राजमाता जिजाऊ साहेब व शिवराय यांचे पुण्यात आगमन
राजमाता जिजाऊसाहेब ग्रंथमाला भाग १५…
राजमाता जिजाऊ व शिवराय बेंगलोरहून पुण्यात परतल्या त्या असामान्य आत्मविश्वास घेऊनच. शहाजीराजांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास प्रत्यक्षात उतरविण्याची मोठी जबाबदारी जिजाऊयांचेवर होती. त्यांना परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी झटावे लागणार होते .लोकांचा स्वाभिमान,जागवायचा होता. त्यांना गुलामगिरीची जाणीव करून द्यायची होती .जणू सर्व सोडून नव्या युगाची सुरुवात करायची होती. स्वराज्य विचारांचे बीजारोपण करायचे होते. जहागिरीचा कारभार पाहण्याचे निमित्त सांगून सर्वत्र स्वराज्याचे विचार रुजवायचे होते .लोकात आत्मविश्वास निर्माण करायचा होता.
पुण्याची अवस्था अतिशय दयनीय अशी झाली होती .सर्व जमिनी नापीक ठेवल्यामुळे उजाड व पडीक राहिल्या होत्या. सगळीकडे गवत , काटेकुटे वाढले होते. भीतीपोटी लोक जंगलात व रानावनात आश्रयाला गेले होते. परकीयांच्या अमलाखाली लोक गांजून गेले होते. स्त्रियांवर बलात्कार, हिंदूचे खून, मंदिराचा विध्वंस , गोवध असे अनन्वित प्रकार उघड होत होते. सुलतानाच्या अत्याचारांनी प्रजा होरपळून निघत होती .सुलतानाचे सैनीक केव्हाही येत,लुटमार,जाळपोळ करीत .स्त्रियांना बळजबरीने उचलून नेत. विजापुरमध्ये असताना रस्त्यावर चाललेल्या गाईचा वध शिवाजी महाराजांनी पहिला होता. परकीय राज्य केवळ दिखाऊपणावर चालले होते .त्यांची खरी शक्ती किती आहे हे शहाजीराजांनी अनेक वेळा पाहिलेले होते. अशा सर्व निरीक्षणातून जिजाऊंचा स्वाभिमान जागृत होऊन त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.
आदिलशहाने मुरार जगदेव या पंडित ब्राह्मण सरदाराला शहाजीराजांविरुद्ध पाठवले होते . शहाजीराजे त्यावेळी जुन्नर परिसरात होते. हे शहाजीराजांचे जहागिरीचे ठिकाण होते. पुण्यात राजांचे अनेक वाडे ,हवेल्या होत्या. मुरार जगदेवाने पुण्यावर आक्रमण करून पुण्याचा संपूर्ण विध्वंस करून टाकला होता . पेठा लुटल्या ,वेशी पाडल्या, वाडे जमीनदोस्त केले .लोकांची घरे-दारे पाडून त्यांच्यात दहशत निर्माण करून त्यांना तिकडून हाकलून लावले.मुरार जगदेवराव एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने भोळ्याभाबड्या लोकांच्या डोक्यात अंधश्रद्धा बसविण्याच्या हेतूने धार्मिक दहशत बसवून तिथे गाढवाचा नांगर फिरवला. कारण त्या वेळेच्या धर्मशास्त्रानुसार ज्या जमिनीवर गाढवाचा नांगर फिरतो, तेथे जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल .लोकांनी तेथे येऊन परत वस्ती करू नये म्हणून अशा खोट्या अफवा पसरवल्या जात होत्या.
पाच-सात वर्ष पुण्याची भूमी संपूर्णपणे उजाड झाली होती . या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा पसरविणाऱ्या, खोटारड्या असल्या तरीही लोक घाबरून निर्वंश होण्याच्या भीतीने पुण्यात येण्याचे धाडस करत नव्हते . दूर आसपासच्या जंगलात, डोंगरदऱ्यातून जाऊन राहत होते.
पुण्यात जहागिरीनिमित्त शहाजीराजे सारखे ये – जा करत होते त्यांनाही पुणे आवडत होते. शहाजीराजे व जिजाऊंना मानणारे लोक पुण्यात भरपूर होते. शहाजीराजांच्या लष्करातील अनेक लोक, अनेक मावळे पुण्याच्या आजूबाजूचेच होते. पुण्याच्या जवळची माणसे काटक, चपळ, प्रामाणिक व माणुसकी जपणारी होती. म्हणूनच जिजाऊंना सर्व माणसे आपली वाटायची. जिजाऊनी पुण्यात राहून शिवाजी महाराजांना कारभार शिकवण्याचा निर्णय घेतला होता. जिजाऊंचे माहेर देवगिरीच्या यादवांचा वारसा सांगणारे तर ,सासर उदयपूरच्या राजघराण्याचा वारसा सांगणारे होते. त्यांच्या तेजस्वी पुत्रास दोन्ही घराण्यांचा ऐतिहासिक वारसा प्राप्त झाला होता. या घराण्यांच्या परंपराची आठवण देऊन शिवाजीमहाराजांना सुसंस्कृत करण्याचे कार्य जिजाऊंनी सुरू केले होते. आपल्या पुत्राने या थोर परंपरांना पुनरुज्जीवित करावे असे जिजाऊंना वाटणे स्वाभाविक होते.
जिजाऊंना आपले स्वतंत्र राज्य पाहिजे होते .त्यांना स्वराज्याची भूक लागली होती .जगावेगळ्या आमच्या जिजाऊ मासाहेब होत्या .मेणा- पालखी ,दागदागिने ,श्रीमंती, ऐश्वर्य यातच रमणाऱ्या त्या नव्हत्या. मराठ्यांच्या रयतेच्या मुलखाची धूळधाण उडालेली दैना त्यांना पाहवत नव्हती. इतर सरदारनीसारखे दागिने घालून मेणा, पालखीत मिरवणाऱा त्यांचा स्वभाव नव्हता.दास्याची कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. स्वतःचे राज्य ,स्वतःचे सिंहासन, आपली फौज ,आपली प्रजा सर्व काही त्यांना हवे होते. मराठ्यांना स्वतंत्र राज्य ,स्वतंत्र राजा असावा असे त्यांना सारखे वाटत होते. आपल्या रयते बद्दल त्यांना फार प्रेम व कळकळ वाटत होती.
जिजाऊंनी जाधवरावांच्या घरात राजकारणांची उकल करण्याचे अनेक धडे गिरवले होते .आपल्या वडिलांनी, भावांनी या मुसलमानी तक्ता साठी प्राण दिले .काय चिज झाले त्यांचे ? या साऱ्या विचाराने आऊसाहेब हैराण होऊ लागल्या होत्या .त्यांना खूप चीड यायची, परंतु पुढे काही मार्ग दिसत नव्हता .
आपल्या जहागिरीमध्ये महाराजांना राज्यकारभाराचे पहिले धडे आपल्या मातेकडूनच मिळाले होते. जहागिरीची व्यवस्था पाहत असता, जिजाऊंनी अनेकदा तंट्याचे निकाल स्वतः दिले होते.त्यांनी वतने व देणग्या दिल्याचे ऊल्लेखही आढळतात.त्यांनी दिलेल्या पत्रांवर ‘जिजाआऊ वालिदा इ राजा शिवाजी’असा शिक्का आढळतो.पुढेसुद्दा जेव्हा जेव्हा मोठ्या संकटाला सामोरे जाण्याचे प्रसंग शिवरायावर आले तेव्हा तेव्हा ते आपल्या राज्याची सर्व व्यवस्था आपल्या मातेकडे सोपवून जात असत.जिजाऊंच्या ठिकाणी राज्यकारभार कौशल्य होते. स्वाभाविकच अशा मातेपासून राज्यकर्त्याने अंगी बाणवायचे गुण महाराजांनी घेतले होते.
जिजाऊं व शिवरायांनी स्वातंत्र्याचा ध्यास घेतला होता. जिजाऊसारखी अत्यंत धाडसी ,साहसी, स्वाभिमानी,मुत्सद्दी, महत्त्वाकांक्षी ,बुद्धिमान ,न्यायी अध्यात्मिक ,अन्यायाचा प्रतिकार करणारी ,संकटाला न घाबरता मात करणारी ,अत्यंत निग्रही अशी माता शिवाजीराजांना लाभली होती. शिवाजी महाराजांवर मातृ प्रेमाचा वर्षाव करत असताना त्यांनी आपली कठोर शिस्त तसूभरही मोडू दिली नव्हती .आपल्या मुलाबद्दल कितीही प्रेम असले तरी स्वराज्याच्या उभारणीच्या कार्यात ते आड येऊ दिले नाही.
शिवाजीमहाराजांना घडवण्यात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व जडणघडणीत जिजाऊसाहेबांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. शहाजीराजे कर्नाटकात असताना मोठे पुत्र संभाजीराजे आपल्या पित्या सोबत होते. त्यावेळी जिजाऊंनी शिवाजीराजे यांना स्वतःसोबत महाराष्ट्रात आणून अतिशय मेहनतीने व त्यागाने हिंदवी स्वराज्याची उभारणी केली.
पुणे जहागिरी ,बेंगलोर अशी घाई गडबडीची ,धावपळीची जात असतानाही पुणे, सुपे सर्व मावळांची आसपासच्या परिसराची भौगोलिक , सामाजिक व राजकीय परिस्थितीचे आकलन करून घेऊन स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने पाऊल उचलले.
