महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,789

ऐतिहासिक राजवाडा, निगडी मसूर

By Discover Maharashtra Views: 3954 3 Min Read

ऐतिहासिक राजवाडा, निगडी मसूर

राजधानी सातारा येथील कराड तालुक्यातील मसूर जवळ निगडी हे ऐतिहासिक गाव. ग्वाल्हेरकर द ग्रेट मराठा म्हणून सुपरिचित असलेले महाराजा श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांचे चिटणीस बाळोजी चिटणीस व अबाजी चिटणीस यांनी बांधलेला हा ऐतिहासिक भव्य राजवाडा सुमारे ३०० वर्षा पूर्वीचा आहे.

ऊन, वारा, पाऊस झेलत  भक्‍कम अवस्थेत असलेला दर्शनीय भाग आजही पहायला मिळतो. काळाच्या ओघात व येथे कोणी वास्तव्यास नसल्याने आज या इतिहासाच्या साक्षीदाराची पडझड झाल्याचे  चित्र आहे. वाड्यामध्ये जुन्या धाटणीचा आड आहे. त्यामध्ये आजही भरपूर पाणी आहे. तसेच आतमध्ये इतिहासकालीन भक्‍कम दारे, भुयारे, अंबारी  आहे.

सध्या झाडाझुडपांच्या विळख्यांनी इतिहासाच्या या साक्षीदाराला सर्व बाजूंनी वेढले आहे. वास्तूची पडझड झाल्याने आतमध्ये कोणीही जात नाही. पण बाहेरून पाहिले या साक्षीदाराचा रूबाब पर्यटकांना आजही भुरळ पाडेल असाच आहे. पश्‍चिममुखी असलेल्या या वाड्याचे बांधकाम चिरेबंदी आहे. दरवाजा इतिहासकालीन आणि मजबूत आहे. त्याला पितळेच्या जुन्या कड्या व भवरे आहेत. श्रीमंत महादजी शिंदे घराण्याचे चिटणीस या वाड्यात राहत असत.

वाड्याच्या जवळचं एक मारुती रायचे मंदिर आहे. 17 व्या दशकातील हे हनुमान मंदिर असून जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. संपूर्ण पाषाणात उभारलेले पश्‍चिम मुखी मंदिर आहे. महादजी शिंदे यांच्या चिटणीसांनी हे मंदिर बांधले आहे. आज मंदिर ज्या ठिकाणी उभे आहे, त्याठिकाणी चिटणीसांचा तळे बांधण्याचा मानस होता.

त्यासाठी काम सुरू केल्यानंतर एक हनुमानाची स्वंयभू मूर्ती सापडली आणि या मूर्तीमधून रक्तस्त्रावही झाला. ( असे गावातील लोकांकडून सांगितले जाते ) त्याच रात्री चिटणीसांना दृष्टांत झाला की तळ्याऐवजी मंदिर उभारा आणि गावच्या दक्षिण बाजूला तळे बांधा. त्यापद्धतीने तळ्याचे दक्षिण बाजूला अस्तित्व आहे. तर पश्‍चिम महाराष्ट्रातील एकमेव शनि मारूतीचे मंदिर पश्‍चिम मुखी आजही मोठ्या दिमाखात उभे आहे. मंदिराच्या सभोवताली शिवकालीन बांधकाम असून मंदिरात पश्‍चिम बाजूला आवारात दोन दीपमाळा आहेत.

श्रीमंत महादजी शिंदे यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.

आता सध्या या चिटणीसांचे सर्व कुटुंबीय ग्वाल्हेर संस्थानात रहायला गेले आहेत. त्याचे सर्व रेकॉर्ड ग्वाल्हेरमध्येच असल्याचे समजते. सध्या वाड्याची तिन्ही बाजूंची चिरेबंदी काळाच्या ओघात नामशेष झाली असून वाड्याच्या अंतर्भागातील पुरातन अवशेष भग्न स्वरूपात पहावयास मिळतात. वाड्याचा जीर्णोद्धार न झाल्याने वाडा सध्या भग्नावस्थेत आहे. आपल्याकडे इतिहासाची आपल्या वडिलोपार्जित ठेव्याची तसेच संस्कृतीची जपून ठेवण्याची उदासीनता असल्याने येणाऱ्या पिढीला आपल्या पूर्वजांचा इतिहास पाहण्याचे अनुभवण्याचे भाग्य लाभेल ?  यात मात्र शंकाच आहे.

एन एच 4 महामार्गापासून साताऱ्याकडून कराड जाताना मसूर फाटा लागतो तेथून मसूर गावात याचे तेथून निगडी 3 किलोमीटर अंतरावर गाव आहे.

रामकुमार शेडगे

Leave a Comment