शहाजीराजे जिजाऊ विवाह
राजमाता जिजाऊ साहेब चरित्रमाला भाग ०५
शहाजीराजे जिजाऊ विवाह – शहाजीराजे व जिजाऊसाहेब यांचा विवाह म्हणजे दोन शूर, सामर्थ्यशाली व तितकेच प्रतिष्ठित तोडीस तोड घराण्यांची सोयरीक होती.शहाजीराजे व जिजाऊसाहेब यांचा विवाह म्हणजे स्वराज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण घटना होती. लखुजी जाधवराव व मालोजीराजे भोसले हे तितकेच तोलामोलाचे सरदार होते. म्हणूनच त्यांच्यात नातेसंबंध घडून यावे असा विचार झाला व त्याप्रमाणे तो अमलातही आला.लखुजीराजे जाधवराव व मालोजीराजे भोसले एकत्रच पराक्रम गाजवत होते,तेव्हा दोघांनी आपल्या इच्छेनुसार विवाह निश्चित केला. जाधवराव -भोसले घराणी पूर्वीपासूनच नातेसंबंधांने जोडली होती. या संबंधांना परत उजाळा देण्याचाही प्रयत्न या लग्नामुळे झाला .
मालोजीराजे भोसले यांची इच्छा होती शहाजीराजांचे लग्न सिंदखेडकर लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाऊ यांच्याशी व्हावा. लखुजीराजे ही निजामशाहीतील फार मोठी आसामी होती.परंतु या सर्वाहूनही मोलाचा ठेवा म्हणजे त्यांची लेक जिजाऊ.जाधवरावांच्या अंगणात चमकणार्या एका चाणाक्ष चतुर चांदणीवर मालोजीराजे भोसले यांचे लक्ष खिळले होते.हीच आपली सून व्हावी अशी त्यांची खुप ईच्छा होती. जाधवरावांची ही लेक होतीच तशी देखणी व बहुगुणी ,जशी सोन्याच्या समईतील लवलवती सोनेरी ज्योतच. चपळ, नाजूक, सुंदर ,हुशार,प्रसन्न आणि तितकीच ज्वलंत दीपकळी.हसर्या शहाजीराजांच्या शेजारी जिजाऊ शोभाव्या कशा ? अभिमन्यूशेजारी उत्तरा जशा.खरोखरच जिजाऊसारखे कन्यारत्न श्रीने पैदा केले होते!
आपले भाऊ मालोजीराजे भोसले यांच्या ईच्छेनुसार विठुजीराजे भोसले यांनी लखुजीराजे जाधवरावांशी विवाहाची बोलणी लावली .सनईची लकेर उठली. लखुजीराजे जाधवराव तर हरखूनच गेले .शहाजीराजांसारखा सोन्याचा तुकडा जावई म्हणून लाभतोय, हे पाहून ते आनंदले.लगीन घाई सुरू झाली.कामाधामांची गर्दी उडाली .शुभ मुहूर्त पाहिला.कुंकवाचे टिळे लावले.तांबडे तुषार उडाले. दरवाज्यावर गणरायांनी आसन मांडले.मांडव पडला .बोहले सजले .
ढोल -ताशे -चौघडे- शहाजणे- सनई आपापले सूर धरू लागले.अन एक दिवस वर्हाडी मंडळी आलीच. जाधवरावांची परकरी जिजा आता लगीन साज सजली.हळद लागली .नितळ गोर्यापान पायावर हळदी कुंकवाची स्वस्तिके रेखली गेली.दो हाती हिरवा चुडा किणकिणू लागला.अंगावर मोराची हिरवीकंच पैठणी आली. भाळी मळवट भरला.त्यावर अक्षता चिकटल्या. मुंडावळ्या आणि बाशिंग भाळावर विराजले.अंगावरचे मौल्यवान सोन्या ,हिर्यामोत्यांचे दागिने, शेला अन पदर सांभाळता सांभाळता लहानग्या जिजाऊ पार दमून गेल्या.
लगीन साज ल्यायलेल्या जिजा राणीच्या भांगात रत्नजडित बिंदी चमकत होती.
सरळ नासिकेतील नथ चांदण्या फेकीत होती .कानात मोत्याचे झुबे डुलत होते. कमरेवर जडावाचा कंमर पट्टा शोभत होता. दंडावरती सुबक घडीव वाक्या होत्या. पायात तोडे , साखळ्या , जोडवी, मासोळी ,हातामधे लखलखत्या हिर्याच्या बांगड्या चमकत होत्या. वेणीवर फुलांची जाळी असून त्यात रत्नांचे रेखीव अलंकार घातले होते.टपोर्या भावभ-या नेत्रात काजळ दाटून आले होते.नखशिखांत सोन्यामोत्याने मढलेली सही सही लक्ष्मीच जणू! शहाजीराजेही लगीन साज सजले होते.त्यांनाही हळद लागली. कपाळावरील शिवगंध अधिकच हसर झालं होत.ओठांवरील मिसरूड आणखीनच काळवंडल. मस्तकावरील मुक्त केशसंभार टोपाखाली अलगत बसला होता. गळ्यात पाणीदार मोत्यांचा कंठा रूळू लागला होता.नवरदेवाचे तेज नेत्रात तळपू लागले होते.
