रंजाने गढी, धुळे –
खानदेश प्रांत साडे बारा रावलांचे वतन म्हणुन देखील ओळखला जातो. रावळ हि येथील कुळांना मिळालेली पदवी असुन या रावळात सिसोदिया, सोळंकी, परमार, प्रतिहार अशी वेगवेगळी कुळे आहेत. हि साडेबारा वतन म्हणजे १.दोंडाईचा २.मालपुर ३.सिंदखेडा ४.आष्टे ५.सारंगखेडा ६.रंजाणे ७.लांबोळा 8.लामकानी ९.चौगाव १०. हटमोईदा ११.रनाळे १२.मांजरे १३.करवंद हे अर्धे वतन खानदेशात व अर्धे खानदेश बाहेर असल्याने अर्धे वतन म्हणुन ओळखले जाई. यात सामील नसलेले आणखी एक वतन म्हणजे तोरखेडा.(रंजाने गढी)
एकेकाळी सोळंकी वंशातील रावलांचे वतन असलेला हा परीसर मराठयांच्या ताब्यात आल्यावर तोरखेड, रनाळे हा प्रांत सरदार कदमबांडे यांच्या जहागिरीचा भाग बनले. यातील आष्टे, लांबोळा, चौगाव, हटमोईदा या ४ गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या आहेत तर उरलेल्या ५ गढी त्यांचे अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आहेत. यातील ४ गढी मात्र आजही त्यांच्या मूळ रुपात शिल्लक आहेत. संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत तर काही पार जमीनदोस्त झाले आहेत पण रंजाने गढी मात्र याला अपवाद आहे. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या गढीची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व गढीचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
रंजाने गढी आजही तिच्या मूळ स्वरुपात असुन तिची योग्यप्रकारे निगा राखलेली आहे. सद्यस्थितीत रावळ यांच्या मालकीची असलेली हि गढी त्यांच्या परवानगीने पहाता येतो. रंजाणे गढी धुळे जिल्ह्यात सिंदखेडा तालुक्यात सिंदखेडा पासुन १४ कि.मी.अंतरावर तर दोंडाईचा पासुन १८ कि.मी. अंतरावर आहे. रंजाणे गढीला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सिंदखेडा किंवा दोंडाईचा गाठावे लागते. रंजाणे हे गाव लहानच असल्याने व गावात असलेली हि गढी स्थानिकांना परिचित असल्याने गढीजवळ सहजपणे पोहोचता येते. रंजाणे गावाच्या एका टोकाला तापी नदीच्या पश्चिम तिरावर गर्द झाडीत असलेली हि गढी म्हणजे एक अर्धवट बांधलेला किल्ला असुन गढीच्या आत सोळंकी रावळ यांचा तीन मजली जुना भव्य वाडा आहे.
गढीच्या तटबंदीबाहेर आपल्याला बांधकामाचा चुना मळण्याचा घाणा व त्याचे चाक दिसुन येते. चौकोनी आकाराचा हा गढीवजा किल्ला साधारण एक एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत एकुण सात बुरुज आहेत. गढीची तटबंदी सुस्थितीत असुन तटबंदी व बुरुजांची उंची जमीनीच्या बाजुने साधारण २०-२५ फुट आहे. तटबंदीचा फांजीपर्यंतचा भाग अघडीव दगडांनी बांधलेला असुन वरील भाग मात्र विटांनी बांधलेला आहे. इतर कोणत्याही रावळच्या गढीत न आढळणारी रणमंडळ प्रवेश रचना या गढीच्या प्रवेशमार्गात दिसुन येते. गढीच्या मुख्य प्रवेशद्वाराची रचना गोमुखी असुन पश्चिमाभिमुख असलेले हे वळणदार प्रवेशद्वार बुरुजावरून माऱ्याच्या टप्प्यात ठेवत दोन बुरुजामध्ये बांधलेले आहे. मुख्य दरवाजात लहान दिंडी दरवाजा असुन हा मुख्य दरवाजा त्याची लाकडी चौकट व दगडी कमानीसकट आजही शिल्लक आहे. या दगडी कमानीवर मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. दरवाजाच्या वरील भागात असलेले बांधकाम पुर्णपणे कोसळलेले असुन केवळ लाकडी वासे शिल्लक आहेत.
गढीत प्रवेश केल्यावर समोरच रावळ यांचा सुस्थितीतील तीन मजली जुना भव्य वाडा असुन रावळ यांचे वंशज आजही तेथे वास्तव्य करून आहेत. वाडयाच्या चहुबाजूला असलेले लाकडी खांब, तुळया व वासे यांच्यावर मोठया प्रमाणात कलाकुसर केलेली असुन जोत्यावर वेगवेगळ्या खोल्या आहेत. वाडयाच्या छताला टांगलेली काचेची वेगवेगळी झुंबरे व हंडया पहायला मिळतात. वाड्याचा इतर भाग खाजगी वापरात असल्याने या भागात फिरताना थोड्या मर्यादा येतात. वाड्यात आपल्याला सोळंकी वंशातील रावळ यांची जुन्या काळातील छायाचित्रे, कागदपत्रे व इतर काही वस्तु पहायला मिळतात. किल्ल्याच्या आवारात एक विहीर असुन या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे. किल्ल्याच्या आवारात इतर काही वास्तुंचे चौथरे व अवशेष तसेच एक दुमजली वास्तुची विटांची भिंत पहायला मिळते. येथे आपले किल्लादर्शन पूर्ण होते. संपुर्ण किल्ला व परीसर पहाण्यास एक तास पुरेसा होतो.
किल्ल्यातील बुरुजावरून तापी नदीचे दूरवर पसरलेले पात्र व खुप लांबवरचा प्रदेश दिसुन येती. १३ व्या शतकात सोळंकी सरदार सुजानसिंह रावल यांनी सोनगिरी किल्ल्यावर हल्ला करून तो ताब्यात घेतला. त्यांचे वंशज केसरीसिंह यांचा मुलगा मोहनसिंह याने तोरखेड़ा गढ़ी बांधली व जवळपास २२५ गावावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले त्यात रंजाणे गावाचा समावेश होता. बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत इ.स. १७२० साली अमृतराव व कांताजी यांनी गुजरात भागात चढाई करून पराक्रम गाजवला. त्यावेळी या सोळंकी रावळाचे वतन असलेला रनाळा, कोपर्ली, तोरखेड हा परीसर त्यांना जहागिरी म्हणून मिळाला. रंजाणे येथे असलेले रावळ हे तोरखेडा येथील सोळंकी वंशातील रावळाचे वंशज आहेत. वेळोवेळी सत्ताबदल झाले तरी रावलांचे अधिकारात त्या त्या काळातील सत्ताधीशांनी कोणतेच बदल केले नाही.
माहिती साभार – सुरेश निंबाळकर