नारोशंकर | रामेश्वर मंदिर, पंचवटी –
पेशव्यांच्या काळात नाशिकचे सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांनी १७४७ मध्ये रामेश्वर मंदिर बांधले. या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या सभोवतालच्या भिंतीवर अक्षय नागाचे कोरीवकाम करण्यात आलेले असून याचे महत्व म्हणजे हा नाग शिव शंकराचे काळावर असलेले नियंत्रण दर्शवतो.
हे मंदिर गोदाकाठी असल्याने घाटांपासून मंदिराची शांतता अबाधित राहावी आणि पुरापासून मंदिराचे संरक्षण व्हावे या हेतूने मंदिराच्या सभोवताली एक भक्कम दगडी भिंत उभारली आहे. मंदिराच्या चारही बाजूने राजपूत शैलीने तयार करण्यात आलेल्या छत्र्या आणि मध्यभागी असलेले नारोशंकराच्या मंदिराचा कळस लांबूनच लक्ष वेधून घेतो.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांविरुद्ध वसईच्या लढाईमध्ये मराठ्यांनी अभूतपूर्व पराक्रम केला. त्यावेळी वसईच्या किल्ल्यामधील चर्चच्या घंटा या लढाईचे स्मरण राहावे म्हणून पेशवे १७३९ सोबत घेऊन आले. त्यातील एक घंटा या मंदिरात ठेवण्यात आली आहे. ही घंटा सध्या दिसते तिथे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारच्या वरती बांधण्यात आली. आजही ही घंटा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून दिमाखात उभी आहे. तेव्हापासून या रामेश्वर मंदिराला नारोशंकर मंदिर आणि घंटेला नारोशंकर मंदिराची घंटा असे म्हणतात.
Rohan Gadekar