्त ईशप्रार्थना करीत. वेदपठनही चालू असेच.
राजे रोज सकाळी उठून अंगणात येत .मग आकाशदर्शन म्हणजे अरुंधती ,शची , देवसेना व आकाशगंगा इ. तारांगणावर नजर टाकून शिव , विष्णू ,स्कंद उर्फ खंडोबा ,ब्रम्हदेव , लोकपाल ,इंद्रादि देव, होमशालेतील अग्नी इत्यादी दर्शन घेऊन सूर्यदर्शन अन दिकदर्शन घेत. त्याच वेळी गुरव शिंगे वाजवीत व जंगम मोठ्या आवाजात शंख फुंकीत असत.अन घडशी चौघडाही वाजवू लागे.मग राजांना काही शुभशकून मुद्दाम घडविले जात. तुफान ऐरावत, सवत्स गाय , पुत्रिणी ब्राम्हणी , वर्धमान मानुष म्हणजे विदुषक , ठेंगू ब्राह्मण ! ही सारी शुभशकुने घेत राजे मग पुढे प्रयाण करीत.
मग यानंतर राजे वाड्याच्या मुख्य दरवाजासमोर सैन्याची पाहणी करीत . यावेळी हजार – पाचशे घोडेस्वार वा पाईक कवायत करीत. त्यानंतर राजे रथ , पालख्या , शिबीका इत्यादी वाहनांचे अवलोकन करीत. इतक्यात दरवेशी पाळलेला सिंहाचा बच्चा वा थट्टामस्करीदार माजलेला पोळ राजांपुढे आणि काही वेळ मनोरंजन होत असे. नंतर हंस , मस्य यांचे शुभशकुन घेत राजे दरवाज्यावरील तोरणाकडे पाहत पहात वाड्याचे मागील परसातील अश्वस्थ , औदुंबर इत्यादी इतर शूभ वृक्षांखालून व पारिजातकादि पुष्प वृक्षांखालून जात . दक्षिणवर्तशंखातील पाणी डोळ्यास लावून उंच फडकत असलेल्या जरीपटक्याचे दर्शन ते घेत.
त्यानंतर राजवैद्य पुढे येऊन राजांची नाडी तपासत .मग ब्राम्हण एका हातात चांदीची व एका हातात सोन्याची परात घेऊन येई.चांदीच्या परातीत तेल असे व सोन्याच्या परातीत पातळ तूप असे . मग राजे आपले मुख ह्या – तुपात पहात मग राजे स्नान करीत .अन ह्यानंतर राजे श्रीशंकराची यथासांग पूजा बांधत.
मग स्नानानंतर राजे खासे सदरेवर येत .मग तेथे प्रजेला न्याय निवारण प्रशासनाच्यादृष्टीने काही नियोजन , काही पुढील योजनांचे डावपेच अशी राजकीय कामे चालत. तदनंतर भोजन, वामकुक्षी अन मग काही वेळ खास मनोरंजनासाठी राखून ठेवलेला असे .तर कधी खासे राजे स्वारी शिकारीला निघत. जेव्हा स्वारी शिकाऱ्या नसत, तेव्हा दानधर्म इत्यादी कर्मात ते स्वतःला गुंतवीत असत अन सायंकर्म आटोपल्यानंतर काही शेलक्या लोकां समवेत राजे खलबतखाण्यात गुप्त चर्चा करीत असत .
मनोरंजन म्हणजे, काव्य-शास्त्रादि कलांचा आस्वाद घेणे. स्वतः शहाजीराजेही उत्तम काव्य निर्मिती करीत असत. त्यांना अशी कितीतरी सुंदर सुंदर काव्ये, समस्यापूर्ती राजांनी केल्या होत्या. त्यांच्या दरबारी आनंदशेष पंडित, रघुनाथ व्यास, रघुनंदन, विश्वंभर भट, जयराम पिंडे असे कितीतरी पंडित कवी होते. राजा बहुश्रुत असला पाहिजे. त्याला सर्व कलांमधील, सर्व शास्त्रांमधील ज्ञान असले पाहिजे ह्या नियमाला स्मरून शहाजीराजे ह्या सार्या गोष्टी करीत होते. (हे सर्व शहाजीराजे यांचे वर्णन त्यांच्या दरबारातील संस्कृत पंडीत जयराम पिंडे यांनी त्यांच्या राधामाधवविलासचंपू या संस्कृत ग्रंथात केलेले आहे.)
बंगलोर आणि इतर आसपासच्या प्रदेशात शहाजीराजांचा मोठा दरारा होता.तितकाच त्यांना मानही होता .अन खुद्द आदिलशहाच्या दरबारात तर महाराज शहाजीराजांचे स्थान आणि मान हा एखाद्या राजपुत्राप्रमाणे होता.त्यांने शहाजीराजे भोसले यांना अत्यंत मौल्यवान अशी” फर्जंद “ही पदवी दिली होती.अहो , फर्जंद म्हणजे सुलतानाचा सहाय्यक ,सल्लागार, सहकारी ,राजपुत्रच जणू प्रतिसुलतानच! याशिवाय दरबारात रोज उपस्थिती न लावण्याची खास सवलत केवळ महाराज शहाजीराजांना दिली गेली होती. इतकेच नाही तर बारा गावे दूर असलेल्या स्थानावरूनही शहाजीराजांनी केलेला मुजरा आदिलशहाला मान्य होता.
खरोखरच मुर्तीमंत पराक्रम, कुबेराने लाजावे अशी श्रीमंती, मुत्सद्दी पणा, धोरणीपणा, स्वाभिमान, काळाच्याही पलीकडे जाणारी दूरदृष्टी, विद्वत्ता, औदार्य, माणूसकी आणि स्वातंत्र्याचे उपासक म्हणजेच भोसले कुलवतांस महाराज शहाजीराजे मालोजीराजे भोसले!
मग स्वाभाविकच असा प्रश्न पडतो की, दारी गजांतलक्ष्मी झुलत असताना, घरी साक्षात कुबेरालाही लाजवेल असे ऐश्वर्य पाणी भरत असताना त्या सर्वांचा स्वखुशीने त्याग करून पुण्यासारख्या त्याकाळी मुरमाड झालेल्या प्रांती जिजाऊसाहेब शिवबासह राहायला का तयार झाल्या? आणि उत्तर येते केवळ स्वराज्यसंस्थापनासाठी !
राजमाता जिजाऊसाहेब व शिवाजी राजे:
लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे