महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,003

पानोडीचे रामजी पाटील जाधव | अपरिचित मुसद्दी सरदार

By Discover Maharashtra Views: 1623 7 Min Read

अपरिचित मुसद्दी सरदार पानोडीचे रामजी पाटील जाधव –

१८ व्या शतकातील मराठ्यांचा इतिहास हा मराठा राज्यातील  विविध सरदार घराणे, त्यांचे कार्य ,त्यांचे आपसातील राजकारण आणि त्यांनी संपादन केलेले विजय, त्या माध्यमातून मराठ्यांचा घडून आलेला साम्राज्य  विस्तार याचा इतिहास आहे. या काळात मराठ्याची विविध सरदार घराणी नावारूपाला आली . त्यापैकीच अहमदनगर जिल्यातील संगमनेर तालुक्याच्या पानोडी गावाचे जाधव घराणे हे एक आहे. पानोडी चे जाधव घराणे हे देवगिरी च्या यादव राजाशी संबंधित आहे.(पानोडीचे रामजी पाटील जाधव)

१८ व्या शतकात या घराण्यातील सुभानजी पाटील जाधव यांना ४ मुले होती. १) रामजी २) लक्ष्मण ३) विठोबा  ४) राघोबा , पैकी थोरला मुलगा रामजी हा कर्तबगार निघाला . प्रथम तो महादजी शिंदे यांच्या पदरी असलेला विश्वासू सरदार रायाजी पाटील शिंदे यांच्या घोड्याच्या पागेचा बारगीर होता. आपल्या घोडेस्वारी व तलवार बाजी वर महादजी शिंदे यांचा सरदार झाला.

पानिपतच्या युद्धानंतर उत्तर हिंदुस्थानात ज्या स्वाऱ्या झाल्या त्यात महादजीच्या सैन्याने पराक्रम करून १७८२ मध्ये महादजी शिंदे यांनी दिल्लीची सूत्रे हाती घेतली आणि मराठी शाहीचे सुवर्णयुग   दिल्लीतअवतरले. महादजी शिंदे यांचे बरोबर रघुनाथ कुलकर्णी व त्यांचे बंधू गोपाळराव व कृष्णराव तसेच मल्हार आप्पा खंडेराव, आबूजी इंगळे, रायाचे पाटील शिंदे ,रामजी पाटील जाधव, बाळाजी गुलगुले अशा त्या काळातील अनेक कर्तबगार प्रमुखांची नावे इतिहासात आढळतात.

महादजी शिंदे यांच्या सैन्याचा आवाका एवढा मोठा होता की, पेशव्यांकडे जेवढे सैन्य होते तेवढे शिंद्यांकडे होते. महादजी शिंदे च्या सैन्यात 260 सरदार होते, त्यापैकी 16 सरदार हे मुत्सद्दी होते. त्या मुसद्दी सरदारांत रामजी पाटील जाधव हे एक होते, पुढे त्यांची महादजी शिंदे यांनी पेशवे दरबारात आपला वकील म्हणून नेमणूक केली. त्यामुळे पेशवे दरबारात जे काही खलबते होत त्यात महादजी शिंदे च्या वतीने रामजी पाटील जाधव शिष्टाई करीत असत. त्याचप्रमाणे तहाची बोलणी होत त्यात रामजी पाटील जाधव यांचा मोठा सहभाग असत.

सन  1776 मधील सदाशिव भाऊच्या तोतयाची  घटना घडली त्याचे बस्तान जुळत चालल्याचे समजल्यावरून  ते बंड मोडण्याची खटपट पेशव्यांनी चालवली. या तोतयास इंग्रजांचा ही पाठिंबा होता. ही गोष्ट पुरंदरच्या तहा विरुद्ध होती. अशाप्रकारे तोतयाचे प्रस्थ वाढल्यामुळे  पेशव्यांनी शिंद्यांस  त्यांचे पारिपत्य करण्यास सांगितले . पेशव्यांनी आपला सरदार भिवराव  पानसे बरोबर फौज  देऊन शिंदे यांच्याकडे पाठवले . महादजी शिंदे यांनी पानसे बरोबर आपला सरदार रामजी पाटील जाधव यांची नेमणूक केली. या उभयतांनी तोतयाचा पराभव करून कैद केले  व त्याची रवानगी पुण्यास  केली. त्यास नाना फडणवीस  यांनी 17 डिसेंबर  1776  रोजी हत्तीच्या पायी  बांधून ठार  केले.(पानोडीचे रामजी पाटील जाधव)

सन 1794 साली  महादजी शिंदे यांना देवाज्ञा झाली. त्यांचे सर्व  संस्कार झाल्यावर दौलतराव शिंदे यांना वारस नेमण्यासाठी त्याचप्रमाणे व त्यांची सरदार की ची वस्त्रे मिळविण्यासाठी रामजी पाटील जाधव हे सवाई माधवराव पेशवे यांचेकडे  बोलणी करण्यास गेले होते . जेव्हा सन 1795 मध्ये सवाई माधवराव पेशवे कालवश झाले तेव्हा त्यांचा वारस नेमण्यासाठी बरीच राजकारणे झाली .  दुसरे बाजीराव यांची पेशवे पदी नेमणूक झाली. ही नेमणूक होताना दौलतराव शिंदे व नाना फडणवीस यांच्यात बराच वादविवाद होऊन शेवटी दौलतराव शिंदे यांना रामजी पाटील जाधव व रायाजी  पाटील शिंदे यांनी समजावून सांगितले तेव्हा दौलतराव शिंदे व नाना फडणवीस यांनी दुसरे बाजीराव यांची पेशवेपदी नेमणुकीस सहमत झाली

पेशवे काळाच्या उत्तरार्धात सन १८०२ मध्ये शिंदे व होळकर यांच्या एकमेकांच्या वितुष्टामुळे होळकराचे सरदार आबाजी लाड, फतेशिंग माने ,शामतखान पठाण, मिरखान पठाण वगैरे त्यांचे अनेक सरदार सर्व प्रांतभर पसरले. त्यांनी लूटमार करून कहर केला. फत्तेशिग माने आणि आबाजी लाड यांनी अहमदनगर प्रांतावर स्वारी केली. महिना पंधरा दिवसात शिरापूर, जामगाव, पेडगाव, चांभारगोदे सिद्दटेकपर्यतचा शिंद्यांचा सर्व मुलुख मान्यांनी लुटून जाळून बेचिराख केला.

शिंद्याच्या पदरचे जुने मुत्सद्दी सरदार रामजी पाटील जाधव आणि त्यांचा आवडता हुजऱ्या बाणाजी शेटे यांच्या वाड्याची दुर्दशा केली.

गुगलवर esakal.com या वेबसाइटवर जलव्यस्थापनाचा पाचशे वर्षांपूर्वीचा सरदार थोरातांचा वाडा हा लेख वाचण्यात आला. सदर लेखात पानवडी ही देवगिरीच्या जाधवांची जहागीरी होती असे म्हटले आहे.महाराष्ट्रातील जाधव आडनावाची बहुतेक घराणी ही देवगिरीच्या यादवांचे वंशज आहे. परंतु काही घराण्यातील पराक्रमी पुरुषांनी ते घराणे नावारूपाला आणले .त्यापैकीच पानवडीच्या जाधव घराण्यातील सरदार रामजी पाटील जाधव हे १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात नावारूपाला आले. त्याच्याच काळात वाडा बांधला असावा म्हणजेच वाड्याच्या बांधकामास ५०० वर्षे झालेली नाही.

सरदार रामजी पाटील जाधव यांच्या अंगी असणारे शौर्य बुद्धीचातुर्य स्वामीनिष्ठा दृढनिश्चय या गुणामुळे जवळ जवळ २५ ते ३० वर्षे शिंद्यांबरोबर व पेशव्याबरोबर मराठा साम्राज्यासाठी लढत होते. सरदार रामजी पाटील जाधव यांच्याकडे १०३ गावे ईनाम होती. त्यातील काही पाटील वतन, जहागिरी, देशमुखी,सरदेशमुखी व चौथाईची गावे होती. सरदार रामजी पाटील जाधव यांचा भाऊ लक्षीमन पाटील जाधव हा सुद्धा महादजी शिंद्याच्या सैन्यात सरदार होता, सरदार रामजी पाटील जाधव यांच्याकडे कोणती १०३ गावे ईनाम होती? राज्यात व परराज्यात किती गावे होती ?रामजी पाटील यांचे अजून दोन भाऊ विठोबा  व राघोबा हे कोणाच्या सैन्यात होते ?पानवडीचे अजून एक व्यक्तिमत्व इतिहासात आढळते ते म्हणजे चांदजी पाटील जाधव.

श्री हिरालाल पगडाल सर यांचा “संगमनेरचा वैभवशाली इतिहास” हा लेख माझ्या वाचण्यात आला. त्यात कुतुबमिनार उभारणारा दिल्लीचा बादशाह कुतुबुद्दीन ऐबक संगमनेरला येऊन गेला. मुघल बादशाह हुमायूनचा पराभव करणारा शेरसिंग सूरी संगमनेरला काही दिवस मुक्कामी होता. ताजमहाल बांधणारा शहाजहान व त्याची बेगम मुमताज त्यांची मुले दाराशुकाह व औरंगजेब हे सर्व वास्तव्यास होते. बादशहाच्या वास्तव्याची आपण दखल घेतो,अशीच दखल सरदार रामजी पाटील जाधव यांची घ्यावी. ते संगमनेर तालुक्याचे रहिवाशी असून, त्यांचा जन्मगाव पानोडी आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास तालुक्यातील जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील इतिहास तज्ञानी अभ्यासून समाजापुढे आणावा.

लेखन- विलास कोंडीराम जाधव

संदर्भ –
१)मराठी रियासत (उत्तरविभाग ३)- गो. स. सरदेसाई
२)शिंदेशाहीचा खरा इतिहास अथवा जिवबादादा केरकर यांचे चरित्र- न. व्यं. राजाध्यक्ष
३)ऐतिहासिक लेख संग्रह (भाग चौदावा ) संपादक- यशवंत वासुदेव खरे
४)मराठयांची बखर – ग्राण्ट डफ

छायाचित्र- पानोडी (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) येथील वाड्याचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार

Leave a Comment