रामेश्वर मंदिर, चौल, अलिबाग –
महाभारतात चंपावती किंवा रेवतीक्षेत्र म्हणून उल्लेखलेले चौल हे तिमुल्ल, सेमुल्ल, चेमुल्ल, चिमोलो, सैमूर, सिबोर, चेऊल अशा विविध नावांनी प्राचीन भारतीय वाङ्मयात प्रसिद्ध आहे.चौल हे अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन प्राचीन बंदर आहे. येथल्या प्रसिद्ध अक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हीदेखील एक जोडगोळी समजली जाते. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आले; परंतु आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित होतो.(रामेश्वर मंदिर)
सातवाहन काळात हे बंदर सर्वोच्च शिखरावर होते.१७ व्या शतकानंतर याचे महत्व कमी होत गेले. चौल हा पुर्वी 15 पाखाडयामध्ये विभागलेला होता, या 15 पाखाडयापैकी भोरसी पाखाडीत चौलचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर आहे.
चौलचे श्री रामेश्वर मंदिर फार वर्षापुर्वीचे असावे असा अंदाज बांधण्यात येतो. हे स्वयंभू देवस्थान असल्याने लोकांची श्रध्दा आहे. परंतू हे मंदिर कोणी व केव्हा बांधले यांचा उल्लेख मिळत नाही. पण मंदिराची दुरूस्ती अनेकदा झाल्याचे उल्लेख आहे. ऑक्टोबर 1741 श्रीनिवास दिक्षीतबाबा नावाच्या गृहस्थाने या मंदिराचा जिर्णोध्दार केला. त्यासाठी लागलेेले द्रव्य नानसाहेब पेशवे व मानाजी आंग्रे यांनी पुरविले. किरकोळ कामे राहिली ती विसाजीपंत सरसुभेदाराने 1769-70 मध्ये पुरी करून नंदीजवळ दिपमाळ व तुळशीवृंदावन बांधले.
मार्च 1816 मध्ये रामेश्वर मंदिराचा नगारखाना बांधण्याचे काम सुरू झाले. मंदिरासमोरील पुष्करणीची दुरूस्ती 1838 मध्ये झाली. रूप्याचा पंचमुखी मुखवटा पेशव्यानी ऑगस्ट 1817 पुर्वी रामेश्वरास अर्पण केला होता. मंदिराच्या सभामंडपात अग्निकुंड, व पर्जन्यकुंड व वायुकुंड आहेत. पाऊस पडत नाही तेव्हा पर्ज्यन्यकुंड उघडतात. प्रज्यन्यकुंड उघडल्याचे बरेच जुने दाखले मिळतात. जुन 1731 मध्ये पर्ज्यनवृष्टी व्हावी म्हणून येसांजी आंग्रेंनी पर्ज्यनकुंड उघडल्याचा दाखला मिळतो सन 1653,1731,1790,1857,1876, 1899 व 1941 मधील वेळीही पर्जन्यकुंड उघडल्याचे म्हणतात. शेवटी सन 1942 साली शेवटचे कुंड उघडलेले होते.
पुर्वाभिमुख असलेल्या रामेश्वर मंदिराचा गाभारा चौकोनी असून मध्यभागी लांब रूंद व जमीनीपासून थोडी उंच पितळी पत्राचे मढवलेली शाळुंका आहे. तिच्या मध्यभागी नेहमीप्रमाणे उंच लिंग नसून चौकोनी खड्डात स्वयंभू शिवलिंग आहे. गाभार्यांचे उंच असलेल्या शिखराचे व संपूर्ण गाभार्यांचे बांधकाम दगडी आहे. सभामंडपात प्रवेश करण्यासाठी भिंतीत मध्यभागी मोठा दरवाजा आहे.
मंदिरास लागून सभामंडप असून तो दुमजली आहे. मंदिर परिसरात मंदिरासमोर नंदी असून दोन दिपमाळी व तुळशी वृंदावन आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी व त्रिपुरा पौर्णिमेचे दिवशी मंदिरात दिपोत्सव साजरा केला जातो.
संतोष मुरलीधर चंदने. चिंचवड पुणे.