महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,166

रमाभैरवी | आमची ओळख आम्हाला द्या

Views: 1285
3 Min Read

रमाभैरवी | आमची ओळख आम्हाला द्या –

सोलापूर पासून दक्षिणेस सोलापूर विजापूर महामार्गावर 35 किमी अंतरावर हत्तरसंग कुडल नावाचे गाव आहे .या गावात भीमा व सीना नदीचा संगम झालेला आहे. या संगमावर संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. याच ठिकाणी हरिहरेश्वराचे मंदिर प्राध्यापक गजानन भिडे यांच्या प्रयत्नातून उत्खनन करून वर काढण्यात आले. या मंदिरात बऱ्याच सुंदर मूर्ती मिळालेल्या आहेत. याच ठिकाणी सहस्त्र कोटी शिवलिंग म्हणजे 365 मूख असलेले शिवलिंग मिळालेले आहे. त्याचबरोबर इतरही कलापूर्ण मूर्तीशिल्प या ठिकाणी पहावयास मिळते.(रमाभैरवी)

उत्खननात मिळालेले हरिहरेश्वर मंदिर .या मंदिराला मुखमंडप, सभामंडप, स्वर्ग मंडप व  दोन गर्भगृह आहेत. मंदिरात प्रवेश करताना समोरील मुखमंडपात एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आढळून येते. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, एकाच शिलाखंडात कोरलेल्या दोन मातृमूर्ती होय. एकाच शिलाखंडात कोरण्यात आलेल्या दोन मातृमूर्ती ह्या महाराष्ट्रात इतरत्र कोठेही आढळून येत नाहित.मूर्तीची उंची साधारणतः चार फूट असावी.

मंदिरात प्रवेश करताना ही मूर्ती समोरच आहे .समोरील मातृदेवता समपाद-वस्थेत उभी आहे .ती द्विभूज आहे.डोक्यावर मुकुट असून कानात असणारी चक्राकार कुंडले लांब खांद्यावर स्थिरावलेली आहे. गळ्यात हार, स्तनहार ,केयूर, पायातील पाद जालक अतिशय सुबक व ठसठशीत आहेत. कटिबंध ,कटिसूत्र, मुक्तदाम, उरूद्दादाम व वस्त्रावरील रुळणाऱ्या मोत्यांच्या लडी अत्यंत कलाकुसरयुक्त आहेत. मूर्तीचे दोन्ही हात पूर्णतः भंगलेले आहेत. पायाच्या घोट्या पासून वर कंबरेपर्यंत फुलांची माळ अंकित केलेली दिसून येते. चेहऱ्यावर हलकेसे स्मित हास्य दिसून येते.

शिलाखंडाच्या दुसऱ्या बाजूस मागून अंकित असणारी ही मातृदेवता द्विभूज असून समपाद अवस्थेत उभी आहे. चेहऱ्याचा डावीकडील भाग पूर्णतः तुटलेला असून उर्वरित भागावरून देवीला जटामुकुट असावा असे वाटते. मुकुटावरील नरमुंड माला पट्टा दिसतो. कानात चक्राकार कुंडले, ग्रीवा, स्तनहार, केयूर,करवलय इत्यादी अलंकार मूर्तीवर स्पष्ट दिसतात. कटि सूत्र, मुक्तद्दाम, उरूद्दा आणि दोन्ही पायामधील वस्त्राचा सोगा अतिशय सुबक व कोरीव आहे. मूर्तीचा डावा हात भंगला असून उजवा हात सुस्थितीत आहे. तो हात अभयमुद्रेत आहे .पायाच्या घोट्या पासून कंबरेपर्यंत नरमुंड मला स्पष्ट दिसते. देवीच्या चेहर्‍यावर उग्र भाव असून डोळे मोठे आहेत.

अशा पद्धतीने हरिहरेश्वराच्या मंदिरात असणारे एकाच शिला खंडातील हे शिल्प हरी पत्नी रमा व हरेश्वर पत्नी भैरवी यांचे असावे. त्यामुळेच या मूर्तीस रमा भैरवी असे म्हटले तर अधिकच संयुक्तिक होईल. कारण या मंदिराला दोन गर्भगृह  असून ,एका गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे .तर दुसर्‍या गर्भगृहामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आहे.शैव आणि वैष्णव यांचा समन्वय साधण्यासाठी या मंदिराची निर्मिती झाली असावी, आणि याच निर्मितीतून शैव व वैष्णव यांच्यातील वाद मिटवण्यासाठी साठी रमा भैरवीची ही मूर्ती तयार झाली असावी.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a Comment