आदिशक्ती श्री रामवरदायिनी मंदिर, चोरवणे,ता खेड –
भारत देशाच्या संतांच्या भूमीत,कोकण किनारपट्टीतील निसर्गसंपन्न रत्नागिरी जिल्हातील खेड तालुखा आणि त्यातील, पवित्र वाशिष्ठी नदीच्या उगमस्थानी, स्वयंभू नागेश्वर मंदिराच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत, चोरवणे गाव आणि या गावाचे ग्रामदैवत शिंदे घराण्याचे आदिदैवत असलेले श्री रामवरदायिनी मातेचे मंदिर रत्नागिरी जिल्हातील श्रद्धास्थान आहे.
त्रेतायुगा मध्ये रावणाने सीताहरण केल्यानंतर प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत जंगलामध्ये फिरत होते. त्यांना बघून पार्वती शंकराला म्हणली,”राम सीतेच्या शोधात फार व्याकूळ झाले आहेत, त्यांची ती अवस्था मला पहावत नाही, तेव्हा मी त्यांची सीता बनून त्यांच्याकडे जाते, जेणेकरून ते ह्या दु:खातून सावरतील”. तेव्हा शंकर म्हणाले “तसे काही करू नकोस ते तुला ओळखतील, ते परम पुरुष असून, एकवचनी, एकबाणी आहेत. शिवाय ते विष्णूचाच अवतार आहेत. परंतु पार्वतीला त्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही., तिने सीतेचे रूप घेतले आणि श्रीरामासमोर प्रकट झाली, श्रीरामाला म्हणाली “नाथ! आपण का इतके का व्याकूळ झालात, मी तर इथेच आहे, तेव्हा माझा स्वीकार करा”. परंतु प्रभूरामचंद्राने पार्वतीला ओळखले, आणि त्या सीतेच्या रूपातील पार्वतीला म्हणाले, ’माते! तू कशाला एवढे कष्ट घेतलेस आणि इकडे आलीस?”. तेव्हा पार्वतीने आपले मूळ रूप प्रकट केले आणि श्रीरामाला वरदान दिले की, “ज्या कार्यासाठी आपण जन्म घेतलात, ते कार्य सफल होईल”. तेव्हा रामाने पार्वतीला विनवले, ’देवी! तू एवढे कष्ट घेतलेस आणि ह्या जागी आलीस, तर तू या जागेवर ’श्रीरामवरदायिनी’ नावारूपाने रहा आणि भक्तांचे कल्याण कर’, तेव्हा पासून श्रीरामवरदायिनी देवीचे जागृत देवस्थान या गावामध्ये आहे.
आपणास हे मंदिर अतिशय सुंदर दिसते, परंतु त्यामागे फार मोठा इतिहास आहे आणि तो जाणून घेणं देखील तितकच महत्वाचे आहे मंदिर बांधणी कोणत्या पद्धतीने करावी हे फार मोठे कोडे होते, परंतु देवीने कौल देऊन पाशाणी पुरातन काळी पद्धतीनेच बांधावे असे सांगितले. त्यानंतर गावातील प्रतिष्ठीत मंडळी एकत्र येऊन इतिहास मंदिरांना भेटी चे कार्यक्रम सुरु झाले, अखेर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथील वयोवृद्ध शिल्पकार कैलासवासी पाथरूड यांनी या कामासाठी सहमती दर्शवली आणि यांच्या कल्पनेतून या मंदिराची पायाभरणी झाली. मंदिर हेमांडपंथीय असून मंदिरासाठी लागणार दगड कोल्हापूर, निपाणी (कर्नाटक)येथील प्रमुख खाणीतून आणण्यात आला, मंदिराची जागा 35गुंठे असून गाभारा 15×15, कळस 40 फूट उंच , पालखी आसन 25×11, झोलाई, मानाई वाघजाई गाभारा 13×13, सभा मंडप 25×30, जोते 4फूट, गाभाऱ्यातील जोते 6 फूट उंचीचे आहे, मुख्य प्रवेशद्वार 10 फूट रुंद आणि 24 फूट उंच पाषाणी नक्षीदार आहे,दक्षिण द्वार 14 फूट उंच आहे, सदर मंदिराला 4 फूट उंची असलेली तटबंदी आहे, मंदिराचे भूमिपूजन 108 नीलकंठ शिवाचार्य महास्वामी आदीमठाध्यक्ष धारेश्वर महाराज पाटण जिल्हा सातारा यांच्या शुभहस्थे कार्तिक कृ षष्ठी 1929 गुरुवार दिनांक 29 नोव्हेंबर 2007 रोजी झाला.
सदर हे देवस्थान शिंदे देसाई यानसोबत सन 1003 सालात सिघलदीप येथून पुढे आकाडी होम, रुडावर, भेळदेश, सातारा तांबी, मोरणी ह्या ठिकाणी स्थालांतरित झाली, पुढे काही पार्ट्या तारल्या मार्गी कुंभार्ली घाटाने कोकण परशुराम भूमीमध्ये 20 गाव चोरवणे, दसपटी दादर, सोंड, पार अशा गावी स्थायिक झाल्या, मराठेशाहीतील शिंदे घराणे एक पराक्रमी घराणे व भूतपूर्व ग्वाल्हेर संस्थानचे संस्थापक राजघराणे. कण्हेरखेड (जि.सातारा) येथील पाटीलकी या घराण्याकडे होती. शिवाय शिंदे हे औरंगजेबाच्या पदरचे मनसबदार असल्यामुळे बादशहाने छत्रपती शाहूंशी त्यांची सोयरीक करून दिली होती. छ. शाहू औरंगजेबाच्या कैदेत असतानाच ही शिंद्यांची मुलगी मरण पावली. दत्ताजीचा मुलगा जनकोजी हा बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या पदरी होता मात्र त्याविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. ह्याचा मुलगा राणोजी होय. राणोजीपासूनच शिंदे घराणे पुढे आले.बाळाजी विश्वनाथच्या पदरी पायदळात राणोजी होता (१७१६). पहिल्या बाजीराव पेशव्याने त्यास बारगीर केले (१७२२). निजामाबरोबर झालेल्या १७२४ च्या साखरखेड येथील लढाईत राणोजीने भाग घेतला. तो १७२५ मध्ये शिलेदार झाला. कर्नाटकच्या मोहिमेतही तो होता. चिमाजी आप्पाने १७२८-२९ दरम्यान शिंदे, होळकर व पवार यांच्या मदतीने माळवा जिंकून या तीन सरदारांत त्याची वाटणी केली.
राणोजी अत्यंत शूर व निष्ठावंत असल्यामुळे त्यास दीड कोटी वसुलापैकी ६५•५ लाखांचा मुलूख वाटणीस आला. शिंद्यांनी माळव्यात जम बसविला. राणोजीने निजामाविरुद्धच्या भोपाळ वेढयात (१७३७) तसेच वसईच्या प्रसिद्ध लढाईत (१७३७–३९) भाग घेतला होता. वसईच्या किल्ल्याला सुरुंग लावण्याची बहादुरी त्याने केली. राणोजी सुजालपूरजवळ १७४५ मध्ये निवर्तला. त्यास जयाप्पा, दत्ताजी व जोतिबा हे तीन औरस पुत्र व तुकोजी आणि महादजी हे दोन अनौरस पुत्र होते. त्यांपैकी तुकोजी हा राणोजीपूर्वी मरण पावला आणि ओर्छाच्या राजाने जोतिबास दगा करून १७४३ मध्ये मारले.
