महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,84,887

रामगड | Ramgad Fort

By Discover Maharashtra Views: 4028 9 Min Read

रामगड | Ramgad Fort

सह्याद्रीच्या डोंगररांगेत उगम पावणारी गड नदी अखेरीस सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ समुद्राला मिळते. नदीच्या या प्रवाहावर उगमापासून ते संगमापर्यंत वेगवेगळ्या काळात लहानमोठे किल्ले बांधले गेले. यात उगमाजवळ भैरवगड-सोनगड, पुढे रामगड (Ramgad Fort), त्यानंतर दोन्ही काठावर भरतगड-भगवंतगड तर संगमावर सर्जेकोट बांधलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ला वगळल्यास या भागातील इतर किल्ल्यास सहसा कोणीही भेट देत नसल्याने हे किल्ले ओस पडले आहेत. गड नदीच्या सुरवातीच्या भागात २१० फुट उंचीच्या एका लहानशा टेकडीवर गर्द झाडीने वेढलेला रामगड हा अपरीचीत किल्ला वसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या रामगडवर जाण्यासाठी रामगड हे पायथ्याचे गाव असुन कणकवली हे जवळचे शहर आहे. मुंबईहुन कणकवली अंतर ४४० कि.मी.असुन येथुन कणकवली –आचरा मार्गाने आपण १२ कि.मी. असलेल्या रामगड(Ramgad Fort) किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो.

कोकणातील खाडीकाठी असलेल्या बहुतांशी किल्ल्यांची रचना एकसमान दिसुन येते ती म्हणजे टेकडीवर असलेला मुख्य किल्ला व तेथुन थेट खाडीच्या काठापर्यंत आलेली तटबंदी. गोपाळगड, जयगड, विजयगड, यशवंतगड, रामगड(Ramgad Fort), देवगड या किल्ल्यात हि रचना दिसुन येते. रामगड हा किल्ला असाच दोन भागात विभागलेला असुन टेकडीवर बालेकिल्ला व खाडीकाठी परकोट अशी याची रचना आहे. गावातील प्रभुदेसाई यांची खाजगी मालमत्ता असलेला हा किल्ला आता पुर्णपणे निसर्गाच्या ताब्यात आहे. गडावर खूप मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन या झाडीतुन मार्ग काढतच गड पहावा लागतो. रामगड गावातील टपाल कार्यालया जवळुन गडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. गडाकडे जाताना डाव्या बाजुस रवळनाथ मंदिर व त्यापुढे टेकाडावर मल्लिकार्जुन मंदिर आहे. या मंदिरात कोरीव मुर्त्या असुन आवारात एक गजलक्ष्मी शिल्प,काही प्राचीन मुर्ती व अनेक विरगळ पहायला मिळतात. येथे समोरच शेत पार करून किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे. या वाटेने १० मिनीटात आपण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ पोहोचतो. येथुन वर पाहीले असता गडाचा एक बुरुज नजरेस पडतो. टाकीकडून डावीकडे वळुन ५ मिनिटात आपण गडाच्या पश्चिमाभिमुख दरवाजात पोहोचतो.

दरवाजासमोर ५-६ पायऱ्या बांधल्या असुन उभे रहाण्यासाठी फारशी जागा नाही. हा दरवाजा दोन बुरुजांमध्ये वळण देऊन बांधलेला असुन आत शिरण्यासाठी अतिशय चिंचोळा मार्ग ठेवला आहे. गडाचे बांधकाम जांभ्या दगडात केलेले असुन हे बांधकाम सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. साधारण ८ फुट उंच असलेल्या या दरवाजाच्या कमानीतील एक दगड कोसळण्याच्या स्थितीत असुन वेळीच आधार न दिल्यास हा पुर्ण दरवाजा ढासळून जाईल. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहाऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे तटावर तसेच दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी दरवाजावर आल्यावर संपुर्ण गडमाथा झाडीने भरलेला दिसतो. बुरुजावर तसेच तटावर बंदुका व तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या व झरोके बांधलेले आहेत. गडाची तटबंदी साधारण १२ ते १५ फुट उंच असुन फांजीची रुंदी ४-५ फुट आहे. फांजीवर चढउतार करण्यासाठी काही ठिकाणी पायऱ्या बांधल्या आहेत. फांजीवरून संपुर्ण गडाला फेरी मारता येईल पण सध्या त्यावर वाढलेल्या झाडीमुळे हे शक्य होत नाही.

Ramgad Fort गडाचा एकुण परिसर साधारण ७ एकर असुन गडमाथा तीन एकरवर तर माचीकडील भाग ४ एकरवर पसरलेला आहे. दरवाजाकडून पुढे जाताना डावीकडील उंचवट्यावर एक समाधीवजा चौथरा दिसतो. या चौथऱ्यावर वारूळ वाढलेले असुन चौथऱ्याखाली असलेल्या पायऱ्या मातीत गाडलेल्या आहेत. हा चौथरा वेताळाचे ठिकाण म्हणुन ओळखला जातो. येथुन पुढे जाताना डावीकडील तटावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन संपुर्ण तटबंदी त्यात झाकुन गेली आहे तर उजवीकडील झाडी इतकी दाट आहे कि आत शिरता येत नाही. पुढे जाऊन वाट वाट डावीकडे वळते. या वळणावर एक मोठा बुरुज असुन त्यावरील झाडी विरळ असल्याने बुरुजावर जाता येते. या बुरूजावरून गड नदीचे पात्र नजरेस पडते. येथुन पुढे आल्यावर वाटेच्या डावीकडे एका रेषेत उलट पुरलेल्या सात लहानमोठया तोफा पहायला मिळतात. या सर्व तोफांचे कान म्हणजे बत्ती देण्याची जागा लोखंडी मेखा मारून बंद करण्यात आली आहे. वाटेच्या उजवीकडे झाडीत लपलेले एक मोठे जोते असुन तोफांसमोर ७ फुट उंचीचे एक मोठे तुळशी वृंदावन आहे. हे तुळशी वृंदावन म्हणजे समाधी असावी.

भगवंतगडावरील तुळशी वृंदावनाची आठवण करून देणाऱ्या या वृंदावनात सध्या तुळशी ऐवजी मोठे झाड उगवले आहे. वेळीच हे झाड न काढल्यास पडझड झालेले हे वृंदावन नष्ट होईल. येथुन समोर काही अंतरावर दोन बुरुजांच्या आधारे बांधलेला गडाचा उत्तराभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाचा आकार व गोमुखी बांधणी पहाता कधी काळी गडावर प्रवेश करण्याचा हा राजमार्ग असावा पण आता याच्या बाहेरील बाजुस वाटेवर इतकी काटेरी झाडे वाढली आहेत कि आपण ८-१० फुट देखील खाली उतरू शकत नाही. दरवाजाच्या दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या असुन एका देवडीत तटावरून येण्यासाठी लहान दरवाजा आहे. दरवाजाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन वेळीच काळजी न घेतल्यास हा दरवाजा केव्हाही कोसळुन पडेल. दरवाजा पाहुन झाल्यावर पुन्हा तोफांकडे यावे. येथे तुळशी वृंदावनाच्या मागे उजव्या बाजुस भिंत शिल्लक असलेली एक वास्तु आहे तर डावीकडे गडावरील चौसोपी वाडा आहे. या वाडयाच्या चारही बाजुस असलेल्या सोपा व भिंती आजही शिल्लक असुन पुर्वाभिमुख दरवाजा आहे.

या दरवाजाने वाडयात प्रवेश करताना दरवाजात दोन्ही बाजुस जोत्यावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. या शिवाय मागील भिंतीत देखील वर जाण्यासाठी पायऱ्या असुन या पायऱ्यांसमोर भंगलेल्या कोनाडयात कोरीव गणेश मुर्ती ठेवली आहे. या मुर्तीच्या आसनाखाली सात मानवी कवट्या कोरलेल्या असुन गळ्यात नरमुंडमाळ आहे. गणेशची हि आगळीवेगळी मुर्ती इतर कोठे पहायला मिळत नाही. वाडयाच्या आवारात जांभ्या दगडात बांधलेले तुळशी वृंदावन आहे. तीन बाजुने वर जाणाऱ्या या पायऱ्या व वाडयाच्या भिंतीची जाडी पहाता हा वाडा दुमजली असावा. या शिवाय वाडयाच्या दरवाजासमोर उजव्या बाजुस तटाला लागुन एक वास्तु बांधलेली आहे. येथे तटावर जाण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या आहेत. वाडा पाहुन झाल्यावर आपण गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी यायचे. या दरवाजापासुन उजवीकडे साधारण ५०-६० फुट अंतरावर गडाचा तिसरा दरवाजा आहे. या दरवाजाला गोलाकार कमान असुन आतील एका बाजुस पहाऱ्याची देवडी आहे.

दरवाजाबाहेर २ फुटावर आडवी भिंत बांधलेली आहे. हा गडाचा मुख्य मार्ग नसुन माचीवरून गडात येण्याजाण्यासाठी बांधलेला दरवाजा आहे. या दरवाजाबाहेर तटबंदीला लागुन दुसरी तटबंदी थेट नदीकाठी उतरली आहे. या दरवाजाने खाली उतरत गेल्यास या तटबंदीत असलेले असलेले गडाचे दोन बुरुज पहायला मिळतात. या शिवाय गडाची दुसरी बाजुदेखील तटबंदी व दोन बुरुजांनी बंदीस्त करण्यात आली आहे. गडाची नदीकाठी असलेली तटबंदी व या तटबंदीत असलेला गडाचा पहिला दरवाजा आज पुर्णपणे नामशेष झाला आहे. बालेकिल्ल्यातील दरवाजाने माचीवर उतरणे कठीण वाटल्यास गड उतरून नदीच्या दिशेने जाणाऱ्या वाटेने गडाच्या माचीवर जाता येते. माचीवर देखील मोठया प्रमाणात झाडी वाढली असुन तटबंदी वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. उतरत आलेल्या दोन्ही बाजुच्या तटबंदीत कोठेही दरवाजा नाही.

गडाच्या तटबंदीत एकुण १९ बुरुज असुन १५ बुरुज गडमाथ्यावर तर ४ बुरुज माचीवरील तटबंदीत आहेत. गडावर वा माचीवर कोठेही पाण्याची सोय दिसुन येत नाही. गडाला बहुदा नदीतुन पाणीपुरवठा केला जात असावा. येथे आपली दुर्गफेरी पूर्ण होते. गडमाथा व माची फिरण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. गडाच्या नदीकाठी असलेल्या भागाचा कोठेही उल्लेख नसल्याने येथे आलेले दुर्गप्रेमी केवळ गडमाथा पाहुन आपली दुर्गफेरी पुर्ण करतात पण नदीकाठी असलेला हा भाग पाहील्याशिवाय आपली दुर्गफेरी पूर्ण होत नाही. कोकणात फिरताना सोबत खाजगी वाहन असल्यास सकाळी लवकर सुरवात केल्यास सर्जेकोट, भरतगड-भगवंतगड,रामगड हे चारही किल्ले एका दिवसात सहजपणे पाहुन होतात. आपल्या अंगाखांद्यावर अनेक दुर्गावशेष घेऊन बसलेला हा किल्ला इतिहासाबाबत मात्र अबोल आहे. रामगडची उभारणी शिवाजी महाराजांनी केल्याचे सांगीतले जाते पण याला कागदोपत्री कोणताही आधार नाही, शिवाय महाराजांच्या काळात असलेल्या गडकोटांच्या यादीत रामगडचे नाव दिसत नाही. तसेच भरतगडच्या डोंगरावर पाणी नसल्याने गड न बांधणारे महाराज पाण्याच्या सोयीशिवाय रामगड बांधतील हे शक्य वाटत नाही.

गडाचे एकुण बांधकाम पहाता हा गड शिवकाळानंतर बांधला गेला असावा. १८ व्या शतकात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यातील लढाईवेळी तुळाजीने रामगड (Ramgad Fort) जिंकून घेतला. तेव्हा पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र होउन फेब्रुवारी १७९६ मध्ये रामगड जिंकला. तर ६ एप्रिल १८१८ मध्ये कॅप्टन पिअरसनच्या नेतृत्वाखाली गड ब्रिटीशांनी जिंकून घेतला. १८६२च्या पाहणीनुसार रामगडावर २६ तोफा व १०६ तोफगोळे असल्याचा महत्त्वपूर्ण उल्लेख आहे.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment