रामदरा, पुणे –
पुणे सोलापूर रस्त्यावर पुण्यापासून अंदाजे वीस कि.मी. अंतरावर लोणी काळभोर आहे. तिथून एक फाटा रस्त्याच्या उजव्या बाजूला फुटतो. त्या रस्त्यावर वळल्यावर साधारण पाच-सहा कि.मी. अंतरावर एका सुंदर, रमणीय परिसरात धुंदीबाबांचा आश्रम, एक छोटस तळ, सुंदर देऊळ आणि भरपूर वृक्षराजींनी नटलेला परिसर आहे. रामदरा या नावाने हा परिसर प्रसिद्ध आहे. प्रभू श्रीरामांच्या वनवास काळात त्यांनी या ठिकाणाला भेट दिली, अशी लोकांची श्रद्धा आहे.
इ.स. १९५४-५५ च्या सुमारास श्री पंचदशनामी जुना दत्त आखाडा उज्जैन येथील महंत श्री १००८ श्री देवीपुरी महाराज ऊर्फ धुंदीबाबा इथे आले. तेव्हा इथे ओढ्याकाठी फक्त श्रीरामपादुका आणि शिवलिंग होतं. धुंदी बाबांनी सध्याचं हे मंदिर, आश्रम आणि आजूबाजूचा परिसर विकसित केला.
आश्रमाच्या खाली असणाऱ्या पायऱ्यांवरून उतरलं की धुंदीबाबा, गणपती आणि विष्णूचे दशावतार यांच्या मूर्ती दिसतात. तसंच आणखी खाली गेलं की संगमरवरात घडवलेला नंदी, राम-लक्ष्मण-सीता, दत्त यांच्या मूर्ती आणि शिवलिंग यांचं दर्शन घडतं. मुख्य मंदिराच्या चार दिशांना दुर्गादेवी, महाकाली, गायत्री आणि पार्वती यांची मंदिरं आहेत. मंदिरात विविध देवता आणि संत महात्मे यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. शेजारी एक छोटस तळ बांधलेलं आहे.
संदर्भ:
सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या – प्र. के. घाणेकर
पत्ता :
https://goo.gl/maps/DkdCoZbF8dnHTRDXA
आठवणी_इतिहासाच्या FB Page