महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,07,577

समर्थांच्या रामघळी

Views: 2888
11 Min Read

समर्थांच्या रामघळी –

“शुभमंगल सावधान…” हे शब्द कानावर पडताक्षणी राणूबाईंचा मुलगा नारायण बोहल्यावरून जो पळाला आणि त्याच्या पायाला भिंगरी जी लागली ती आयुष्यभर ! एकाच ठिकाणी कायमची वस्ती करायची नाही, फिरत राहायचे, अख्खा देश पालथा घालायचा या एकाच ध्येयाने तो अक्षरशः भारतभर हिंडला. कालांतराने नारायणाचा रामदास आणि रामदासाचे समर्थ झाले, तरी भ्रमंती, देशाटन सुरूच होते. विश्वाची चिंता करणारे समर्थ हिंडत होते, फिरत होते, जनमानस समजून घेत होते. सुरुवातीचा कालखंड हा स्वतःचे शिक्षण, पठण, तपश्चर्या, आत्मज्ञान प्राप्त करणे यात गेला. नाशिकसारख्या तीर्थक्षेत्री तपश्चर्या झाली आणि समाजसुधारणा, समाज बांधणी, तरुणांमध्ये बलोपासनेची आवड निर्माण करून एक समर्थ संप्रदाय तयार करणे आणि त्या संप्रदायाचा राष्ट्रउभारणीसाठी उपयोग करणे ही मनामधील उर्मी पूर्ण करण्यासाठी समर्थ अहोरात्र झटले. प्रभू श्रीरामावरील अपार श्रद्धा आणि मारुतीरायावरील गाढ भक्ती या जोरावर समर्थांनी कुठलेही आव्हान लीलया पेलले नव्हे ते पार करून नवीन संकेत, नवीन पायंडे निर्माण केले.(समर्थांच्या रामघळी)

धीर्धरा धीर्धरा तकवा | हडबडू गडबडू नका ||

असे आश्वासन त्यांनी समाजाला दिले. किंवा ‘सदा सर्वदा देव सन्निध आहे | कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे || असे सांगून आलेल्या संकटाला संधी समजून तोंड देण्याचा मूलमंत्र समर्थांनी दिला. समर्थांचे व्यक्तिमत्व पाहिले की असे जाणवते की अनुभवाची प्रचंड खाण त्यांच्यापाशी होती. त्यांची प्रत्येक उक्ती, काव्यपंक्ती ही संपूर्णपणे अनुभवावरच आधारित होती. आणि हा अनुभव त्यांनी मिळवला तो अखंड देशाटन करून. संबंध भारत हा माणूस पायी हिंडला, लोकांत मिसळला, त्यांच्या चालीरीती, सणवार, सुखदुःखे हे त्यांच्यात राहून समजून घेतले. भारतभ्रमण करून परत आल्यावर त्यांना मनातली देशप्रेमाची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देईना. सह्याद्रीची अनावर ओढ होतीच. सह्याद्री आहेच तसा. माणूस एकदा त्याच्या प्रेमात पडला की त्याच्या रौद्र, राकट सौंदर्याची भुली माणसाला पडते. दऱ्याखोरी, गुहा, लेणी, घळी, आणि गडकोट किल्ले, बेलाग कडे ही सह्याद्रीची संपत्ती माणसाला मोहवून टाकते. समर्थसुद्धा अशाच तीव्रतेने सह्याद्रीकडे ओढले गेले आणि मग डोक्यात सुरु झाले विचारचक्र. याच सह्याद्रीला साथीला घ्यायचे आणि त्याच्याच कुशीत, सान्निध्यात आपला पंथ स्थापन करायचा. संघटना बांधायची. तरुणांना प्रोत्साहन द्यायचे. त्यांना व्यसनी बनवायचे पण ते बलोपासनेचे. आणि आपल्या हृदयातला मारुतीराया मूर्तिरूपाने त्यांच्यासमोर उभा करायचा. त्यासाठी समर्थ आले महाबळेश्वरी. उंच जागा, रम्य ठिकाण, पाच नद्यांचा उगम होतो इथून. गर्द राई, असंख्य वनस्पती. पुरातन देवालय आणि नीरव शांतता. इथून जर आपल्या कार्याला सुरुवात केली तर आपला संदेश या पाचही नद्या महाराष्ट्रभर पोचवतील. आपली धर्मध्वजा अशी उंचावरून फडकायला हवी. दूरवरूनही निरखता आली पाहिजे.

सह्याद्रीने स्फूर्ती दिली. महाबळेश्वराने कौल दिला आणि त्यांच्या साक्षीने समर्थांनी गर्जना केली,

‘मराठा तितुका मेळवावा |

महाराष्ट्र धर्म वाढवावा |

जय जय रघुवीर समर्थ ||

या अभिनव गर्जनेने दऱ्याखोरी दुमदुमून गेली. कमळगडावरून प्रतिध्वनी आला तो केंजळ गडावर आदळला. वैराटगडानं पांडवगडावर संदेश दिला. सुस्त महाराष्ट्र ज्या हाकेची वाट पाहत होता, ती हाक घळीतून, कुहरातून आली होती. या हाकेने अनेक माणसे आकर्षित झाली. पंथ स्थापला, उत्तमोत्तम अनुयायी मिळाले. संप्रदायाचे कार्य सुरु झाले म्हणून समर्थ काही महालात, मठात कधीच राहिले नाहीत.

“दास डोंगरी राहतो | यात्रा देवाची पाहतो ||”

या त्यांच्याच उक्तीप्रमाणे दाट जंगलात, अवघड जागी असणाऱ्या घळी त्यांना विशेष प्रिय होत्या.

‘कडे, कपाटे, दर्कुटे | पाहो जाता भयचि वाटे ||

अशाच ठिकाणी ते रमत. ते कायम सांगत की माझा प्रभु राम हा कायम माझ्यासोबतच असतो. त्यामुळे त्यांनी वास्तव्य केलेल्या घळी या रामघळी म्हणून प्रसिद्ध पावल्या. अशाच काही अप्रसिद्ध रामघळींचा हा घेतलेला शोध. सुप्रसिद्ध शिवथर घळी सोबतच हेळवाक, चंद्रगिरी, तोंडोशी, जरंडा, सज्जनगड, मोरघळ, चाफळची घळ अशा अनेक अनगड ठिकाणी वसलेल्या घळी आपल्याला पाहता येतात. समर्थांच्या या रामघळी निसर्गरम्य आहेत. इथे चहूकडे सृष्टीसौंदर्य उधळलेले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी गेले तर धबधब्यांची मालिकाच पाहायला मिळते. निसर्ग आणि एकांत या समर्थांच्या अत्यंत प्रिय गोष्टी या इथे अनुभवता येतात. याच रामघळींचा घेतलेला मागोवा.

शिवथरघळ :

गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनी चालली बळे

धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे ||

शिवथरघळीचे समर्थांनी केलेलं हे यथार्थ वर्णन तिथे गेले की शब्दशः खरे वाटते. वरंधघाटातून शिवथर खोऱ्यातील सुनेभाऊ मार्गे शिवथरघळीत जाता येते. पाठीशी कावळ्या किल्ला आहेच सोबतीला. ही घळ म्हणजे समर्थ संप्रदायाची पंढरीच होती. दासबोधाचे जन्मस्थान आणि समर्थांना अतिप्रिय वास्तू. पुण्याहून जेमतेम ९० कि,मी वर हे रम्य स्थान आहे. श्री समर्थ सेवा मंडळातर्फे व्यवस्था पाहिली जाते. इथे मुद्दाम पावसाळ्यात यावे. प्रचंड कोसळणारा धबधबा आणि सर्वत्र हिरवेगार असल्यामुळे प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेता येतो. याच घळीच्या वर चंद्रराव मोरे यांच्या वाड्याचे जोते पाहायला मिळते. पण या शिवथरघळीबरोबर अजूनही काही घळींना समर्थस्पर्श झाला होता. समर्थांचे संपूर्ण आयुष्य हे राममय झालेले होते. ते स्वतःच म्हणत की जे काही माझे आहे, माझे काव्य, माझे बोलणे, माझे निवास, माझे अस्तित्व हे पूर्णपणे प्रभू रामचंद्रांमधे विलीन आहे. त्याचमुळे त्यांनी वास्तव्य केलेल्या घळी सुद्धा राममय झाल्या आहेत.

मोरघळ :

सज्जनगडच्या नैऋत्येस मोरबाग या गावाजवळ ही रामघळ आहे. पायथ्याच्या परळी गावात जावे. तिथली प्राचीन केदारेश्वर आणि विरुपाक्ष मंदिरे पहावीत. मग बनघर मार्गे नदी ओलांडून पलीकडे कूस खुर्द ला जावे. तिथून डोंगरचढून वरती पुढे पळसावडे गाव व पुढे मोरबाग वस्ती येते. इथेच पुढे चढून गेल्यावर वर्तुळाकार मुखातून या रामघळीत जाता येते. तीन तोंडाची ही मोरघळ. मध्यभागी मोरोबाचे शिवलिंग आहे. तसेच काही कोरीव शिल्प, सतीचे दगड, वीरगळ व एक समाधीचा चौथरा आहे.

चाफळची रामघळ :

चाफळच्या रामरायाचे दर्शन घ्यावे आणि मग शिंगणवाडीचा खडीचा मारुती पाहून बोरगेवाडी गाठावी. इथूनच पुढे रामघळीचा डोंगर दिसतो. वाटेत काही शिळा दिसतात. इथेच समर्थांनी सदाशिवशास्त्री येवलेकरांचे गर्वहरण एका मोळीविक्याच्या हातून केल्याची कथा आहे. पुढे याच शास्त्रीबुवांना समर्थांनी आपल्या संप्रदायात सामील करून घेतले आणि कणेरी इथे मठ स्थापून तिथे मठाधीपती म्हणून नेमले. इथून पुढे भैरववाडीचे पठार लागते. तिथे एक ध्वज फडकताना दिसते. त्याच्याच खाली आहे रामघळ. ही घळ दुमजली आहे. बाहेरून वेगळी वाटणारी विवरे आतून एकमेकांना जोडली आहेत. कराड चिपळूण रस्त्यावरच्या पाटण गावातूनही इथे जाता येते. एका बाजूला गुणवंतगड तर दुसरीकडे दातेगड असलेल्या या गावात केरला आणि कोयना या दोन नद्यांचा संगम आहे. पाटणहून खंडूआईच्या खिंडीतून या घळीत जाता येते.

तोंडोशीची रामघळ :

या घळीलाच तारळ्याची घळ अथवा कळंब्याची घळ असेही म्हणतात. सातारा-कराड रस्त्यावर काशीळ गावापाशी खंडोबाच्या पाल कडे जाणाऱ्या रस्त्यावर तारळे हे गाव लागते. शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष जावई हरजीराजे महाडिक याच तारळे गावचे. इथून मुरुड आणि पुढे तारळी नदी ओलांडून तोंडोशीमार्गे रामघळीत जाता येते. कड्याच्या पोटाशी असलेली घळ ५० मीटर लांब आहे. या घळीत राम, लक्ष्मण, सीता व मारुतीरायाच्या मूर्ती आहेत.

सज्जनगडची रामघळ :

परळीचा किल्ला किंवा आश्वलायन गड हा समर्थ राहावयास आल्यावर सज्जनगड झाला. परळी गावातून गडाकडे जाणाऱ्या पायऱ्या चढून वर आलं की गाय-मारुती पाशी या घळीकडे जाणारी वाट फुटते. या मुरमाड वाटेवरून जरा काळजीपूर्वकच जावे लागते. वाटेत कड्यामध्ये खोदलेल्या काही पायऱ्या आहेत. या घळीचे तोंड लहान असल्याने आत रांगतच जावे लागते. १५-२० फूट आत गेल्यावर ते विवर उजवीकडे वळते. यानंतर पुन्हा पायऱ्या आणि मग आत ध्यानाला बसायला चांगली औरस चौरस जागा आहे.

जरंड्याची रामघळ :

साताऱ्याजवळचा जरंडेश्वराचा डोंगर म्हणजे मारुतीरायाने नेलेल्या द्रोणागिरी पर्वताचाच पडलेला तुकडा असा समज आहे. या गिरीशिखरावर मुख्य देऊळ हनुमंताचे. याच मारुतीच्या पाठीमागे एक राममंदिर आहे. त्याचे दर्शन घेतल्यावर समर्थांना तिथेच एक वीररसयुक्त काव्य स्फुरले-

रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती

जो नरात वानरात भक्तिप्रेम वित्पती

दास दक्ष स्वामिपक्ष निजकाज सारथी

वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती ||

याच मारुतीच्या पाठीमागे एक राममंदिर आहे. मंदिराच्या मागे काही पायऱ्या उतरल्यावर एक चौकोनी खोदीव खोबण आहे. आतमध्ये पादुका स्थापन केल्या आहेत.

हेळवाकची रामघळ :

उंब्रजहून चिपळूणला जायला लागले की वाटेत हेळवाक हे गाव लागते. तिथे कोयनामाई ओलांडली की कोंढावळे येते. कोंढावळ्याचा धनगरवाडा ओलांडून झाडीतला चढाव चढला की एक धबधबा लागतो. त्याच्याच मागे लपली आहे ही रामघळ. आग्न्येयमुखी ही घळ समर्थांना फारच आवडे. भैरवगड हा किल्ला इथून जेमतेम ८ कि.मी. वर आहे.

चंद्रगिरीची रामघळ :

समर्थ पहिल्यांदा जेंव्हा इथे आले तेंव्हा इथे एक वाघ पहुडला होता. त्यांचे शिष्य मेरुस्वामी लिहितात “ व्याघ्र दरीमाजी पसरला, त्या गवीचे मुखी समर्थ बैसला | गळां घालूनी करपाश, अवरोधिले त्या व्याघ्रास | व्याघ्रासी कुरवाळुनी स्वकरे, दुसरी गवी दाखविली || उंब्रज, कराड आणि चाफळच्या त्रिकोणात चंद्रगिरीच्या डोंगरात ही घळ आहे. कराडवरून तळबीड या गावी जावे. त्यामागचा वसंतगड चढावा. किल्ला पाहून दुसऱ्या टोकाच्या दरवाजाने नाईकबाच्या खिंडीत उतरावे. तिथून रामघळ दिसू लागते. एकुलतं एक झाड, पाण्याचा प्रवाह आणि दगडी चौकटीचं ठेंगणं प्रवेशद्वार या इथे आहे.

समर्थवास्तव्याने पुनीत झालेल्या या सगळ्या घळी निसर्गरम्य आहेत. इथे चहूकडे सृष्टीसौंदर्य उधळलेले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी गेले तर धबधब्यांची मालिकाच पाहायला मिळते. निसर्ग आणि एकांत या दोनही गोष्टी समर्थांना अतिशय प्रिय होत्या. अशा अनगड, अवघड जागीच त्यांचे विचारचक्र वेगाने चाले आणि मग अनमोल काव्यरत्ने प्रसृत होत असत.

खनाळामध्ये जाऊन राहे,

तेथे कोणीच न पाहे

सर्वत्रांची चिंता वाहे सर्वकाळ ||

ज्या ज्या ठिकाणी समर्थ गेले तिथे तिथे त्यांच्या मुखातून रामकृपेचे एवढे अनमोल साहित्य प्रसिद्ध झाले की मग ते लवथळेश्वर मंदिरातील ‘लवथवती विक्राळा …’ ही शंकराची आरती असो, वा कृष्णाकाठावरची ‘सुखसरिते गुणभरीते दुरिते निवारी..’ ही कृष्णामाईची आरती असो. पंढरीच्या विठोबाला पाहून ‘इथे का रे उभा श्रीरामा ..’ हा सवाल असो वा प्रतापगडाच्या पायथ्याला पार गावात रामवरदायिनीला पाहून ‘देखिली तुळजा माता निवालो अंतर सुखे..’ अशी समर्थांची वाग्वैजयंती कायम प्रवाहित होत असे. जनजागृती आणि त्याद्वारे राष्ट्रसेवा या गोष्टी समर्थांनी आयुष्यभर जपल्या तरीही प्रसिद्धीचा अवडंबर कुठेही नव्हता. दासबोधासारखा व्यवस्थापन शास्त्रावरचा उत्कृष्ट ग्रंथ निर्माण केला तरीही समर्थ विरागी वृत्तीने रामघळी, दरी-खोरे, कडे-कपारी यातच रमले. आपले सर्वस्व प्रभूरामाच्या चरणी वाहून ते या जनमानसांत राहूनही अलिप्तच राहिले.समर्थांच्या रामघळी.समर्थांच्या रामघळी.

Ashutosh Bapat

Leave a Comment