महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,652

लखुजीराजे जाधवराव जिजाऊंचे पिता

Views: 3949
4 Min Read

लखुजीराजे जाधवराव जिजाऊंचे पिता

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग २

जाधवरावांचे घराणे म्हणजे वीरांची खाणच होती .या कुळातले राजे अतिशय शूर ,पराक्रमी व धाडसी होते.
प्राण गेला तरी चालेल पण वचन मोडता कामा नये .असे त्यांचे ब्रीद होते.या वंशाच्या अनेक पिढ्यांनी रयतेला लोककल्याणी राज्य दिले. हे राजे स्वतःसाठी नाहीतर रयतेसाठी राज्य करत .रयत हेच राजांचे ध्येय असे. लखुजीराजे जाधव यांचे घराणे म्हणजे महाप्रतापी घराणे होय.

या जाधवरावांनी दक्षिणेतील जिंजी, तंजावर पासून ते उत्तरेतील काबूल , कंदाहार पर्यंत आपली तलवार गाजवली. यांच्या घराण्यातील प्रत्येक बालकाला जगात येताच हातात तलवार घ्यावीच लागे. या जाधवरावांना सुभेदार मल्हाररावजी होळकर यांनी म्हटले आहे की , “तुम्ही मराठ्यांची काशी आहात व तालीबंद सरकार आहात”, जाधवरावांचे घराणे अत्यंत पराक्रमी होते . खुद्द लखुजी राजांनी पराक्रमाच्या जोरावर निजामशहाला व मोगलांना झुंजवीत ठेवले.मलिक अंबरला वराडचा भाग मिळवून देण्यात खूपच मदत केली होती.पुढे मलिक अंबरचे व लखुजी राजांचे पटेनासे झाले. त्यावेळी ते मोगलांना जाऊन मिळाले. चांदबीबीने ज्यावेळी अहमदनगर लढविले, त्यावेळी लखुजीराजांनी खुप तलवार चालवली व मर्दुमकी गाजवली.जाधवरावांच्या बखरीमध्ये लखुजीराजे यांचे वर्णन लखुजी जाधवराव देशमुख , सरकार दौलताबाद , सिंदखेडकर,  निजामशाही मनसबदार असे केलेले आढळते.
शहाजहान बादशहाने लखुजी जाधव रावांसारखे दक्षिणेतील मुरब्बी, मुत्सद्दी ,थोर योद्धे व अव्वल दर्जाचे इमानी सरदार निजामशाही तून फोडून आपल्याकडे ओढून घेतले. 24,000 शिपाई व 15,000 घोडेस्वारांची मनसब लखुजी राजांना शहाजहान बादशहाने बहाल केली होती.

लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील पहिले थोर मराठा सरदार व फार मोठी असामी होती.सत्त्तावीस महालांची त्यांना जहागिर होती .जाधवरावांच्या घरी अक्षरशः लक्ष्मी पाणी भरत होती.ऐश्वर्य ओसंडून वाहात होते.
त्यावेळच्या काळात कित्येक मराठी घराणी स्वतःची घोडी व सैन्य घेऊन मर्दुमकी गाजवत , नाव मिळवत व जहागिरीचे धनी होत. जाधवरावांचा त्यावेळेचा सरकारी थाट कोणालाही मोहवून टाकेल असाच होता .मध्यभागी लोडास टेकून बसलेले लखुजी जाधवराव व सभोवती मानाप्रमाणे बसलेली सरदार मंडळी पाहून चांदण्याच्या समुदायातील चंद्राची आठवण होई. लखुजीराजे दक्षिणेतील मुरब्बी, मुसद्दी, थोर योद्धा व अव्वल दर्जाचे इमानी सरदार होते .असा उल्लेख ग्रँट डफने आपल्या ग्रंथात केला आहे. यावरून लखुजी जाधवराव यांची कीर्ती किती महान होती, हे लक्षात येते .
सिंदखेडराजाला लखुजी जाधवरावांमुळे काशीचे महत्व प्राप्त झाले. म्हणूनच सिंदखेडला दक्षिणेची काशी म्हणून ओळखतात.सन 1598 मधे जिजाऊमातेचा जन्म झाला व सिंदखेडराजा हे ऐतिहासिक क्षेत्र मध्ययुगीन शिवशक्तीचे अधिपीठ झाले. सिंदखेड राजाला एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले व लखुजी जाधवराव यांची राजधानी म्हणूनही याला महत्त्व आले .

लखुजी जाधवरावांच्या उत्कर्षाच्यावेळी भारतात वेगळ्यावेगळ्या ठिकाणी मुस्लिम सत्ता अस्तित्वात होत्या. मुस्लिम सत्तेच्या वेळी, हिंदू समाज व हिंदूधर्म यांच्यावर अगणित अत्याचार केले गेले. मराठा सरदांरावर मुस्लिम सत्तेचे वर्चस्व होते. छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्वराज्य निर्माण केले .या पार्श्वभूमीवर जाधवराव घराण्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली होती. लखुजी जाधवरावांच्या उदयामुळे राजकीय,सामाजिक , आर्थिक, धार्मिक या मुस्लिम सत्तेचे वर्चस्व हळूहळू कमी होत गेले.
लखुजीराजे यांच्या पत्नी म्हाळसाबाई ऊर्फ गिरीजाबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील असून वणगोजी नाईक-निंबाळकर यांच्या त्या बहीण होत . म्हाळसाबाईं व लखुजीराजे यांच्या पोटी दत्ताजी ,अचलोजी ,बहादूरजी आणि रघुजी हे चार पुत्र व जिजाऊ या एक कन्या जन्मास आल्या.
“आता कळले ,कोण होते आणि कसे होते. सिंदखेडचे देशमुख जाधवराव? अगदी रघुवंशीय भोसले कुळाला साजेसे सोयरे होते हे यदुवंशीय जाधवराव!”

लेखन – (इतिहास लेखिका) डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
संदर्भ :- राजमाता जिजाऊ साहेब

Leave a Comment