मुहूर्ताची घटका बुडाली.तोफा बंदुकांचा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला .अंतरपाट दूर झाला . शहाजीराजांनी आपल्या हातातील पुष्पमाला जिजाऊंच्या गळ्यात घातली. शहाजीराजांच्या शेल्याची जन्म गाठ बांधून घेऊन जाधवांच्या राजकन्या जिजामाता भोसल्यांच्या राजलक्ष्मी झाल्या. शहाजीराजे आणि जिजाईचा जोडा लक्ष्मीनारायणा सारखा सुंदर दिसत होता.अहो, अभिमन्यूला – उत्तरा,शंकराला पार्वती शोभावी त्याप्रमाणे शहाजीराजांना जिजाऊ खुलून दिसत होत्या .हसर्या शहाजीराजांच्या शेजारी तितक्याच हसर्या लाजर्या जिजाऊ खरोखरच दृष्ट लागाव्या अशाच दिसत होत्या.
कोणतीही मुलगी लग्नात सुंदर दिसतेच.ते लगीन तेज असतेना! पण जिजाऊ मुळच्याच रूपाने सुंदर होत्या. त्यातून लग्नाचा साज सजलेली सही सही लक्ष्मीच.दुसरी उपमाच नाही.गोड शब्द स्वर, प्रेमळ बोलणे ,विनयी वागणे आणि प्रसन्न हसणे .अशी जिजाऊंची मूर्ती होती. रुंद छातीच्या ,पुष्ट खांद्याच्या ,चमकदार डोळ्यांच्या, बळकट दंडाच्या व बाकदार नाकाच्या ,शौर्याने पृथापुत्र अर्जुनासारखा ,दातृत्वाने विक्रमादित्यासारखे,शस्रास्रात पटाईत असणारे जावई लखुजीराजांना न आवडतील तरच नवल.
मालोजीराजांनी हा विवाह शहाजीराजे लहान असतानाच पक्का केला होता. लखुजीराजांनी योग्य ,देखणा व कर्तृत्ववान मुलगा पाहूनच सर्वसंमतीने आपली एकुलती एक कन्या देण्याचा निर्णय घेतला होता .एकूणच लग्न सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा झाला. विवाहाला एकच दु:खाची किनार म्हणजे सोहळा पाहायला मालोजीराजे नव्हते. इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे धारातिर्थी पडले होते. सार्यांना खंत तेवढीच होती. मालोजीराजे स्वर्गाच्या गवाक्षातून अश्रूंच्या अक्षता टाकीत म्हणाले असतील की बाळांनो माझा आशीर्वाद आहे .उदंड आयुष्य लाभो. संसारी सुखाचे रामराज्य करा. शहाजीराजे व जिजाऊ साहेब यांचा विवाह म्हणजे दोन शूर सामर्थ्यशाली व प्रतिष्ठित घराण्यांची सोयरीक होती.
सारे विवाह विधी यथासांग पार पडताच शहाजी राजे आणि जिजाऊ जोडीने मातोश्री उमाबाईसाहेबांपुढे आशिर्वादासाठी वाकले.आपल्या सुनेचे देखणे रूप आणि शालिनता, वागणे पाहून उमाबाईसाहेबही आपले दुःख विसरल्या ,त्यांनी मोठ्या मनाने आणि भरल्या नेत्राने आशीर्वाद दिला. उमाबाई साहेबांना लेक नव्हती त्यामुळे जिजाऊंना पाहून उमाबाई साहेबांना अगदी धन्य धन्य वाटत होते. काका विठोजीराजांनाही धन्यता वाटली .खरोखरच भोसल्यांची भाग्यभवानी उदयाला आली होती.भोसल्यांच्या कुळात सौभाग्य आले. नवा आनंद आला .वराडची रुक्मिणी सोन्याच्या पावलांनी पुणे प्रांती आली. जिजाऊंनी सासरी येऊन आपल्या सासूचे दुःख हलके केले .सुनेच्या सहवासात उमाबाई पती निधनाचे दुःख विसरल्या.
हा विवाह म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणावी लागेल .कारण पुढे हिंदवी स्वराज्य सम्राट छत्रपती शिवाजीमहाराज यांचा जन्म शहाजीराजे व जिजाऊसाहेब या दोघांच्या पोटी झाला.
लेखन :- डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे (इतिहास लेखिका)
संदर्भ :- राजमाता जिजाऊ साहेब