त्यामुळे राणोजीनंतर जयाप्पाकडे घराण्याची सूत्रे आली. पुढे शिंदे-होळकरांनी मिळून दिल्लीचा वजीर सफदरजंग याच्या मदतीसाठी गंगा-यमुना यांच्या दुआबात जाऊन रोहिल्यांची खोड मोडली. तेव्हा सफदरजंगच्या सल्ल्यावरून बादशहाने मोगल सत्तेचे रक्षण करण्याचे काम मराठ्यांवर सोपविले आणि त्या बदल्यात काही प्रदेश व काही प्रदेशांचे वसुली अधिकार मराठ्यांना बहाल केले. याच कामगिरीवर राजस्थानात असताना, जयाप्पा शिंदे राजपुतांविरुद्ध नागोर येथे लढत असताना विश्वासघाताने त्याची हत्त्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ दत्ताजी व मुलगा जनकोजी हे शिंदे घराण्याचा कारभार पाहू लागले.
दत्ताजी शूर होता. अब्दालीने दिल्ली लुटल्यानंतर (१७५७) पेशव्यांनी त्यास उत्तर हिंदुस्थानचा कारभार सुधारण्याचा आदेश दिला. त्याच्यावर नजीबखानाचे पारिपत्य, लाहोरचा बंदोबस्त, तीर्थक्षेत्रे मुक्त करणे आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी पैसा उभा करणे इ. जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. त्यांपैकी नजीबखानास त्याने कैद केले पण मल्हारराव होळकरांच्या मदतीने नजीबखान सुटला. दत्ताजीने नंतर लाहोरचा बंदोबस्त केला व साबाजी शिंद्याकडे तेथील व्यवस्था सोपविली. पेशव्यांची आज्ञा असूनही होळकरांनी दत्ताजीला म्हणावे तसे सहकार्य दिले नाही. अखेर दत्ताजी नजीबखान रोहिल्याच्या कचाट्यात सापडला. त्यातून तो सुटला पण १० जानेवारी १७६० रोजी दिल्लीजवळ बुराडीच्या घाटात अब्दालीशी लढताना त्याला वीरमरण आले. त्याला अपत्य नव्हते. जयाप्पाचा मुलगा जनकोजी हा पानिपतच्या लढाईत मरण पावला (१७६१). यावेळी त्याची पत्नी काशीबाई पानिपतच्या स्वारीत हजर होती.
जयाप्पा, दत्ताजी, जनकोजी यांनी मर्दुमकी गाजविली पण महादजी (१७२७–९४) याने शिंदे घराण्याचे नाव इतिहासात अजरामर केले. महादजीने पुरंदऱ्या समवेत पुण्यावर चालून येत असलेल्या सलाबतजंग व बुसी यांच्या सैन्यावर हल्ला करून त्यांचा पराभव करण्यात पुढाकार घेतला (२७ नोव्हेंबर १७५१). यानंतर महादजीने अनेक लढाया केल्या. त्यांपैकी तळेगाव-उंबरी, औरंगाबाद, साखरखेड या मुःख्य होत. त्याची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे युरोपीय धर्तीवर प्रशिक्षण दिलेल्या फौजेच्या जोरावर दिल्लीच्या पादशाहीवर व उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र मराठ्यांचा वचक त्याने बसविला. पुणे येथे (वानवडी) अल्पशा आजाराने महादजी मरण पावला (१२ फेब्रुवारी १७९४). त्याला अपत्य नसल्याने त्याच्या भावाचा नातू दौलतराव (कार. १७९५–१८२७) गादीवर आला मात्र महादजीच्या विधवांचे व त्याचे पटले नाही आणि संघर्ष निर्माण होऊन त्यात दौलतरावाचा पराभव झाला.
पुढे नर्मदातीरी यशवंतराव होळकरांबरोबर लढाई होऊन तीतही दौलतरावाचा पराभव झाला तरीसुद्धा पुढे यशवंतरावाच्या मदतीने त्याने भोपाळ येथे इंग्रजांशी अयशस्वी लढा दिला (१८१४). पुढे सर्व आघाड्यांवर अपयश आल्यावर त्याने इंग्रजांचा आश्रय घेतला आणि तैनाती फौज ठेवण्याचे मान्य केले. इंग्रजांबरोबरच्या तहांत (१८०३, १८०५ व १८१७-१८) चंबळ ही उत्तर सीमा ठरवून शिंद्यांच्या सत्तेचा संकोच झाला. राजपूत संस्थानांवरील हक्क संपुष्टात आले व राजधानी उज्जैनहून ग्वाल्हेरला गेली. ऐशारामात जीवन व्यतीत करून दौलतराव ग्वाल्हेर येथे निवर्तला (१८२७).
