हंबीरराव याचा रानवड शिलालेख –
मुंबईपासून समुद्रमार्गे सुमारे १० किमीवर असलेल्या उरण शहराला निदान १००० वर्षांचा तरी इतिहास आहे. उरण परिसरातील चांजे (शके १०६० आणि १२६०) आणि रानवड (शके १२५९) येथे तीन शिलाहारकालीन शिलालेख असलेल्या गद्धेगळ सापडल्या. या तिन्ही शिळा सध्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय येथे आहेत. याशिवाय हंबीरराव रावाचा शिलालेख असलेली गद्धेगळ रानवड येथील मंदिरात आहे.
उरण येथील रानवड परिसरात श्री ऋध्दि सिद्धि विनायक मंदिर आहे. सध्याचे मंदिर आधुनिक शैलीतील असले तरी विनायकाची मूर्ती अंदाजे ३००-४०० वर्ष जुनी असावी असा अंदाज आहे. मंदिराच्या गर्भगृहात विनायकाच्या मूर्तीला टेकवून प्रदक्षिणामार्गावर हंबीररावाचा शिलालेख असलेली गद्धेगळ ठेवली आहे.
सदर शिळा उंचीला सुमारे ५’ आणि रुंदीला २’ आहे. चंद्रसूर्य, मंगलकलश, शिलालेख आणि सर्वात खालच्या भागात गाढव-स्त्री संकरशिल्प अशी या गद्धेगळाची रचना आहे. एकूण २३ ओळींचा शिलालेख संस्कृत-मराठी भाषेतील आहे. काही ठिकाणी फारशी शब्दांचा पण वापर केलेला आहे. लेख कोरण्यासाठी नागरी लिपीचा वापर करण्यात आलेला आहे.
वाचन
ओं स्वस्ति श्री ईजरत ७६६ सकुसावतु १२८७ विश्वावसु सवं
त्सरे अंतर्गत माघ शुध प्रतिपदापूर्वक समस्तराजावळिसमळंक्रित
स्त्रिठिशुर्कनाणुये राजसां पश्चिमसमुद्राधिपतिरायंकल्लाणविजयराज्ये
श्री स्थानक नियुक्त (?) ठाणे कोंकण हंबिरुराऊ राज्यं क्रोति महा अमात्य
सर्वभा अरिसिही प्रभु तंनिरोपित उरणे आगरे अधिकार्य ईत्यादि विव-
ळवर्तक तस्मिनकाळे प्रवर्तमाने सति क्रयप्रत्रांगमभिलिक्षते यथा उ-
रणे आगरे पडविसे ग्राम वास्ततव्य तस्मिं तटे परक्षेत्रे सिमुकंतासुत आ
जळकेळि समुद्रिं अरिसिहि प्रभु संयुक्ता क्रये दश सवृक्षमाळाकुळस्व-
सिमापर्यंत पर्वमुनिगंधाभ्यांतरग्रह छरिगण समेत्यं राहाट ६ निरंमि
वाडिक्रमें आ जळ कंति सिहिप्रभु क्रये ६ शनम्यो परिक्रया-मयतेच्या
व्रिविसेम ठाकरे सिअईनाकाइनेंयि आरि शतं द्राम आजळ कं नारो ११(?)
कृपातळी क्रोनि क्रो—या अंत्राक्ष स्वामिदेव भट वर्त्तक माईदेकंतमळ
—डि विठळे मठ पडविसे माईदेकं नयियकं रविजक तथा ज्यळउं म्हा
ळे कामकतं काउळे रामदेकंतं उपाध्ये, कान्हुराअेतुमं म्हतारा, माहादु
म्हंतारा पदि म्यतारा आईमककुमाळु म्हतारा—————-
—————- प्रात पुण्यार्था लिखितं मा
हादेवे हं मिळी ल तेहेवां ही पाडारि सिहिप्रभु भियवळी अठि पतां २
धरमकार्यात सोळा जागी घातली उपणु—उपजु —————-
ममकमं परिक्षीजां तवं वमसभुवान । याहं कर छम्मोम्मीमंम
धर मोही पाळति …… श्री. श्री…….
याच्यापुढच्या तीन ओळी अवाचनीय आहेत
सारांश
हिजरी ७६६ आणि शके १२८७ विश्वावसु संवत्सर माघ शुद्ध प्रतिपदा तिथीला पश्चिमसमुद्राधिपती आणि श्रीस्थानकावर नियुक्त असलेल्या हंबीररावाच्या कार्यकाळात झालेल्या खरेदीखताची नोंद शिलालेखात केली आहे. उरण जवळील पडीवसे येथील समुद्रकिनाऱ्याच्याजवळ असलेली जागा विकल्याची नोंद शिलालेखात केलेली आहे. हंबीररावाचा महाअमात्य म्हणून अरिसिंही प्रभु कार्यरत आहे. लेखाच्या शेवटी साक्षीदारांचा उल्लेख केलेला आहे. या साक्षीदारांची आडनावे वर्तक, उपाध्ये आणि म्हातरा/म्हतारा(?) अशी आहेत. म्हात्रे आडनावाचे मूळ म्हातरा/म्हतारा आडनावात असावे. म्हात्रे आडनावाची अनेक कुटुंबे रानवड, उरण आणि कोकण परिसरात स्थायिक आहेत.
हंबीररावाचा रानवड हा पहिला शिलालेख आहे. सदर शिलालेख भिमेश्वर मंदिर, नागाव येथील शिलालेखाच्या दोन वर्ष आधी कोरलेला आहे. रानवड शिलालेखात हंबीररावाने “पश्चिमसमुद्राधिपती” आणि “श्रीस्थानकनियुक्त” ही बिरुदे धारण केलेली आहेत. पण, नागाव भिमेश्वर मंदिरात असलेल्या शिलालेखात हंबीररावाने “श्रीमत्यप्रौढिप्रतापचक्रवर्ती” आणि “महाराजाधिराज” ही दोन बिरुदे धारण केली आहेत. याचाच अर्थ रानवड आणि भिमेश्वर शिलालेखांमध्ये असलेल्या दोन वर्षांच्या कालावधीत यादवांच्या बिरुदावल्या धारण करण्याएवढा मोठा पराक्रम हंबीररावाने केला होता हे निश्चित. पण भिमेश्वर शिलालेखात “पश्चिमसमुद्राधिपती” आणि “श्रीस्थानकनियुक्त” ही दोन बिरुदे का धारण केलेली नाहीत हे कळून येत नाही. हंबीरराव उत्तरकोकण प्रांतावर राज्य करत होता हे “श्रीस्थानकनियुक्त” आणि “ठाणे कोकण राज्य क्रोती” याच्यावरून कळायला मदत होते. रानवड लेखात महाअमात्य असलेला अरिसिंही प्रभु दोन वर्षात राजाचा प्रधान झालेला होता. भिमेश्वर लेखात अरिसिंही प्रभु हे पूर्ण नाव न देता सिहीप्रो असे त्याच्या नावाचे संक्षिप्त रूप वापरले आहे असे असे मो. ग. दीक्षित यांचे मत आहे.
संदर्भ –
Dikshit, Moreshwar G. The Ranvad (Uran) Inscription of the time of Hambira-rao, Saka 1287. Journals of the University of Bombay. Vol-8, Pt-IV. Pp18-21.
Creative Commons License
© Pankaj Vijay Samel and ||महाराष्ट्र देशा||