महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,607

रांगणा किल्ला | Rangana Fort

By Discover Maharashtra Views: 5806 16 Min Read

रांगणा किल्ला | Rangana Fort

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मी म्हणजेच कोल्हापुरची अंबाबाई. खवय्यांसाठी झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा तसेच कुस्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यात लहानमोठे १३ किल्ले आहेत. या १३ किल्ल्यात निसर्गसौंदर्याने नटलेला सर्वात सुंदर तरीही रांगडा असेच रांगणा किल्ल्याचे वर्णन करता येईल. महाराजांनी दिलेले प्रसिद्धगड हे नाव या किल्ल्याला फारसे रुळले नाही व प्रसिध्दीपासुन हा किल्ला दुरच राहिला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे किल्ल्याभोवती असलेले घनदाट जंगल व त्यातुन किल्यावर जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट. सहयाद्रीच्या येन माथ्यावर असलेला रांगणा किल्ला (Rangana Fort) किल्ला एका लहानशा खिंडीने पठारापासून वेगळा झाला असुन कोकणात उतरणाऱ्या हणमंत्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याची उभारणी केली गेली. रांगणा किल्ल्यावर जाण्यासाठी आसपासच्या परिसरातुन चार-पाच वाटा असल्या तरी चिक्केवाडी व नारुर या दोन गावातुन जाणाऱ्या वाटा प्रामुख्याने वापरात आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारूर गाव कुडाळ शहरापासुन ४० कि.मी.अंतरावर असुन या गावातुन गेल्यास दोन-अडीच तासाचा चढ चढुन आपण किल्ल्याच्या बुरुजाखाली येतो तर चिक्केवाडी मार्गे जाण्यासाठी कोल्हापुर-गारगोटी-पाटगाव-तांब्याचीवाडी-भटवाडी -चिक्केवाडी असा १०५ कि.मी.चा मार्ग आहे. एसटी बस महामंडळाची तांब्याच्या वाडीपर्यंत येते व तेथुन धरणाच्या भिंतीकडून ८ कि.मी.अंतरावर असलेल्या चिक्केवाडीला जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. खाजगी वाहन असल्यास चिक्केवाडीपर्यंत तर जीपसारख्या वहानाने पावसाळा वगळता गडासमोरील पठारापर्यंत जाता येते. खाजगी वाहन नसल्यास तांब्याची वाडी येथुन जंगलातील दोन तासाची पायपीट करुन आपण किल्ल्यासमोरील पठारावर पोहोचतो. नारूर गावातुन आल्यास आपण रांगणा किल्ल्याच्या(Rangana Fort) उत्तर टोकावर असलेल्या बुरुजाखालील खिंडीत पोहोचतो तर चिक्केवाडीतून आल्यास या खिंडीच्या वरील बाजुस असलेल्या पठारावर पोहोचतो. पठारावर गाडीमार्ग जेथे संपतो तेथे झाडीत एक दगडी उंबरठा व चौकीच्या भिंतीचे काही अवशेष आहेत. या ठिकाणी गडाचे या वाटेवरील मेट अथवा पहाऱ्याची चौकी असावी. सह्याद्रीतील बहुतांशी गडावर जाण्यासाठी डोंगर चढावा लागतो पण चिक्केवाडीमार्गे गेल्यास तो थोडासा उतरावा लागतो.

किल्ल्यावर जाण्यासाठी पठारावरून दरीत उतरून बुरुजाच्या डावीकडे किल्ल्यावर जाणारी वाट आहे. पठारावरून खाली उतरताना वाटेत उजव्या बाजुला कातळात कोरलेली एक दगडी ढोणी पहायला मिळते. पठाराच्या तळात पण दरीच्या थोडे वर डावीकडे झाडीत बांदेश्वर नावाचे एक उध्वस्त मंदिर असून मंदिराच्या आवारात एक बांधीव तुळशी वृंदावन अथवा समाधी आहे. मंदिरात अलीकडील काळात घडवलेल्या गणपती,विष्णु व देवीची मुर्ती आहे. दरीत उतरल्यावर एका उध्वस्त चौकीचे अवशेष पहायला मिळतात. येथुन समोर दिसणारा दुहेरी तटबंदीतील भव्य पण उध्वस्त बुरुज आपल्याला औरंगाबादच्या अंतुर किल्ल्याच्या बुरुजाची आठवण करून देतो. पुरातत्व खात्याला पुरेसा निधी मिळाल्यास अंतुरच्या बुरुजाप्रमाने ते या बुरुजाला देखील त्याच्या मुळ स्वरूपात आणू शकतील. या बुरुजाच्या डावीकडुन दरीच्या काठाने किल्ल्यावर जाणारी वाट आहे. वनखात्याने सध्या येथे लोखंडाचे संरक्षक कठडे लावलेले आहेत. या वाटेने पुढे गेल्यावर दहा-बारा पायऱ्या चढुन आपण किल्ल्याच्या पहिल्या उत्तराभिमुख गणेश दरवाजात पोहोचतो. उजवीकडे तटबंदी तर डावीकडे एक बुरुज असलेल्या या दरवाजाची केवळ चौकट शिल्लक असुन आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत.

येथुन दुसऱ्या दरवाजाकडे जाणारा मार्ग दोन्ही बाजुनी पूर्णपणे बंदिस्त असून गडाचा दुसरा गोमुखी बांधणीचा दरवाजा दोन बुरुजात बंदिस्त केलेला आहे. हा दरवाजा हनुमंत दरवाजा म्हणुन ओळखला जातो. उत्तराभिमुख असलेल्या या दरवाजाचा उजवीकडील तटातील बुरुज चौकोनी आकाराचा तर डावीकडील बुरुज गोलाकार आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आपला गडात प्रवेश होतो. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन त्याच्या वरील बाजुस असलेले बांधकाम पूर्णपणे ढासळलेले आहे. दरवाजाच्या उजव्या बाजुच्या देवडीला लागुन असलेल्या इमारतीच्या भिंती व त्यातील दरवाजाची कमान आजही शिल्लक आहे. या भागात मोठया प्रमाणात वास्तु अवशेष असून त्यांचे केवळ चौथरे नव्हे तर भिंती व दरवाजे देखील शिल्लक आहेत. येथुन आपण आलो त्या दरीच्या टोकावर असलेल्या बुरुजाकडे जाताना उजव्या बाजुस पाण्याचे एक कोरडे पडलेले टाके दिसते. या बुरुजावर जाण्यासाठी दोन्ही बाजुस पायऱ्या बांधलेल्या असून बुरुजाच्या डावीकडील भागात बुरुजाबाहेर असलेल्या तटबंदीत उतरण्यासाठी लहान दरवाजा बांधलेला आहे. या दरवाजावर मारुतीचे शिल्प असुन दरवाजातील पायऱ्यांनी खाली उतरता येते पण बाहेरील तोंडाकडील भागावर बुरुजाची दगडमाती कोसळल्याने ते बंद झाले आहे.

बुरुजावर भगवा झेंडा डौलाने फडकताना दिसतो. या बुरुजावर गडाची समुद्र सपाटीपासुन उंची १९८० फुट आहे. बुरुजाचा हा भाग पाहुन मागे फिरावे व दरवाजाकडे येऊन आपल्या गडफेरीस सुरवात करावी. दरवाजा कडून थोडे पुढे आल्यावर उजव्या बाजुस एका वाड्याची भिंत व त्यातील दरवाजा पहायला मिळतो. हा वाडा किल्लेदार निंबाळकर यांचा वाडा म्हणुन ओळखला जातो. दरवाजाच्या आतील बाजुस भिंतीला लागून पर्शियन भाषेतील झीज झालेला शिलालेख ठेवला आहे. वाडयाच्या आतील बाजुस चौकोनी आकाराची पायऱ्यांची विहीर आहेत. विहीरीतील पाणी पिण्यायोग्य असुन ते वर्षभर उपलब्ध असते. येथुन पुढे आल्यावर गडाची आडवी तटबंदी व त्यात एकामागे एक बांधलेले दोन दरवाजे पाहायला मिळतात. गडाचा उत्तरेकडील बुरुजाचा भाग आडवी तटबंदी बांधुन मुख्य गडापासून काहीसा वेगळा केलेला आहे. वनखात्याने या तटबंदी व बुरुजाचे संवर्धन केलेले आहे. तटावर जाण्यासाठी पायऱ्या असून दोन दरवाजामधील भागात पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजाने गडाच्या आतील भागात आल्यावर एक बांधीव वाट डावीकडे गणेश मंदिर व राजवाड्याकडे जाते तर सरळ जाणारी वाट रांगणाई देवीच्या मंदिराकडे जाते.

वनखात्याने येथे किल्ल्यावरील ठिकाणाकडे जाण्याचा मार्गदर्शक फलक लावलेला आहे. या फलकाच्या आसपास झुडपात लपलेल्या ४-५ समाधी तसेच उजवीकडे दरीच्या काठावर असलेली किल्ल्याची तटबंदी पहायला मिळते. आपल्याला तटबंदीच्या काठाने संपुर्ण रांगणा किल्ला (Rangana Fort) फिरायचा असल्याने सरळ वाटेने पुढे निघावे. पुढे वाटेच्या डावीकडे एक मोठा खोदीव तलाव असुन तलावापुढे उजवीकडे वनखात्याने अलीकडेच संवर्धन केलेले शिवमंदिर आहे. मंदिरात शिवलिंग व नंदी असून कोनाडयात गणेशमुर्ती आहे. मंदिराच्या आवारात दुसरा नंदी असून जुन्या मंदिराचे कोरीव खांब रचुन ठेवलेले आहेत. येथुन समोरील उंचवट्यावरून रांगणाई देवीच्या मंदिराकडे जाताना घडीव दगडात बांधलेले दोन समाधी चौथरे पहायला मिळतात. यातील एक चौथऱ्यावर मोठे शिवलिंग आहे. महादेव मंदिराकडून ५ मिनिटात आपण रांगणाई मंदिराच्या आवारात येतो. मंदिराच्या आवारात कोरडी पडलेली चौकोनी आकाराची पायऱ्याची बांधीव विहीर आहे. मंदिरासमोर एका चौथऱ्यावर उभारलेली साधारण १५ फुट उंचीची सुंदर दगडी दिपमाळ आहे.

दीपमाळेजवळ तुळशी वृंदावन व काही भग्न मुर्ती अवशेष आहेत. रांगणाई देवीच्या मंदिराभोवती प्राकाराची भिंत असुन वनखात्याने हे मंदिर नव्याने बांधलेले आहे. मंदिराचा मुळ गाभारा कायम असुन त्यावर चुन्यामध्ये फुलापानांची तसेच प्राण्यांची नक्षी कोरलेली आहे. गाभाऱ्यात रांगणाई देवीची शस्त्रसज्ज चतुर्भुज मुर्ती असून डावीकडे भैरवाची तर उजवीकडे विष्णूची मुर्ती आहे. मंदिराच्या डावीकडे वनखात्याने पर्यटकांच्या मुक्कामासाठी बांधलेली ओसरी असुन उजव्या बाजुस हनुमानाचे मंदिर आहे. या मंदीरात चौकोनी आकाराचा एक मराठी तर दोन पर्शियन भाषेतील गोलाकार दगडात कोरलेले शिलालेख आहेत. मंदीर परीसर पाहुन झाल्यावर मंदिरामागील दरीच्या काठावर यावे. या ठिकाणी आजही सुस्थितीत असलेली गडाची तटबंदी पाहायला मिळते. या तटबंदीच्या कडेने आपण आलो त्या दिशेला म्हणजे किल्ल्याच्या उत्तर बाजुला जावे. या वाटेने साधारण १० मिनीटे चालल्यावर आपण एका लहानशा घळीत उतरतो. या घळीच्या काठावर किल्ल्याचा कोकण दरवाजा बांधलेला असुन या दरवाजातून उतरणारी वाट नारूर गावात जाते.

घळीत आलेले पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी या घळीच्या तोंडाशी असलेल्या तटबंदीत एक माणुस जाऊ शकेल इतकी मोठी कमान बांधलेली आहे. या दरवाजाकडील बांधकामात काही मंदिराची शिल्प दिसुन येतात. दरवाजाच्या रक्षणासाठी वरील बाजुस बुरुज बांधलेला आहे. कोकण दरवाजा पाहुन झाल्यावर आल्या वाटेने मागे फिरावे व तटबंदीच्या काठाने तटबंदी व त्यातील बुरुज पहात आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. या वाटेने आपण अर्ध्या तासात गडाच्या दुसऱ्या कोकण दरवाजात पोहोचतो. या दरवाजातुन खाली उतरणारी वाट केरवडे गावात जाते. हि वाट आजही काही प्रमाणात वापरात आहे. गडाच्या पश्चिम तटबंदीत असलेला हा उत्तराभिमुख गोमुखी दरवाजा एका बुरुजाच्या आडोशाला तटबंदीच्या आतील भागात बांधलेला आहे. हा दरवाजा पाहुन पुढे निघाल्यावर १० मिनिटात आपण गडाच्या हत्तीसोंड नावाने ओळखल्या जाणाऱ्या माचीच्या भागात येतो. दोन्ही बाजुनी तटबंदीने बंदिस्त केलेली हि माची आपल्याला लोहगडच्या विंचूकाटा माचीची आठवण करून देते. माचीच्या सुरवातीस उध्वस्त वास्तूची दगडात घडवलेली सुंदर कमान पहायला मिळते. याशिवाय माचीवर कातळात कोरलेली अजुन एक कमान आहे. माचीच्या टोकाला दोन चिलखती म्हणजेच दुहेरी तटबंदी असलेले बुरुज आहेत, या दोन्ही बुरुजाच्या बाहेरील तटबंदीत उतरण्यासाठी दोन लहान कमानीदार दरवाजे बांधलेले आहेत.

रांगणा किल्ला (Rangana Fort) गडाचा उजवीकडील बुरुज आजही चागल्या अवस्थेत असुन डावीकडील बुरुजाबाहेर असलेली तटबंदी काही प्रमाणात कोसळलेली आहे. त्यामुळे या बुरुजातील दरवाजाने खाली उतरताना योग्य ती काळजी घ्यावी. हे दोन्ही बुरुज पाहुन आता गडाच्या उजवीकडील तटबंदीच्या काठाने पुढील गडफेरीस सुरवात करावी. या वाटेने साधारण २० मिनीटे चालल्यावर आपण गडाच्या पुर्व तटबंदीत असलेल्या यशवंत दरवाजाजवळ येतो. या दरवाजात उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या असुन दरवाजाच्या वरील बाजुस जाण्यासाठी तटामध्ये लहान दरवाजा आहे. हा लहान दरवाजा मुख्य दरवाजाच्या आतील बाजुस असलेल्या उध्वस्त देवडीत आहे. उत्तराभिमुख असलेला हा दरवाजा दोन बुरुजात बांधलेला असून या दरवाजाच्या बाहेरील बाजुस तटबंदीत अर्धगोल कमानीत गोलाकार तोंडाचे बांधीव बळद व एक कोनाडा आहे. याचे तटाबाहेर असण्याचे नेमके प्रयोजन लक्षात येत नाही. या दरवाजातुन खाली उतरणारी वाट नेरूर गावात जाते पण वापर नसल्याने हि वाट पुर्णपणे मोडली असुन धोकादायक आहे. दरवाजा पाहुन तटबंदीच्या काठाने पुढे जाताना वाटेत डावीकडे साचपाण्याचे लहान तळे दिसते. तळे पाहुन पुढे गेल्यावर एक मोठा बांधीव तलाव पहायला मिळतो.

सध्या या तलावात मोठया प्रमाणात गाळ साचलेला असल्याने तो कोरडा पडलेला आहे. या तलावाच्या काठावरील भिंतीत एक लहानशी देवळी आहे. या देवळीत अखंड दगडात कोरलेली नक्षीदार शिवपिंड असुन या पिंडीवर दोन शिवलिंग आहे. देवळीसमोर भग्न नंदी आहे. तलावाच्या डावीकडील वाटेने पुढे आल्यावर आपण एका मंदिराजवळ पोहोचतो. या मंदिराच्या आवारात एका चौथऱ्यावर घडीव दगडात बांधलेली चौकोनी आकाराची समाधी असुन या समाधीच्या चारही बाजुस गजमुख कोरलेले आहे. समाधीच्या वरील बाजुस नक्षीकाम केलेला गोलाकार दगड आहे. मंदीरासमोर एक नंदी असुन आत तीन शिवलिंग आहेत. या शिवमंदिराचा श्री.भगवान चिले यांच्या निसर्गवेध परीवार संस्थेने जीर्णोद्धार केलेला असुन हि संस्था या किल्ल्यावर २००८ पासुन कार्यरत आहे.

रांगणा किल्ल्यावर होत असलेल्या संवर्धनाच्या कामात निसर्गवेध परीवार संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अलीकडेच किल्ल्याखालील दरीत कोसळलेल्या दोन तोफांचा शोध घेतलेला असून त्या लवकरच गडावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मंदीराच्या मागील बाजुस दगडी चिऱ्यात बांधलेला गोलाकार चौथरा असुन याच्या मध्यभागी गोलाकार खळगा आहे. हे बांधकाम कशाचे असावे याचा बोध झाला नाही. येथुन डावीकडील वाटेने पुढे जाताना साचपाण्याचा मोठा तलाव पार करून आपण आपण उध्वस्त राजसदरेपाशी अथवा राजवाड्यापाशी पोहोचतो. या चौसोपी वास्तुत प्रवेश करण्याची कमान आजही कशीबशी तग धरून उभी आहे. वनखात्याने या वास्तुचे काही प्रमाणात संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे.

राजवाडा पाहुन पुन्हा याआधी पाहिलेल्या शिवमंदिराकडे यावे. मंदिराकडून उजवीकडे वळल्यावर एक बांधीव पायवाट दरीच्या दिशेने जाताना दिसते. या वाटेने गेल्यावर एक लहान घुमटीवजा गणेशमंदिर पहायला मिळते. मंदीरात दगडात कोरलेली गणेशमुर्ती आहे. मंदिर पाहुन या बांधीव पायवाटेने मागे फिरल्यावर आपण रांगणा किल्ला (Rangana Fort) किल्ल्याच्या आतील तटबंदीत असलेल्या दुहेरी दरवाजाजवळ पोहोचतो. या ठिकाणी आपली दुर्गफेरी पुर्ण होते. किल्ल्याची दक्षिणोत्तर लांबी २.५ कि.मी. तर पुर्वपश्चिम रुंदी १.२५ कि.मी असल्याने संपुर्ण किल्ला फिरण्यास सहा तास लागतात. किल्ल्यावरून सोनगड, मनोहर-मनसंतोषगड, भैरवगड किल्ले व कोकणातील दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. किल्ल्याच्या आसपास व मध्यभागी बऱ्यापैकी जंगल असुन या जंगलात गवा, रानडुक्कर, अस्वल या सारख्या रानटी प्राण्यांचा वावर असल्याने दुर्गभ्रमंती सावधपणे करावी. कोल्हापूरकडून खाजगी वहानाने रांगणा किल्ल्यावर आल्यास पाटगाव येथील शिवकाळातील मौनी महाराजांचा मठ व भद्रकाली मंदीर तसेच तांब्याची वाडी येथील सिध्दाच्या गुहा पहाता येतील.

महाराष्ट्रात चालुक्यांचा अंमल असताना त्यांचे सामंत म्हणुन उत्तरेकडील प्रांत देवगिरीचे यादव तर दक्षिणेकडील प्रांत व कोकण शिलाहार सांभाळत होते. कालांतराने या दोन्ही राजांनी स्वतंत्र राज्याची स्थापना केली. शिलाहार राजा भोज( दुसरा ) याने स्वतःला सम्राट घोषित करुन महामंडलेश्वर अशी पदवी धारण केली. त्याने पन्हाळा येथे राजधानी स्थापन करून (११७५ ते १२१२) राज्याच्या सुरक्षेसाठी १५ किल्ले बांधले त्यात इ.स.११८७ साली रांगणा किल्ला (Rangana Fort) बांधला. देवगिरीचा राजा सिंघण याने इ.स.१२०९ साली कोल्हापुरवर आक्रमण केले. सिंघणचा मुलगा जैत्रपाल याने यादव साम्राज्याच्या सीमा समुद्राला भिडवल्या त्यावेळी पन्हाळा प्रांत व त्यातील किल्ले यादव साम्राज्याचा भाग बनले. इ.स.१३०७ मध्ये मलिक काफुर याने यादवांचा पराभव केला. यादव साम्राज्याच्या अस्तानंतर १५ व्या शतकात हा किल्ला संगमेश्वराचा राजा जखुराय याच्या ताब्यात होता. १९ जुलै १४७० मध्ये बहमनी वजीर महंमद गवान याने हा किल्ला जिंकला. यावेळी महंमद गवान म्हणतो अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला पण मर्दमुकीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली.

बहमनी साम्राज्याच्या अस्तानंतर हा रांगणा किल्ला (Rangana Fort) अदिलशाहीत आला. शिवकाळात अदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंतांकडे हा गड होता. ५ मे १६५८ मधील पोर्तुगीजांच्या एका पत्रानुसार विजापूरचा सरदार रुस्तमजमान याने लखम सावंताकडून या गडाचा ताबा घेतला. अफजलखानाच्या वधानंतर पन्हाळा घेतल्यावर इ..स. १६५९च्या दरम्यान या प्रांतातील इतर किल्ल्यांबरोबर रांगणा देखील स्वराज्यात आला पण लगेच आदिलशहाच्या ताब्यात गेला. शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी ५ सप्टेंबर १६६६ रोजी रुस्तमजमानकडून किल्ल्याचा ताबा घेतला. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी रांगण्याला वेढा घातला असता शिवरायांनी स्वतः हा वेढा मोडून काढल्याचे उल्लेख जेधेशकावलीत येतो. १६७०-७१ मध्ये शिवरायांनी या गडाच्या दुरुस्तीसाठी ६००० होन खर्च केल्याचा उल्लेख येतो. १७८१ सालच्या एका पत्रात रांगण्याचे महत्व सांगताना महाराज म्हणतात एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल.

औरंगजेब स्वराज्यावर चालुन आला असता रांगणा किल्ला (Rangana Fort) मुघलांना जिंकता आला नाही. वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. मार्च १७०८ मध्ये शाहु महाराजांनी गडास वेढा दिला त्यावेळी रामचंद्रपंत अमात्य व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढविला. पावसाळा सुरु झाल्याने शाहू महाराजांनी माघार घेतली. सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला पण करवीरचे सेनासाहेब सुभा यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड पुन्हा ताब्यात घेतला. या युध्दात सावंतवाडीकरांचे पंचवीस सैनिक ठार झाले व ज्यांनी फितुरी केली त्यांची मुंडकी उडवली गेली. या नंतर १७८१ मधे खेम सावंतानी तब्बल आठ महिने रांगण्यास वेढा घातला पण नंतर करवीर गादीशी एकनिष्ठ रहाण्याचे कबुल करून वेढा उठवला. इ.स.१८४४ मधील कोल्हापूरच्या बंडात येथील गडकऱ्यानी भाग घेतल्याने ९ डिसेंबर १८४४ रोजी इंग्रजांनी गडावर तोफा डागल्या. या तोफांच्या माऱ्यात गडावरील इमारती व तटबंदीचे मोठे नुकसान झाले. इ.स.१९४८ पर्यंत रांगणा किल्ला करवीर संस्थानाच्या ताब्यात होता व त्यानंतर संस्थानाबरोबर स्वतंत्र भारतात विलीन झाला.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

1 Comment