रामरायर गोरी –
पानिपतचे तिसरे युद्ध हा जसा महाराष्ट्राच्या जिव्हारी बसलेला घाव आहे त्याप्रमाणेच राक्षस तागडी ची लढाई या नावाने ओळखली जाणारी विजयनगरचे वैभवशाली साम्राज्य पार धुळीला मिळवणारी लढाई हा दक्षिण भारतीय हिंदूंच्या जिव्हारी बसलेला घाव आहे.
आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बारीदशाही या चार शाह्यांच्या सुलतानांनी एकजूट करून विजयनगरचे हिंदू साम्राज्य नष्ट केले .ज्या ठिकाणी हे युद्ध झाले तेथे रक्कसगी आणि तंगडगी ही दोन गावे आहेत .त्याचा अपभ्रंश होऊन राक्षस तागडी असा शब्द मराठीमध्ये रूढ झाला.
विजयनगर साम्राज्यावर कादंबरीलेखन करण्याच्या मनिषेने अभ्यास सुरू केल्यावर हंपी आणि परिसरात फिरणे झाले. यावेळी हंपीहून येताना रक्कसगी,तंगडगी पाहून यावे म्हणून या गावांमध्ये आम्ही जाऊन आलो. इतर अनेक ठिकाणी येतो तोच अनुभव येथेही आला.
गावातील बहुतांश लोकांना असे काही इथे झाले आहे वगैरे याचा पत्ताच नव्हता आणि त्याच्याशी त्यांना काही घेणे देणेही नव्हते. योगायोगाने त्या गावामध्ये” राजू पोलीस पाटील” नावाचा उत्साही आणि खटपट्या तरुण भेटला .त्याने इथे ‘रामरायर गोरी ‘आहे अशी माहिती दिली. एवढेच नाही तर नदीकाठच्या काट्याकुट्यातून, झाडाझुडपातून वाट काढत ती अव्हेरी पडलेली ,दगड निखळून पडलेली ,झाडा वेलींच्या दाटणीत झाकली गेलेली रामरायाची समाधी आम्हाला दाखवायला घेऊन गेला.
जगाच्या पाठीवर एवढे संपन्न राज्य दुसरे कोणतेही नाही अशा शब्दांत सर्व परदेशी प्रवासी ज्याचे वर्णन करत होते असे हे साम्राज्य! हिंदुस्थानच्या इतिहासातील एक सोनेरी पान! त्या साम्राज्याचे सतत पंचवीस वर्ष रक्षण पोषण करणाऱ्या आणि नंतर त्याच्याचसाठी प्राणार्पण करणाऱा रामराजा! त्या राजाची ही समाधी! अशी उध्वस्त अव्हेरी पडलेली! मनात विषाद दाटून आला. मन अजूनही अस्वस्थ आहे.
लेख साभार – ज्योती चिंचनिकर