भातवडीची लढाई,शहाजीराजांचा पराक्रम
राजमाता जिजाऊ साहेब चरित्रमाला – भाग 8
भातवडीची लढाई,शहाजीराजांचा पराक्रम – इ.स. 1623 जुलै यावेळी दिल्लीचा शहाजादा शहाजहान याने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. महाराष्ट्रात युद्धाचे ढग जमू लागले. मलिक अंबरन निजामशहाचा वझीर निजामशाहीच्या रक्षणासाठी विजापूरच्या आदिलशहाची मदत मागितली पण आदिलशहाने निजामशाहीला मदत करण्याऐवजी मोगलांशी दोस्ती केली. मोगल आणि आदिलशाही फौजा एक झाल्या व ऐंशी हजार फौजेनिशी निजामशाही वर चालून आल्या. त्या निजामशाहीत शहाजीराजे, शरीफजीराजे, विठोजीराजे सर्व मराठे सरदार होते.त्यात निजामशाहीचा जीव वाचवण्यासाठी मराठेच लढणार होते. या लढाईत शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला आणि दक्षिणेच्या राजकारणातील आपल्या तेजस्वी कारकिर्दीचा शुभारंभ केला.
खंडागळे हत्ती प्रकरणावरून जाधवराव -भोसले यांच्यात या घटना अगदी अनपेक्षित घडल्या ; मात्र याचा फायदा मलिक अंबर यांनी घेतला. निजामाकडे लखुजीराजे यांच्या विरोधात कान भरले.कारण ही दोन शूर घराणी कधीच एकत्र येऊ नये, अशी मलिकअंबरची इच्छा होती. लखुजी जाधवराव व शहाजीराजे सासरे -जावई म्हणजे एकदम जवळचे आप्त होते व त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.ही दोन्ही मराठा घराणे तोडीस तोड, महत्त्वकांक्षी शूर व स्वाभिमानी अशी होती. ह्या दोघांच्या पराक्रमामुळे आपले महत्त्व कमी होण्याचा धोका मलिक अंबरला वाटत होता. त्यामुळे खंडागळे हत्ती प्रकरणाचा धागा धरून मलिक अंबरने जाधव भोसले यांच्यात संघर्ष ठेवण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. लखुजीराजे लगेचच मोगलांकडे निघून गेल्यामुळे निजामशहा खूपच अडचणीत आला.
लवकरच दिल्लीच्या बादशाही फौजा पुन्हा एकदा निजामशाहीवर चालून आल्या. यावेळी आदिलशाही फौजा बादशाही फौजांना येऊन मिळाल्या.शहाजी राजे यांनी गनिमी काव्याने लढून या दोन्ही फौजांना हैराण केले व शेवटी भातवडी येथे या संयुक्त फौजांचा पराभव केला.( भातवडी हे गाव अहमदनगर पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे ) या लढाईमध्ये शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला.भातवडीच्या लढाईमध्ये अनेक मातब्बर मारले गेले. आदिलशाही सेनापती मुल्ला मोहम्मद, शहाजीराजांचे बंधू शरीफजी इत्यादी अनेक सेनानी रणांगणावर कामास आले. शहाजीराजांनी व सर्वच मराठ्यांनी पराक्रमाची कमाल केली . भातवडीच्या लढाईतील पराक्रमामुळे निजामशाहीच्या दरबारात शहाजीराजांची प्रतिष्ठा वाढली,खुद्द मलिक अंबरला सुद्धा त्यांचा निजामशहा कडून झालेला गौरव सहन होईना झाला. परिणामी शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग करून विजापूरच्या आदिलशाही दरबाराची वाट धरली. आदिलशहाने त्यांचा मोठा सत्कार करून त्यांना “सरलष्कर “हा किताब देऊन बादशाही कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर टाकून त्यांना पुणे, सुपे परगण्याची जहागिरी बहाल करण्यात आली.
भातवडीच्या युद्धात खरेतर लखुजीराजांनी भाग घेतलाच नाही. अर्थात शहाजीराजे आणि लखुजी राजे परस्परविरुद्ध लढल्याचे दिसत नाही. शहाजीराजे व लखुजीराजे यांच्यात कायमचे वितुष्ट असते, तर या संधीचा फायदा लखूजी राजांनी निश्चितच घेतला असता. परंतु भातवडीच्या युद्धात लखूजी राजांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आणि ते तेथून निघून गेले. यावरून जाधवराव भोसले यांच्यात कोणतेही वैर नव्हते हे या प्रसंगावरून दिसून येते.
शहाजीराजांनी आदिलशाही दरबारात आपले बस्तान बसविले होते. तरीही दरबारातील इतर सरदारांचा त्यांच्यावर रोष होता. एक मराठा सरदार अदिलशहाच्या दरबारात एवढ्या मोठ्या पदावर पोहोचतो हे त्यांना सहन होण्यासारखे नव्हते. हीच गोष्ट शहाजीराजांनी ओळखून आपल्या अवतीभोवती मराठा सरदारांची भक्कम अशी फळी उभा केली. जेणेकरून शहाजीराजांच्या राजकीय स्थानाला कोणीही आव्हान देऊ शकले नाही. आदिलशाही दरबारात मुस्लीम मानकर्यांशिवाय इतर कोणालाच वजीर करावयाचे नाही हा पायंडा शहाजीराजे आदिलशाहीत असल्यामुळे मोडला गेला.
अवघ्या दीड वर्षाच्या कालखंडात घडलेल्या या घडामोडींनी निजामशाही, आदिलशाही व मोगल सत्तेत प्रचंड उलथापालथ झाली .या घडामोडीचे शहाजीराजांच्या राजकीय कारकिर्दीवर फार दूरगामी परिणाम झाले.
शहाजीराजांनसारख्या शूर मराठी सरदारांचा उदय होऊन मराठा सरदारांना तीनही प्रमुख पातशाह्यांमधे मानाचे स्थान मिळत गेले. शहाजीराजांच्या पराक्रमाच्या दृष्टीने भातवडीचे युद्ध अत्यंत महत्त्वाचे ठरले. याच युद्धानंतर शहाजीराजे हे व्यक्तिमत्व राजकीय पटलावर विशेष चमकू लागले. शहाजीराजे व शरीफजी राजे यांनी या लढाईत विशेष शौर्य दाखवले.शरीफजीस आपल्या बाणांनी पाडणाऱ्या मोगल सैन्यावर शहाजीराजे तुटून पडले व त्यांनी मोगलांची दाणादाण उडवून दिली होती.
भातवडीच्या युद्धाने निजामशाहीचा बचाव झाला म्हणून इतिहासात हा प्रसंग ही लढाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शहाजीराजांनी पराक्रमाची व ,शौर्याची शर्थ करून निजाम सरदार मलिक अंबर यांना विजय मिळवून दिला. या विजयामुळे निजाम व मलिक अंबरला खूप आनंद झाला होता. त्यांना कळून चुकलेकी शहाजी राजांच्या शौर्याचा दरारा चारही पातशाहीत विलक्षण वाढला होता.मलिक अंबरने मोगलांशी पंचवीस वर्ष जो प्रचंड झगडा केला, त्यात मालोजीराजे व शहाजीराजे पितापुत्र उत्साहाने सामील झाले आणि त्याच कारणाने युध्द व राजकारण या दोन विषयाचा बहुमोल अनुभव भातवडीच्या युद्धाने शहाजीराजांना आला.या युद्धामुळे शहाजीराजांची प्रतिष्ठा वाढली ,त्यांना वगळून दक्षिणेत कोणतेही राजकारण सिद्धीस नेणे अशक्य झाले. मुख्यता गनिमी काव्याची युद्धपद्धती हे एक उत्कृष्ट साधन अनुभवाने सिद्ध झाले. एकदम समोर सामना न करता शत्रुस दाना वैरणीचा तोटा पाडून जंगली प्रदेशाच्या आश्रयाने त्यास जिंका वयाचे .हा जो क्रम पुढे शंभर-दीडशे वर्ष मराठ्यात रूढ झाला. त्याचा आरंभ या लढाईमध्ये झालेला आहे. जहांगीर, शहाजहान, औरंगजेब या त्रयीवर गनिमी काव्याने मराठ्यांनी मात केलेली आढळते .सर्वांना शहाजीराजांच्या सामर्थ्याचा शौर्याचा धाक निर्माण झाला. निजामशाहीचा बचाव झाला व शहाजीराजांचे नाव इतिहासात अजरामर झाले.
(भातवडीची लढाई,शहाजीराजांचा पराक्रम)
लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे ( इतिहास लेखिका )