रामजी पांगेरा | एक अद्भुत योद्धा –
आज आपण इतिहासातील एका अश्या योध्याचा पराक्रम जाणून घेणार आहोत ज्याची गणना अग्निप्रमाणे पाच तेजस्वी अश्या वीरांमध्ये केली जाते. त्या योध्याचं नाव आहे वीर रामजी पांगेरा.
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी,
रणफंदिंची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी.
या युक्तीला सार्थ ठरणारे नाव म्हणजे रामजी पांगेरा. बऱ्यापैकी अंधारात असणारं हे व्यक्तिमत्त्व. रामजी पांगेरा हे त्यांच्या आयुष्यातील 2 मोठ्या लढायांसाठी ओळखले जातात एक म्हणजे प्रतापगड युद्ध आणि दुसरं म्हणजे कण्हेरगड. प्रतापगड युद्धामध्ये जावळीच्या जंगलात या वाघाने थैमान घातले होते. महाराजांनी त्यांचा पराक्रम आणि योग्यता जाणून त्यांच्यावर योग्य ती कामगिरी सोपवली होती.
इ.स. १६७० मध्ये महाराजांनी मुघलांबरोबर असणारा तह मोडून आपले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली होती. या वेळेस स्वराज्यात अगदी मोजके किल्ले होते एकूणच परिस्थिती अडचणीची होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार रामजी पांगेरा हे तेव्हा कण्हेरगड (कळवण, नाशिक) किल्ल्याच्या परिसरात होते कारण मुघलांच्या फौजा कधी स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता, त्यामुळे रामजी हे १००० मावळ्यांना सोबत घेऊन तेथील सपाटीच्या प्रदेशात तळ ठोकून होते. या धामधूमीत दिलेरखान पठाण हा औरंगजेबाचा खासा सरदार बुऱ्हाणपूराहून ३०००० सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून येत आहे ही बातमी रामजी यांना हेरांकडून समजली.
दिलेरखानाने साल्हेर किल्ल्याला वेढा घातला त्यानंतर पुढे रवळ्या किल्ल्याला वेढा घातला असता मोरोपंत पेशव्यांनी त्याच्यावर जमिनीवरून आणि रवळगड किल्ल्याच्या किल्लेदाराने गडावरून मुघली फौजेला कोंडीत पकडून त्यांच्यावर एकत्रित मारा केला. या घटनेमुळे दिलेरखानाने चिडून मोरोपंत पेशव्यांच्या तुकडीचा पाठलाग केला. मोरोपंतांनी त्याला चांगलाच पळवला. पण या धावपळीत दिलेरखान त्याचे ५००० सैन्य घेऊन कण्हेरगडाजवळ आला. रामजी पांगेरा यांनी ७०० मावळे सोबत घेऊन बाकीचे कण्हेरगडावर पाठवून दिले. कण्हेरगडाजवळ आलेल्या पठाणी फौजांवर रामजींनी अचानक हल्ला केला.
रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला , ‘मर्दांनो , खानाशी झुंजायचंय , जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळी बांगडी ‘ असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरची बाराबंदी टराटरा फाडून फेकली डोईवरचं मुंडासे तर केव्हांच हवेत भिरकावलं होतं. उघडाबोडका होऊन दोन्ही हातात तलवारी सरसावून शत्रूसमोर सहयाद्री सारखा उभा ठाकला होता. ३ तास मोठं रणकंदन माजलं होतं. हर हर महादेवच्या गर्जनेने रणभूमी गर्जून निघाली.
७०० मावळ्यांसह लढत असलेला रामजी पांगेरा अन समोर दिलेरखानाचं प्रचंड सैन्य निभाव तरी कसा लागावा. रामजींना शेजारच्या कण्हेरगडावर आश्रयाला जाता आलं असतं काही कुमकही मागवून घेता येत होती पण समोर दिसत होता दिलेर तोच ज्याने मराठ्यांना संपवण्यासाठीचा विडा उचलला होता. तोच दिलेर ज्याने मुरारबाजींना धारातीर्थी पाडलं, तोच दिलेर ज्याच्यामुळे महाराजांना स्वराज्यातील २३ किल्ले तह करून गमवावे लागले.
रामजींच्या नेत्रात आग होती, दोन्ही हातात तलवारी नव्हत्या विजा कडाडत होत्या. मावळ्यांनी जवळपास १२०० च्या वर मुघली फौज कापून काढली. रामजींच्या रणशौर्याने दिलेरखानाने सुद्धा तोंडात बोटं घातली. त्याला समोर तोच पुरंदरावरील मुरारबाजी दिसत होता. हजारोंची फौज गारद केली. अखेर मराठ्यांच्या शौर्यापूढे दिलेर मागं हटला, त्याची सावली सुद्धा कण्हेरगडाला शिवू शकली नाही. पण या युद्धात रामजींच्या सह मावळे धारातीर्थी पडले.
कवींद्र परमानंदकृत श्रीशिवभारतामध्ये रामजींचे गुणगान करताना कवींद्र म्हणतात,
सौलक्षिक: कमलजिद्यशोजीत कंक एव च ।
तानजिन्मल्लसूरश्च कुंडो बरखलस्तथा ।।२।।
राम: पांगरिकश्चामी पंच पंचाग्नि तेजस:
एकैकेन सहस्रेण पत्तीनां परिवारिता: ।।३।।
अर्थ : कमळोजी सोळंखे , येसाजी कंक, तानाजी मालुसरे, कोंडाजी बरखल आणि रामजी पांगारकर हे पाच अग्नीप्रमाणे पाच तेजस्वी वीर एकेक हजार पायदळासह वेगाने येऊन अरण्याच्या मध्यभागी असलेल्या, पुष्कळ योद्धयांची गर्दी असलेल्या शत्रुसैनेस चोहोंकडून घेरले.
“रामजी पांगेरा हे छत्रपती शिवरायांच्या पंचाग्नीप्रमाणे तेजस्वी अशा पाच सेनानींपैकी एक होते.”- परमानंद
वरिल शब्दात शिवभारतकार परमानंदानं नरवीर रामजीराव पांगेरा यांचं वर्णन केलं आहे…
आत्तापर्यंत यांनी लढलेल्या दोनंच लढाया ज्ञात आहेत एक प्रतापगडची आणि दुसरी कण्हेरगडाची…
कण्हेरगडच्या युद्धाविषयी सभासद म्हणतो,”दिलेलखान दाहा हजार स्वारांनिशी अहिवंत किल्ल्यावर रवाना झाला.दिलेलखान येऊन रवळाजवळ्यास लागले.गडकरी बरे भांडले.मोठे युद्ध जालें.गड हातास आला नाहीं.मोरोपंत पेशवे यांनी उपराळियास मावळे लोक बारा हजार रवाना केले.त्यांनो जाऊन छापे घातले.ऐसा घाबरा केला.रामजी पांगेरा म्हणून हशमांचा हजारी त्यानें हजार लोकांनिशी कणेरागड आहे.त्याखालें दिलेलखानाशीं युद्ध केलें.हजार लोक थोडे देखून दिलेलखान यानें फौजेनिशीं चालून घेतलें.रामाजी पांगेरे यांनी आपले लोकांत निवड करून,निदान करावयाचे आपले सोबती असतील ते उभे राहाणें,म्हणून निवड करितां सातशे माणूस उभे राहिले.तितकियांनी निदान करुन भांडण दिधलें.दिलेलखान याची फौज(इनें) पायउतारा होऊन चालुन घेतलें.चौफेरा मावळे भांडिले.दिलेलखानाचें बाराशें पठाण रणास आणिले.मग सातशे माणूस व रामजी पांगेरा सर्वही उघडे बोडके होऊन एक एकास वीस वीस तीस तीस जखमा तिराच्या,बर्चीच्या लागल्या.लोक मेले,मोठे युद्ध जालें.मग दिलेलखान याने तोंडात अंगोळी (अंगुली) घालून एक घटका आश्चर्य केलें….”
रामजीराव पांगेरा यांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही कण्हेरगड (ता.कळवण,नाशिक) उभा आहे कधी गेलात कळवणला तर आवर्जुन भेट द्या….
संदर्भ :-
1-परमानंदकृत शिवभारत
2-सभासद बखर
चित्र : अज्ञात