रामेश्वर मंदिर जामगाव, ता. पारनेर –
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पारनेर पासून १२ किमी अंतरावर जामगावचा भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला महादजी शिंदे यांनी बांधून घेतला आहे. पुढे महादजी शिंदे यांचे वंशज जिवाजीराव शिंदे यांनी हा किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस केला. आजही ह्या किल्ल्यात रयत शिक्षण संस्थेचे डी.एड कॉलेज भरते. आत मध्ये महादजी शिंदेचा तीनमजली अन दोन चौकी भव्य असा वाडा देखील आहे. याच भुईकोट किल्ल्याच्या अलीकडे काही अंतरावर उजव्या बाजूला दगडी तटबंदीत आपल्याला एक मंदिर समूह दिसतो त्या मंदिर समूहात रामेश्वर नावाने ओळखले जाणारे एक मध्ययुगीन काळातील महादेव मंदिर अजूनही पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.रामेश्वर मंदिर जामगाव.
मंदिराला रंगरंगोटी केलेली असल्याने त्याची प्राचीनता चटकन आपल्या ध्यानी येत नाही. मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मंदिरावर किंवा स्तंभावर कुठलेही शिल्पांकन आपल्याला दिसून येत नाही. मंदिराच्या एकंदरीत बांधणीवरून मंदिर १४ व्या शतकातील असावे असा अंदाज आपण बांधू शकतो. नाही म्हणायला सभामंडप व गर्भगृह यांची द्वारशाखा व सभामंडपातील वितानावर थोड्या प्रमाणात शिल्पांकन असून मंदिराच्या प्राचिनतेचा तोच एकमेव पुरावा ठरतो.
अंतराळातील देवकोष्टकात कुठलीही मूर्ती आपल्याला दिसून येत नाही. गाभाऱ्यात दक्षिणोत्तर असे शिवलिंग स्थापित आहे. मंदिराच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी सुंदर मंदिरे असून ही मंदिरे पेशवेकालीन दिसतात. जामगावच्या भुईकोट किल्ल्याला भेट देण्यासाठी कधी आलात तर या मंदिर समूहाला देखील आवर्जून भेट द्यावी.
Rohan Gadekar