महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,233

छत्रपती शिवरायांचा राज्यव्यवहारकोश!

Views: 3806
4 Min Read

छत्रपती शिवरायांचा राज्यव्यवहारकोश!

पुस्तक लेखमाला क्रमांक – १६

आताच्या काळात आपण “मंत्रालय” हा शब्द ऐकतो. की जिथे सर्व मंत्रीमंडळ एकत्र जमून राज्याच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. १४ व्या शतकापासूनआपल्या हिंदुस्थान वर मुघलांनी राज्य केले आणि त्यांचेच  शब्दही आपल्याला दिलेत. “गुसलखाना” म्हणजेच राजदरबारात असलेला खलबतखाना या यवनी शब्दाचा संस्कृत अर्थ “मंत्रालय”! मंत्रालय आणि या अश्या अनेक दैनंदिन व्यवहारातील या शब्दाची युत्पुती छत्रपती शिवरायांच्या काळात झालेली आहे. हे आपणस सांगून आज विश्वास ही बसणार नाही, इतके हे शब्द आज आपल्या दैनंदिन व्यवहारात रूढ झालेले आहेत.(छत्रपती शिवरायांचा राज्यव्यवहारकोश!)

सुमारे ५०० वर्षे हिंदुस्थान च्या इतिहासात फारसी ही भाषा राज्यव्यवहारची साठी वापरली गेली होती.

छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राजाभिषेक नंतर या यवनी शब्दांना देवनागरी भाषेत आणण्याची आपल्या मंत्र्यांना आज्ञा केली. त्यावेळी शिवछत्रपतींच्या आज्ञेवरून या यवनी शब्दांचा आपल्या स्वभाषेत एक कोश करण्यात आला. तोच हा “राज्यव्यवहारकोश”! थोडक्यात उर्दू मधील अर्थातच दखनीयवनी भाषेतील शब्दांना मराठी मध्ये आणणारा शब्दसंग्रह!!

शिवछत्रपतींच्या प्रेरणेने रचल्या गेलेल्या या कोशात १६७८ मध्ये रूढ असलेल्या दक्षिणी उर्दूतील अर्थातच दक्खनीयवनी भाषेतील १००० हुन अधिक शब्द आलेले आहेत.थोडक्यात या उर्दू -संस्कृत कोशाचे शिवछत्रपती हे  एकमेव प्रेरक ठरतात असे म्हटले तर त्यात वावगे ते काय?

सेतुमाधव राव पगडी तर शिवछत्रपती यांना यामुळेच “उर्दू भाषेचे कोशकार” असे संबोधितात!!

या राज्यव्यवहारकोशाची मूळ प्रत तंजावर येथे असून याचा खरा कर्ता “धुंडिराज व्यास” हे आढळतात.१६७८ च्या आसपास हा कोश पुर्ण होऊन शिवछत्रपतींच्या नजरेखालून गेलेला असावा असे नक्कीच वाटते. शिवचरित्राच्या संस्कृत साधनांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा कोश म्हणजे एक पर्वणीच आहे.

सध्याच्या काळात श्री अश्विनीकुमार दत्तात्रय मराठे यांनी संपादित केलेला राजकोश अभ्यासासाठी उपलब्ध आहे. यात त्यांनी प्रचंड अभ्यास करून संस्कृत श्लोक यांना उद्धृत केलेले आहे. यवनी- संस्कृत  भाषेतून आपल्या सामान्य देवनागरीत जे शब्द आलेले आहेत. त्यांचे त्यांनी योग्य भाषांतर करण्याचा खूपच प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

या पुस्तकात त्यांनी राजकोशांचे एकूण १० वर्ग दिलेले आहेत.

१.राजवर्ग- या वर्गात राजा, युवराज,राजपुत्र, प्रधानसेवक, अधिकारी यांचा उल्लेख आलेला आहे. या वर्गात उल्लेखलेल्या व्यक्तींचा संदर्भ आपणास जयराम पिंडये आणि कविंद्र परमानंद यांच्या काव्यात सतत आढळतो.

२.कार्यस्थानवर्ग- राजसेवेशी निगडित विविध कचेऱ्या जसे रत्नशाला, वस्त्रशाला असे १८ कारखाने या मध्ये मोडतात.यात शिवकाळातील नाणी व्यवस्था याची माहिती दिलेली आहे.

३.भोग्यवर्ग- यात अन्नपदार्थ करणारे व्यक्ती, पाणी साठवून ठेवणे,विविध द्रव्ये,दवाखाना यांची माहिती दिलेली आहे.

४.शस्त्रवर्ग- शस्त्रागार ,तेथील अधिकारी,विविध शस्त्रे यांची अप्रतिम माहिती या वर्गात मिळते.शिवकालीन युद्ध पद्धतीवर विशेष माहिती या वर्गात मिळते.

५.चतुरंगवर्ग-या वर्गात लढाई साठी आवश्यक गजशाळा, अश्वशाळा,रणवाद्ये, हत्ती-घोडे यांचे जाती,अलंकार यांची वैशिष्ट्य पूर्ण माहिती दिलेली आहे.

६.सामंतवर्ग- सैन्याच्या संबंधातील हा कोशातील सर्वात छोटा वर्ग असून यात सरनौबत ते सामान्य शिपाई यांच्या अधिकारी वर्गाची माहिती दिलेली आहे.

७.दुर्गवर्ग- अतिशय महत्वाचा वर्ग! यात विविध किल्ल्यांची माहिती, त्यांचे वर्गीकरण, संरक्षण व्यवस्था, तट, बुरुज, माची यांचा उल्लेख आहे.

८.लेखनवर्ग-हा कोशातील सर्वात मोठा वर्ग.करार, तहनामे, संदेश,जमाखर्च, वसुली या राजकीय कामांसाठी वापरण्यात येणारे नाना तऱ्हेचे शब्दच या कोशात आहेत.हा वर्ग म्हणजे राज्यव्यवहारकोशाचा गाभाच म्हणायला हरकत नाही.

९.जनपदवर्ग-यात जहाज, टोकरे,महसूल,कर,गावातील धनयकोठारे यांची तसेच गावातील विविध अधिकारी यांची माहिती दिलेली आहे.

१०.पण्यवर्ग- यात थोडक्यात बारा बलुतेदारी पद्धतीची माहिती आहे.

सध्याच्या शिवचरित्राच्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ आणि त्यातील माहिती ही प्रचंड उपयुक्त आहे.

पुढील लेखमालेत आपण शिवचरित्राच्या अजून काही महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.

आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या पोस्ट मधील एकमेव उद्देश.

बहुत काय लिहिणे?अगत्य असू द्यावे.

किरण शेलार.

Leave a Comment