दौलतरावाला अपत्य नव्हते. दुसरा जनकोजी (कार. १८२७–४३) या दत्तक पुत्राच्या कारकिर्दीत दौलतरावाची पत्नी बायजाबई हिचे राज्यकारभारावर प्रभुत्व होते. ती कर्तृत्ववान व हुशार होती पण जनकोजीने तिची दखल घेतली नाही आणि महाराजांच्या (दौलतराव) मामांना दिवाणगिरी देऊन सर्व सूत्रे त्यांच्या हाती सोपविली. त्यावेळी इंग्रजांनी पन्निआर-महाराजपूर येथील लढायांत (१८४४) ग्वाल्हेरकर शिंद्यांचा पूर्ण पराभव करून अठरा लाखांचा प्रदेश खर्चासाठी बळकावला व तैनाती फौज वाढविली. परिणामतः इंग्रजांच्या रेसिडेंटची मगरमिठी शिंदे संस्थानावर पक्की झाली. त्यानंतरचे इतर वारस केवळ नामधारी होते. मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे योगदान मोठे आहे. या घराण्यातील कर्तृत्ववान पुरुषांमुळे, विशेषतः राणोजी-महादजी यांच्यामुळे पानिपतचे अपयश धुऊन निघाले आणि उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पेशव्यांनी या घराण्यास दौलतीचे आधारस्तंभ म्हणून गौरविले होते.
रामवरदायिनी मंदिर, चोरवणे ह्या देवीचे प्राचीन वतनदार मानकरी 1)श्री महादजी शिंदे 2)श्री रावजी चंजाळ (सुतार) 3)श्री नवबोधबिन काजनाक (उर्फ आर्या ) 4) गावातील मोरे, भोसले, कदम, जाधव, उत्तेकर, चव्हाण, सकपाळ असे आहेत. ह्या मंदिराचा जिंनोधार दिनांक 20 फेब्रुवारी 2018रोजी झाला.यापूर्वी हे मंदिर सन 1920 या कालखंडा पूर्वी चोरवणे गावठाण या ठिकाणी होते. दोन्ही बाजूनी नदीचे पात्र असणारे हे ठिकाण घनदाट अरण्यात होते, तत्कालीन समाज,मुघल साम्राज्य, ब्रिटिश राजवट, स्थानिक चोरट्या जमाती यानपासून स्वतःची देवीची आणि संस्कृती ची रक्षा करण्याच्या उद्देशाने पाच शतक हे मंदिर गावठाण ह्या ठिकाणी होते त्या वेळी मंदिराची इमारत साध्या पद्धतीने होती, त्या कारणाने देवींची संपत्ती रुप्या, टाके एका गुपित गुहेत सुरक्षित ठेवले जात असे, हळू हळू काल बदलत गेला आणि एक सुंदर असे मंदिर घडवण्यात यश आले.
रामवरदायिनी मंदिर, चोरवणे पाहाण्याचा योग म्हणजे निसर्ग रम्य कोकणाचा दौरा गेली तीन -चार वर्षे आयोजित करण्याचा प्लान ठरत होता पण वेळोवळी काहीतरी अडचण येत होती.पण या मागील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसाने हाहाकार माजवून आर्थिक आणि जैविक हानी मोठ्या प्रमाणात झाली.त्यात चोरावणे गावी डोंगराचे काही भाग सुटल्यामुळे संपूर्ण गावातील शैती मातीच्या ढिगार्याखाली गेली.त्याबरोबर मातीत पेरलेले सोनं पण नाहीस झाले.अशा शेतकर्यांना मदत घेऊन आम्ही गेलो तेव्हा या रामवरदायिणीचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले.
माहिती आभार :- श्री रामवरदायिनी मंदिर व्यवस्थापन कमिटी
संकलक अज्ञात