महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,315

शहाजीराजे भोसले यांचा उदय

By Discover Maharashtra Views: 4588 4 Min Read

शहाजीराजे भोसले यांचा उदय

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला – भाग 6

शहाजीराजांच्या जन्मानंतर सन 1599 मध्ये शहाजीराजांचे आजोबा बाबाजी भोसले यांचे निधन झाले. त्यावेळी शहाजीराजांचे वय अवघे पाच वर्षाचे होते.पुढे पिता मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत धारातिर्थी पडले. त्यावेळी शहाजी राजांचे वय बारा वर्षाचे होते. मालोजीराजे यांच्या मृत्यूनंतर सर्व कुटुंब काका विठोजीराजांजवळ राहत होते. मालोजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची मनसब व जहागिरी शहाजीराजांकडेच कायम होती. शहाजीराजांचे बालपणाचे वर्णन फारसे आढळत नाही.परंतु शहाजीराजे प्रथम आपल्या मातेजवळ व नंतर आपले काका विठोजी यांच्याकडे राहून वाढले. तत्कालीन रिवाजाप्रमाणे त्यांना लढाईचे शिक्षण दिले गेले. त्याकाळात लेखन-वाचन व राज्यकारभारास आवश्यक असे सर्वसामान्य व्यवहारज्ञान देण्याची व्यवस्था त्याकाळी होती. लहान मुलांना वडिलांबरोबर दरबार, कचेरीत बसावयास लागे. त्यामुळे त्यांना मिळणारे अनुभव व ज्ञानाचा पाया भक्कम होत होता.

शहाजीराजांच्या काळात शिक्षक जे काही सांगावयाचे ते संस्कृत पुस्तकांच्या आधारेच सांगत असल्याने, संस्कृत भाषाही आपोआपच या सरदार मंडळीच्या मुलांना समजू लागत असे. तत्कालीन पद्धतीप्रमाणे आई-वडिलांच्या संस्कारातच मुले आपले ज्ञान विकसित करत असत. मालोजीराजांच्या अकाली मृत्यूने शहाजीराजांना त्यांच्या पित्याच्या सरंजामीची जबाबदारी वयाच्या पाचव्या वर्षीच घ्यावी लागली. सहाजिकच विठोजी राजे यांनी प्रत्यक्ष कारभार पाहिला असला तरी तो शहाजीराजांना साक्षी ठेवून पाहणे प्राप्त होते. शहाजीराजांचे वय लहान असल्याने विठोजीराजे यांनी शहाजीराजांच्या शिक्षणाची जबाबदारी फार चांगल्या रितीने पार पाडली. शहाजीराजे जरी प्रत्यक्ष कारभार पाहत नसले तरी, सदरेवर अथवा निजामशहाच्या दरबारात जाऊन आपल्या पंचहजारी मनसबेच्या जागेवर जाऊन इतर सरदारांचे मानाचे मुजरे त्यांना स्वीकारावे लागत. त्यामुळे दरबारी रितीरिवाज शहाजीराजांना लहानपणापासूनच अवगत होते.

शहाजीराजे वयाच्या पाचव्या वर्षीच निजामशाहीचे जहागिरदार झाले होते. रूपाने अत्यंत देखणे व तेजस्वी असे शहाजीराजे दिसत होते. त्यांची किर्तीही निजामशाही आणि आदिलशाहीत कदाचित इतर कुळातील सरदारांपेक्षा अधिक प्रस्तुत झालेली होती. शहाजीराजांच्या आई उमाबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील असल्यामुळे त्या अत्यंत धाडसी, दूरदृष्टी असलेल्या महिला होत्या. त्यांच्या देखरेखीखाली शहाजीराजे घडले व वाढले होते .त्यांना बालपणापासूनच राजकारण, समाजकारण जवळून पाहता आले, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला युद्धशास्त्र निपुणतेचे उच्चकोटीचे अधिष्ठान लाभले होतेच; परंतु त्यांचे मनावर चांगले संस्कारही झाले होते. त्यामुळे ते फक्त योद्धा नसून त्यांचे मन साहित्य -संगीत इत्यादी कलांकडेही आकर्षित झाले होते. मालोजीराजें कडून शूर, लढवय्येपण ,द्रष्टेपण आणि रयतेच्या सुखाला प्राधान्य देण्याचे औदार्य हे गुण पित्याकडून उचलले होते. तर आई उमाबाईराणी साहेबांकडून धाडस, दूरदृष्टी आणि गोरगरीब रयतेसाठी ‘करूणा’ हे गुण शहाजीराजांनी आत्मसात केले होते.

शहाजीराजे मुळातच महापराक्रमी राजे होते. त्यामुळे पुढे युद्धात त्यांची मदत मिळविण्यासाठी निजामशाही, आदिलशाही आणि मोगलशाही वेळप्रसंगी प्रयत्न करत होते. शहाजीराजे ध्येयधुरंदर व अत्यंत महत्त्वकांक्षी होते.राजनीती व प्रशासनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते.’ सत्ता ही खऱ्या अर्थाने सत्ताधीशांना नव्हे तर आम रयतेला सुखावणारी असावी, हे ब्रीद त्यांनी मालोजी राजांचाकडूनच शिकून घेतले होते. वडिलांच्या पश्चात आपल्या कारकिर्दीला निजामशाहीतून त्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. मोठ्या जबाबदारीने, इमानेइतबारे आपल्यावर सोपवलेले काम व लढ्याचे नेतृत्व ते असामान्य धैर्य, पराक्रम व संयम ठेवून करत असत. मुत्सद्देगिरी ,शौर्य ,युद्धनिपुणतेत त्यांच्या एवढा प्रसिद्ध योध्दा कोणीच नव्हता. प्राचीन संस्कृती व संस्कृत विद्येचे ते महान उपासक होते. त्यांचा स्वभाव कमालीचा मनमिळावू, दूरदृष्टीचा व विकास कार्याचा ध्यास असणारा होता. शेतकरी व रयतेविषयी ते कमालीचे अस्तेवाईक होते. स्वातंत्र्याचे थोर उपासक व प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांचा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरतोच.

मराठी मातीत स्वराज्य निर्मीतीचा पाया प्रथमतः शहाजीराजांनीच घातला.आपले स्वप्न आपल्या मुलांच्या हातून साकार करून घेणारा नवा पायंडा जगासमोर ठेवणारा हा राजा होता. स्वराज्य स्थापनेची स्फूर्ती जिजाऊ- शिवरायांना देणारा व स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता म्हणून शहाजीराजांचे योगदान लक्षणीय आहे.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment