श्रीरामाचे रामसगाव –
जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला घनसावंगी तालुक्यातील रामसगाव हे विविध कारणांनी शेकडो वर्षापासून प्रसिद्ध आहे अंबड-घनसावंगी तालुक्यातील रामसगाव तसे मातब्बर पुढा-यांचे व जमीन जुमला वाडे जित्राब व राबते असलेल्या लोकांचे गाव म्हणून परिचित असुन त्याचबरोबर राजकीय, सामाजिक,धार्मिक ओळख ही नावारुपाला आलेली आहे.
तिर्थपुरीपासुन 6 कि.मी अंतरावर रामसगाव आहे परिसर बारामही हिरवा गार असतो आजुबाजुला मोठ्या प्रमाणावर उसाची शेती असल्याने गोदावरीच्या काठावर वसलेले रामसगाव शेतीने समृध्द झालेले आहे.
अहिल्याघाट –
गावाच्या शेजारी श्रीराम घाट असुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अप्रतिम असा घाट येथे निर्माण केलेला आहे याच घाटावर हिंदू लोक दहाव्याचा कार्यक्रम करीत असतात अर्थात मृत व्यक्तीचे नातेवाईक इथे दशक्रिया विधी घालुन मृतात्म्यास शांती मिळावी यासाठी पिंडदान करतात अनेक वर्षाची परंपरा असल्याने दशक्रिया विधीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गंगेच्या काठावर सुंदर असा दगडी घाट निर्माण केलेला आहे आजही दगडी घाट मजबूत असुन घाटाला तटबंदी आहे या घाटाने गोदावरीचे अनेक पुर-महापुर बघितले आहेत आज हा घाट अर्धा पाण्यात असुन रामसगाव चे माजी सरपंच प्रल्हाद भोजने यांनी त्यांच्या कार्यकाळात घाटाची डागडुजी केली तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परिसरात विकास कामे केलेली आहेत.
कवयित्री महदंबा –
महानुभाव पंथातील महदंबा ही आद्य कवयित्री असुन महदंबाचे जन्मगाव म्हणून रामसगाव ची ओळख आहे. महानुभाव पंथाच्या साधुसंताच्या अनेक समाध्या श्रीराम मंदिराच्या शेजारी असुन याचा जीर्णोद्धार महानुभाव पंथातील दानशूर लोकांनी केलेला आहे .
श्रीराम मंदिर –
श्रीराम मंदिरावरुन या गावचे नाव रामसगाव पडले असावे गावच्या दक्षिणेला श्रीरामाचे पुर्वमुखी मंदिर असुन त्यात रामपंचायतन मुर्ती आहे मंदिरासमोर मारुतीचे छोटे देवुळ आहे. मंदिर परिसरात भुयारी मार्ग असुन काही वर्षांपूर्वी ते बंद केलेले आहेत मंदिराचे बांधकाम जुने असल्याने ते जिर्ण झाले असुन गावातील जेष्ठ नागरिक मंदिरासमोर बसलेली असतात. मंदिर परिसरात अनेक साधुसंतांच्या मोठमोठ्या समाध्या व मठ आहे.
श्रीराममंदिर शेजारच्या एका समाधीवर एक शिलालेख आहे
“श्री स्वामी बलरामजी चंग दावरादास व गोपाळदास सन १९७१ श्रावण”
सतीचे मंदिर –
श्रीराम मंदिराकडे जात असतांना डाव्या बाजूला एक समाधी असुन स्थानिक गावकरी त्यास सतीची समाधी म्हणतात काळ्या व तांबड्या दगडात या समाधीचे बांधकाम झालेले असुन त्यास शिखर आहे समाधी काटेरी सुबाभळींनी वेढल्यामुळे तिथे कुणी जात नाही तर सतीची समाधी असल्याबाबत तिथे सतीशीळा किंवा वीरगळ तेथे आढळलेली नाही यामुळे यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
समाजवादी अकुंश भालेकर –
रामसगाव येथील अकुंश भालेकर हे समाजवादी चळवळीतील एक नाव असुन स्व.अकुंशराव टोपे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे ते जनता दलाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते मात्र त्यांचा पराभव झाला होता अंकुश भालेकर हे सध्या पुणे येथे स्थायिक झाले आहे.
काँम्रेड भानुदास तात्या भोजने –
खमिज-धोतर डोक्यावर टोपी आणि गळ्यात शबनम घालुन फिरणारे भानुदास तात्या भोजने संबंध महाराष्ट्राला परिचित असुन भांडवलदारांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी डाव्या चळवळीत आजन्म राहुन विचार आणि ध्येय कधीच सोडले नाही.
तात्यांनी अनेकांना ग्लँमर तयार करुन दिले आहे राजकीय सामाजिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांची सतत धडपड असायची. राजकारणात शरद पवार यांचेपासुन डाव्या चळवळीचे सर्व नेते त्यांना ओळखतात जालना जिल्ह्यातील लोक त्यांना आदराने तात्या म्हणतात. आयुष्य भर काँम्रेड म्हणून जगलेले भोजने तात्या आता थकले आहेत मात्र गावात फिरत असतात सतत प्रवास करणारा माणूस गावात व घरी शांत कसा बसणार म्हणून ते गावातील तरुणांना सामाजिक राजकीय सक्रिय करण्याचे काम करीत असतात रामसगाव च्या अनेक ओळखी असतांना काँम्रेड तात्यांचे गाव म्हणून ही पंचक्रोशीत ओळखले जाते.
श्री.रामभाऊ लांडे ,अंबड