महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,907

रामदुर्ग किल्ला | Ramdurg Fort

By Discover Maharashtra Views: 4008 8 Min Read

रामदुर्ग किल्ला | Ramdurg Fort

भाषावार प्रांतरचना करताना स्वराज्यात असणारा बेळगाव हा मराठी बहुभाषिक प्रांत कर्नाटक राज्याला जोडला गेला. एकेकाळी स्वराज्यात असलेल्या या किल्ल्यांना मी महाराष्ट्रातील किल्ले समजतो व त्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले म्हणुन करत आहे. रामदुर्ग किल्ला (Ramdurg Fort) हा शिवकाळात बांधला गेलेला असाच एक मराठमोळा दुर्ग. रामदुर्ग हे तालुक्याचे शहर संकेश्वरहुन १०८ कि.मी. तर बेळगावहून ९० कि.मी.अंतरावर आहे. मलप्रभा नदीकाठी दक्षिणोत्तर पसरलेल्या एका लहानशा टेकडीवर असलेला त्रिकोणी आकाराचा हा किल्ला समुद्रसपाटीपासून १९३० फुट उंचावर असुन साधारण १३ एकरवर पसरलेला आहे. मुळचे रामदुर्ग शहर या किल्ल्यातच वसले असल्याने वाढत्या लोक वस्तीमुळे किल्ल्याचे आतील सर्व अवशेष व उत्तर दिशेस सलेली तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली आहे. किल्ल्यात असलेल्या वस्तीमुळे संपुर्ण किल्ला न फिरता त्याचे जागोजागी असलेले अवशेष पहावे लागतात.

किल्ला सलगपणे फिरता येत नसल्याने त्याचे एकत्रीत वर्णन करता येत नाही. त्रिकोणी आकाराच्या या गडाच्या ३ टोकावर ३ दरवाजे असुन पश्चिमेकडील तटबंदीत एक दरवाजा आहे. किल्ल्याची उत्तर बाजुस असलेली तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली असुन हे चार दरवाजे पहाता उत्तर तटबंदीत देखील दरवाजा असावा. किल्ल्यातील आपला प्रवेश पुर्वाभिमुख दरवाजाने होतो. दरवाजाच्या वरील बाजुस नगारखाना बांधलेला असुन तटबंदी व बुरुजावर तोफां-बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या दिसुन येतात. दरवाजाची उंची साधारण २० फुट असुन मुख्य दरवाजाशिवाय आत जाण्यासाठी डावीकडे दुसरा लहान दरवाजा आहे. या दरवाजातुनच गडावर रस्ता गेलेला आहे. दरवाजाच्या आतील बाजुस उजवीकडे किल्ल्याचा सर्वात मोठा बुरुज असुन या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. या बुरुजावर पहारेकऱ्याच्या देवड्या असुन याला लागुन दोन लहान बुरुज आहेत.

स्थानिकांनी या बुरुजाची हगणदारी केली असुन येथे पाऊल टाकायला जागा ठेवली नाही. बुरुज पाहुन सरळ पुढे आल्यावर उजवीकडे घाटगे यांचा राजवाडा तर डावीकडे न्यायालयाची इमारत आहे. येथुन खाली उतरत जाणाऱ्या वाटेने सरळ गेल्यावर आपण गडाच्या पश्चिम तटबंदीजवळ पोहोचतो. येथे तटाजवळ एक प्रचंड मोठी खोल विहीर असुन सध्या हि विहीर झाडीने व वस्तीतील नालीतुन वहात येणाऱ्या सांडपाण्याने भरलेली आहे. विहिरीशेजारी चौथऱ्यावर पडीक मंदीर असुन त्यातील देवतेची घुमटीत स्थापना करण्यात आली आहे. येथुन तटावर चढले असता उत्तर दिशेला गेलेली किल्ल्याची तटबंदी पहायला मिळते. या तटाजवळच किल्ल्याचा दरवाजा असुन या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक आहे. दरवाजाबाहेर पडुन खाली उतरत गेल्यास लांबून किल्ल्याची अखंड तटबंदी पहाता येते. येथुन किल्ल्यात परत यावे व अंबाभवानी मंदीर विचारावे. हे मंदीर किल्ल्याच्या दक्षिण टोकावरील दरवाजाच्या आतील बाजुस बांधलेले आहे.

गोमुखी बांधणीचा हा दरवाजा किल्ल्यावरील सर्वात सुंदर असुन दरवाजा असुन या दरवाजावर मोठ्या प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. दरवाजावर दगडी सज्जा बांधलेला असुन चौकटीवर वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत. दरवाजासमोर आडवी भिंत घालुन त्यावर अर्धवर्तुळाकार बुरुज बांधलेला आहे. दरवाजाबाहेर मारुती मंदीर असुन दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक आहेत. दरवाजाच्या आतील बाजुस उजवीकडे भगवा झेंडा रोवलेला मोठा बुरुज असुन त्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. बुरुजावर तोफेसाठी गोलाकार चौथरा आहे. हा दरवाजा पाहुन पुन्हा राजवाड्याच्या मागील बाजुस यावे. या वाटेने सरळ गेल्यावर आपण गडाच्या उत्तरेकडील तटबंदी जवळ पोहोचतो. या तटबंदीच्या अलीकडे काही अंतरावर गडातील अंतर्गत भागावर लक्ष ठेवण्यासाठी वेगळा बुरुज बांधलेला आहे. या बुरुजावरून गडाच्या उत्तर बाजुस असलेले संपुर्ण रामदुर्ग शहर नजरेस पडते. रामदुर्ग किल्ला (Ramdurg Fort) गडाच्या उत्तर टोकावर एक मोठा बुरुज बांधलेला असुन त्याशेजारी दोन लहान बुरुज बांधलेले दिसतात. तेथे जाण्यासाठी मागे फिरून बुरुजाच्या थोडे अलीकडे एक वाट खाली उतरताना दिसते. या वाटेने खाली गेल्यावर गडाची तटबंदी व बुरुज दिसतात. या तटबंदीत एक मोठे कोठार असुन या कोठारात बिऱ्हाड थाटलेले आहे. या कोठाराशेजारी तटबंदीत बाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. या भागात सांडपाणी जमा झाले असुन हे सांडपाणी या दरवाजातून बाहेर जाते.

यातून वाट काढत उजवीकडे गेल्यावर आपण गडाच्या उत्तर टोकावर पोहोचतो. येथे मोठ्या व लहान बुरुजाच्या आधारे सुंदर दरवाजा बांधलेला आहे. या भागाचा हगणदारी म्हणुन वापर होत असल्याने काहीं न पहाता क्षणात पळ काढावा लागतो. संपुर्ण रामदुर्ग किल्ला (Ramdurg Fort) पहाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. किल्ला पाहताना शक्यतो एखादा लहान मुलगा सोबत घ्यावा.

बेळगाव जिल्ह्य़ातील तालुक्याचे ठिकाण असलेले रामदुर्ग हे इ.स. १७४२ ते १९४८ या काळात लहान संस्थान होते. या संस्थानात रामदुर्ग व नरगुंद ही दोन शहरे व ३७ गावे सामील होती. रामदुर्ग किल्ल्याचे शिवकाळापुर्वी कोणतेच संदर्भ येत नसल्याने हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असे मानले जाते. इ.स.१६७४ साली या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी अप्पाजी सुरी हबळीकर याची नेमणूक केली होती. इ.स.१६९२ मध्ये महाराजांच्या मृत्युपश्चात नरगुंद व रामदुर्ग किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले पण इ.स.१७०७ मध्ये अप्पाजींचा सबनीस रामराव दादाजी भावे याने हे किल्ले परत मिळवले. किल्लेदार अप्पाजी सुरी हबळीकर यांनी मृत्यूसमयी किल्ला रामराव दादाजी भावे यांच्याकडे सोपविला. अप्पाजीच्या मृत्युनंतर आसपासच्या प्रदेशावर भाव्यांनी अंमल बसवला. पुढे छत्रपती संभाजी (कोल्हापूर) याने रामरावाला किल्लेदार घोषित करून येथील पंतसचिवपद दिले. रामरावाचा पुतण्या दादाजी हाहि शूर असून त्यास सावनूरकर नवाबाने काही गावे इनाम दिली होतीं. इ.स.१७३४ साली कोल्हापूरकर छत्रपती संभाजीनें दादाजीस घटप्रभा व तुंगभद्रा या भागात देसाई नेमलें.

इ.स. १७४०च्या सुमारास रामराव काशीयात्रेस गेला असता तेथेच मरण पावला. त्याचा मुलगा योगीराव यानें रामरावास ठार मारविलें या संशयावरून योगीराव व दादाजीचा पुत्र भास्करराव यांचें भांडण जुंपलें. इकडे सातारा आणि कोल्हापूरचे छत्रपती यांच्या वादात रामदुर्ग आणि नरगुंदची मालकी सातारा दरबारकडे आली. शिवाजी महाराजांच्या काळात रामदुर्ग व नरगुंदचा किल्लेदार असलेल्या अप्पाजी सुरी हबळीकर यांच्या बळवंतराव नांवाच्या वंशजानें या भांडणांत इ.स.१७५३ साली पेशव्यांकडून आपल्या नांवें सरंजाम करून योगीराव व भास्करराव यांनां जात-सरंजाम नेमून दिले. पण इ.स. १७५८ मध्ये थोरल्या माधवरावांच्या कारकीर्दीत दोघा चुलतभावांनी संस्थान आपल्या नांवे करार करून घेंतलें व बळवंतरावास १२ हजारांची नेमणूक दिली. लढाईच्या वेळेस ३५० घोडेस्वार पुरवण्याच्या अटीवर पेशव्यांनी या करारास मान्यता दिली. इ.स. १७७८मध्ये भास्कररावानंतर त्याचा दत्तकपुत्र व्यंकटराव याच्या काळात हैदरनें हा भाग ताब्यात घेतला पण खंडणीच्या बदल्यात भावेंकडे देसाईपद कायम ठेवले. टिपू सुलतानच्या काळात त्याने भावेकडे जास्त खंडणीची मागणी केली पण त्यांनी नकार दिल्याने टिपूने भावे कुटुंबाला म्हैसुरमध्ये कैदेत ठेवले. लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या नेतृत्वाखाली पेशवे-निजाम-इंग्रज यांनी टिपुवर स्वारी केली तेव्हां व्यंकटरावाची सुटका झाली.

इ.स. १७९१ साली पेशव्यानीं व्यंकटराव व त्याचा भाऊ रामराव यांना सरंजाम करून दिला. परशुरामभाऊ पटवर्धनाच्या मध्यस्थीनें रामरावास रामदुर्ग किल्ला व रामदुर्गच्या राजेपदाची सनद मिळाली. परंतु वांटणी सारखी नसल्याने इ.स.१८१० मध्ये रामरावाचा पुत्र नारायणराव याच्या विनंतीवरून दुसऱ्या बाजीरावाने नरगुंदकर व रामदुर्गकर या दोन भावे वंशातील कुटुंबांत प्रदेशाच्या वाटण्या करून दिल्या. पेशवाईनंतर नरगुंदचे राज्य रामदुर्गमध्ये विलीन झाले. इ.स.१८०० ते १८१० या काळात ब्रिटिशांनी बापूराव रानडे याला रामदुर्गचा प्रतिनिधी नेमले. इ.स.१८२७ मध्ये नारायणराव निपुत्रिक वारल्याने त्याची पत्नी राधाबाई हिला इंग्रजांनी ठरवलेला वारस नरगुंदकर हरिहर यास दत्तक घेऊन त्याचें नांव रामराव ठेविलें. परंतु इंग्रजांनी लादलेला हा वारसदार तिला मान्य नसल्याने त्यांच्यात कायम तंटे होत राहिले. रामरावहि निपुत्रिक असल्याने त्यानें १८६२ साली दत्तकाची सनद मिळवली व १८६६ ला दत्तक घेऊन त्याचें नांव योगीराव ठेविलें. रामराव १८७२ सालीं वारला व त्यानंतर सहा वर्षांनीं १८७८ साली योगीरावहि वारला. तेव्हां त्याचा पुत्र व्यंकटराव हा गादीवर बसला. भारताला स्वतंत्र मिळाल्यावर व्यंकटराव उर्फ रामराव तृतीयने रामदुर्ग संस्थान १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन केले. १ नोव्हेंबर १९५६ पासून संस्थान म्हैसूर (कर्नाटक) राज्यात समाविष्ट झाले.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment