महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,55,317

जिजाऊ व शिवबा

By Discover Maharashtra Views: 3766 6 Min Read

जिजाऊ व शिवबा बेंगलोरहून स्वराज्य स्थापणेसाठी पुण्याला निघण्याच्या तयारीत

राजमाता जिजाऊसाहेब ग्रंथमाला भाग १४…

जिजाऊ व शिवबा – शहाजीराजांनी जिजाऊंच्यावर जबाबदारी देण्याची ठरवली होती .राजे म्हणाले आम्ही संभाजीराजांसोबत ईकडे स्वराज्याचे मूळ घट्ट करण्याचा प्रयत्न करू आणि तिकडे तुम्ही शिवबासमवेत , दोन ठिकाणी भोसल्यांच्या दोन शाखा स्वराज्यासाठी आपली मुळे घट्ट करतील.थोरल्या संभाजीराजांना आम्ही राजकारण आणि लढाईचे धडे गिरवून मुलखी आणि दरबारी कामकाजासाठी चांगलेच तयार केले आहे. ते आता स्वतंत्र कारभार पाहण्यासाठी सक्षम झाले आहेत .शिवाय मार्गदर्शन करायला आम्ही आहोतच.

राणीसाहेब आपण स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते जोपासले आता ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे . शिवबा तुमचे स्वप्न साकार करतील.शिवरायांना देखील आम्ही जवळून पाहिले आहे .ते देखील आपल्या सान्निध्यात चांगलेच तयार झाले आहेत. त्यांच्या अंगी असायला हवे तेवढे सगळे गुण बघून आम्हाला वाटते की, तुम्ही दिलेल्या शिकवणीतून शिवबाळ परिपूर्ण घडले आहेत.आता स्वराज्याचे स्वप्न साकार करण्याची वेळ आलेली आहे.’
कंपिलीत चार वर्षांचा कालावधी लोटला गेला. आणि राजांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ पुन्हा पुण्याला परतणार होत्या. शिवाजी महाराज व जिजाऊ यांची शहाजीराजांनी पुण्यामध्ये रवानगी करण्याची तयारी केली होती.

शहाजीराजांनी बेंगलोरमध्ये शिवाजीराजांना राजकीय शिक्षण देण्यासाठी निरनिराळे पंडित व शास्त्री अशा अनेक ज्ञानी व हुशार मंडळीची तर शिक्षण देण्यासाठी, मल्लविद्या व निरनिराळी शस्त्रे चालविण्याचे कौशल्य निर्माण करण्यासाठी त्यातील हुशार व वाकबगार लोकांची नेमणूक केली होती .शहाजीराजांनी शिवाजीराजांना पुणे प्रांतावर पाठवताना पूर्ण शिक्षण देऊन परिपूर्ण केले होते. पुणे येथे जाताना काही हत्ती ,घोडे, पायदळ, पिढीजात विश्वासू अमात्य ,त्याच प्रमाणे विख्यात अध्यापक, बिरुदे ,उंच ध्वज,विपूल द्रव्य त्याचप्रमाणे अद्वितीय कर्मे करणारे सैन्य देऊन चांगला दिवस पाहून शिवाजीराजांना पुणे प्रांतावर पाठवले .जाताना प्रभाव, उत्साह व मंत्र या तीन शक्ती, सेनासमूह आणि स्वतःची राजलक्ष्मी हे सर्व घेऊन राजे पुण्यास निघाले होते.’ विख्यात अध्यापक’ पाठविल्याचा उल्लेख या ठिकाणी मला फार महत्त्वाचा वाटतो. कारण पुणे प्रांतात आल्यावर शिवाजीराजांचे विविध विद्या आणि कला यांमधील शिक्षण याच कुशल अध्यापकांकडून झाले.

श्रुती ,स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत ,राजनीतिशास्त्र ,बहुविश्विवभाषा, पद्यरचना ,सुभाषिते, काव्य-शास्त्र ,फलज्योतिष ,सांग, धनुर्वेद,अश्वपरीक्षा ,गजपरिक्षा,अश्वारोहण ,गजारोहन तलवार, पट्टा, भाला ,चक्र इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला ,बाहूयुद्ध ,युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रूप्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रुपक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, रत्न परीक्षा इत्यादी सर्व कला व शास्त्रे एकच एक पंडित शिकवू शकले नसते म्हणून शहाजीराजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णात असणारा एक अध्यापक वर्गच शिवाजीराजांबरोबर कर्नाटकातून पाठिवला होता.हा सर्व निष्णात आध्यापक वर्ग पुणे जहागिरीत राजमाता जिजाऊंच्या पूर्ण देखरेखीखाली कार्यरत होता.
बंगळूरहून पुण्याकडे जाताना शिवाजीमहाराजांबरोबर सामराज नीळकंठ यास पेशवा म्हणून ,बाळकृष्ण हणमंते यांना मुझुमदार म्हणून, माणकोजी दहातोंडे यांना सरनौबत म्हणून, रघुनाथ बल्लाळास सबनीस म्हणून, तर सोनोपंतास डबीर म्हणून पाठवले होते. या प्रधान मंडळाचे रूपांतर पुढे अष्टप्रधान मंडळात झाले .अशा प्रकारचे प्रधानमंडळ सैन्य,खजिना, ध्वजमुद्रा अशा जय्यत तयारीनिशी शहाजीराजांनी शिवाजीराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली होती.
.एक प्रकारे शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असणारी राज्यकारभाराची चौकटच निर्माण करून, त्यांच्याबरोबर पाठवली होती.जिजाऊ जेव्हा कंपिलीत आल्या तेव्हा त्यांच्यासोबत अवघा पंचवीस-तीस लोकांचा सरंजाम होता. मात्र चार वर्षांनी पुण्यात परतताना जिजाऊसोबत होता पूरक असा शहाजीराजांनी दिलेला सरंजाम.