आपल्या पूर्वजांचे ,आपल्या पतीचे पराक्रम पाहून जिजाऊंना नक्कीच वाटत होते की आपला मुलगा खूप मोठा कोणीतरी होऊन स्वराज्याचे रक्षण करेल. जिजाऊंना वाटे शहाजीराजांचे शौर्य, धैर्य व पराक्रमाचा वारसा बालशिवाजी घेणार आम्ही त्यांना आमच्या मुशीत घडवणार .ही मूस आमच्या विचारांची आणि शिकवणुकीची असेल. जिजाऊंच्या विचारांची व्यापकता, दूरदृष्टी ,तडफ, जिद्द ,चिकाटी, स्वाभिमानी वृत्ती ,स्वतंत्र बाणा, अन्यायाविरुद्धची चीड , स्वातंत्र्याचा ध्यास हेच संस्कार त्यांना शिवबा वर करायचे होते .”स्वतंत्र राज्य निर्माण करण्याविषयी आत्मविश्वास राजांना वडिलांकडून मिळाला असला तरी जिजाऊंनी शिवरायांच्या मनावर माणुसकीचे आणि नैतिकतेचे संस्कार केले होते. संकटावर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे धैर्य त्यांच्या मनात फुलविले .त्यांना प्रजेच्या हितात स्वतःचे हित मानावयाला शिकविले .आपल्या या छोट्याशा बाळाचे एका मोहरलेल्या, बहरलेल्या व्यक्तीमत्वात रूपांतर केले.
जिजाऊ म्हणजे शिवरायांच्या माथ्यावरची सावली होती. जिजाऊंनी शिवाजीराजांना धाडसी मोहिमेसाठी राजकिय मार्गदर्शन केले त्याला इतिहासातो तोड नाही .यावरूनच त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेचा अंदाज येतो.कठीण परिस्थितीत जिजाऊंचा हा लढा शिवाजीराजांना खूपच मार्गदर्शक ठरला. प्रत्येक मोहिमेवर जाताना शिवराय आपल्या आईशी चर्चा करूनच मोहीम आखत होते . जिजाऊंच्या प्रत्येक सूचनांचे ते पालन करत. म्हणूनच प्रत्येक मोहिमेत यशस्वी होऊनच ते परत येत . कोणत्याही नवीन कार्याविषयी आईशी चर्चा ,विचार विनिमय ,नवीन धोरण,मसलत प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवाजीराजे जिजाऊंचे सहकार्य घेतल्याशिवाय पुढे जात नसत .आपल्या आईचे दर्शन व आशीर्वाद यावर शिवरायांची खूप श्रद्धा होती .आईच्या आशीर्वादाने व दर्शनाने आपल्याला यश मिळते ही भावनाच किती अर्थपूर्ण होती.’ गनीम दमानी पडोन हारीस आला जेर जाहला तरी एकाएकी उडी घालू नये. दुरूनच चौगिर्द घेऊन मांत्रिकाचा मार देत असावे .दंगेखोर गनीम आपण जेर झाले ,असे जाणून दगाबाजीने कौल घेतो. तरी त्यास जवळ बोलावू नये, यासारख्या आज्ञापत्रातील जिजाऊंच्या आज्ञा होत्या .
जिजाऊंनी शिवबाला इतिहास घडवण्यासाठी प्रेरित केले.जिजाऊंनी शिवबाला सांगितले की,शिवबा असे राज्य निर्माण करा की, इथल्या गोरगरीब ,दीनदलित ,शोषित ,पीडित, कुणबी ,शेतकरी ,वंचित ,कष्टकरी या सर्वांना हे राज्य आपले वाटले पाहिजे. कोणतेही काम एकटा माणूस करू शकत नाही .एकीचे बळ असावे लागते हे समजून त्यांनी शिवबाच्या बरोबर त्यांच्या इतर सहकारी मावळ्यांनाही घडवले. जातीच्या पलीकडे जाऊन रयतेच्या स्वातंत्र्याचा, भविष्याचा ,सुखाचा, समृद्धीचा विचार जिजाऊंच्या स्वराज्य कल्पनेत होता. जिजाऊ या फक्त शिवरायांच्याच माता नव्हत्या तर सर्व रयतेच्या प्रेरणास्थान होत्या. जिजाऊनी नेहमीच भावनेला महत्त्व न देता कर्तव्याला महत्त्व दिले. म्हणूनच शिवरायांना स्वतंत्री हिंदवी स्वराज्याची स्थापना करता आली.
अशाप्रकारे जिजाऊंनी दिलेल्या निर्णयावर एवढा अढळ विश्वास दाखवून त्याची अंमलबजावणी अनेक पिढ्यापर्यंत चालत राहिली. एवढे आदर्श व्यक्तिमत्व जिजाऊंचे होते.
लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
संदर्भ – राजमाता जिजाऊसाहेब, संस्कृती प्रकाशन पुणे