कारभारासाठी एखादा महालष्करी सरंजाम देखील पुरेसा होता;पण शहाजीराजांनी अवघ्या 36 गावाच्या कारभारासाठी जिजाऊंच्या मदतीला पेशवे, मुजुमदार ,डबीर ,सबनीस आणि कारकून असे मंत्रिमंडळच पाठवले होते .शहाजीराजांनी जिजाऊंना केवळ मंत्रिमंडळच दिले नाही तर त्यांच्या हाती त्यांनी स्वतंत्र राजमुद्रादेखील सोपविली होती.शिवबांच्या भावी आयुष्यात ती वापरली जाणार होती.संस्कृतमध्ये ह्या राजमुद्रेवर लिहिले होते. प्रतिपचंद्रलेखेव | वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो: शिवस्यैषा | मुद्रा भद्राय राजते || याचा अर्थ असा होतो. “प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी व विश्वाला वंद्य असणारी ही शहाजीपुत्र शिवाची मुद्रा कल्याणासाठी शोभून दिसत आहे ”

छत्तीस गावांच्या कारभारासाठी संस्कृत राजमुद्रा वापरली जाण्याची ही पहिलीच घटना होती .जे स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते ते पूर्ण करण्यासाठी शहाजीराजांनी प्रयत्न सुरू केले होते .शहाजीराजांनी शिवाजींराजांच्या हाती भगवा ध्वज दिला व त्यांना म्हणाले,” बालराजे,हा ध्वज शंभू महादेवाचा आहे.या ध्वजाचे पावित्र्य, प्रतिष्ठा आपल्याकडून राखली जावी.हा भगवा ध्वज आपल्याला सतत शौर्य आणि त्यागाची आठवण करून देईल. ह्या ध्वजाच्या केवळ दर्शनानेच आपल्या मनात पराक्रमाची स्फूर्ती जागेल.हा चैतन्यमयी ध्वज आहे.हा ध्वज सतत आपणास आपल्या कर्तव्याची आठवण करून देत राहील.” राजानी एवढं तर दिलंच, शिवाय हत्ती, घोडे आणि पायदळ देखील शिवबांसोबत पुण्याला पाठवले. शिवाय शहाजीराजांचे आशीर्वाद तर त्यांच्या पाठीशी होतेच.

शिवाजीमहाराजांच्या बरोबर पाठविल्या जाणाऱ्या व्यक्ती अनुभवी ,मुत्सद्दी आणि धोरणी होत्या.
अखेर जाण्याचा दिवस आला. जिजाऊसाहेब मेण्यात स्थानापन्न झाल्या. शिवबा घोड्यावर बसले. जिजाऊंच्या डोळ्यात शहाजीराजांना व राजकुटुंबाला सोडून जाण्याचे दुःख होते ; पण क्षणात ते दुःख त्यांनी बाजूला सारले आणि आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी निघाल्या. अग्रभागी असलेले पाऊल पुढे टाकले. आवाज सर्वत्र घुमू लागला .ढोल-ताशे वाजू लागले. पायदळी तुकड्यात भगवे नाचू, कडाडू लागले. यांचा आवाज आकाशात घुमू लागला.

हर हर महादेव, हर हर महादेवच्या गर्जनात लष्कर पुढे सरकू लागले. राजमाता जिजाऊ आपले स्वप्न पूर्ण करण्याकरिता पाऊल पुढे सरकवत होत्या.मनी राजांना सोडून जाण्याचं दुःख होतं ; परंतु डोळ्यात मात्र स्वप्नपूर्तीचे भाव होते .आजपर्यंत पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्यासाठी टाकलेले ते पहिले पाऊल होते .जिजाऊ मेण्यात बसल्याबसल्या स्वराज्य स्थापनेचा विचार व पुढील योजना आखत होत्या .

बेंगलोर मधून परतल्यानंतर जिजाऊंची खरी परीक्षा सुरू होणार होती .शहाजीराजे व जिजाऊ साहेबांनी विशिष्ट ध्येय ठेवून पुणे प्रांतीच्या आपल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी शिवबांना पुण्याला ठेवण्याचा निर्णय घेतला होता.शहाजीराजांचा हा निर्णय अत्यंत मुत्सद्दीपणाचा होता .पुणे जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी शहाजीराजांनी शिवाजीराजांची नेमणूक केली होती. यातच स्वराज्य निर्मितीची बीजे पेरलेली दिसून येतात.

स्वराज्य निर्मितीमधे राजमाता जिजाऊसाहेब यांच्या प्रमाणे शहाजीराजांचासुद्धा सहभाग तितकाच महत्त्वाचा होता.अशा रीतीने शिवाजीमहाराजांच्या स्वराज्य निर्मितीसाठी जिजाऊसाहेब प्रेरक शक्ती होत्या तर शहाजीराजे स्वराज्यसंकल्पक होते.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

जिजाऊ व शिवबा

बाजींद कांदबरी

Leave a Comment