महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,897

रांजणगिरी किल्ला | Ranjangiri Fort

Views: 3963
3 Min Read

रांजणगिरी किल्ला | Ranjangiri Fort

नाशिक जिल्ह्यात सेलबारी- डोलबारी, अजंठा- सातमाळ, त्र्यंबक या डोंगररांगा आहेत. यातील नाशिकच्या पुर्वेस व इगतपूरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबक डोंगररांगेत भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला असे अनेक किल्ले दिसुन येतात. रांजणगिरी किल्ला (Ranjangiri Fort) हा या त्र्यंबक रांगेतील एक टेहळणीचा किल्ला. प्राचिन काळापासून नाशिक हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. डहाणु बंदरातून नाशिककडे येणाऱ्या डहाणु- जव्हार- गोंडाघाट -अंबोली घाट- त्रिंबक- नाशिक या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घाटावर बांधलेल्या दुर्गशृंखलेत रांजणगिरी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. मुळेगाव हे गडाच्या पायथ्याचे गाव असुन मुंबई-नाशीक महामार्गावरून जातेगावमार्गे तेथे जाता येते.

मुंबई-नाशीक महामार्गावरून मुळेगाव हे अंतर साधारण ११ कि.मी.आहे. अंजनेरी गडाच्या मागील बाजूस असलेल्या रांजणगिरी किल्ल्याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही. स्थानीक लोक या किल्ल्याला बुधलीचा डोंगर म्हणुन ओळखतात. जातेगाववरून मुळेगावकडे जाताना उजव्या हाताला आपल्याला एक लांबलचक निमुळता माथा असलेला डोंगर नजरेस पडतो तोच हा रांजणगिरी किल्ला (Ranjangiri Fort). रस्त्याच्या डाव्या बाजुस घरगड व डांग्या सुळका नजरेस पडतो. किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला मुळेगावपर्यंत जाण्याची गरज नाही. आपण जात असलेल्या रस्त्याला दाहेगाव येथुन येणारा रस्ता मिळतो. या तिठ्यावरून रांजणगीरी किल्ल्याच्या खाली असलेले पठार दिसते. हे पठार डोळ्यासमोर ठेऊनच डोंगर चढायला सुरवात करायची. किल्ल्यावर जाणारी वाट फारशी मळलेली नसल्याने वाट शोधत शोधतच गड गाठावा लागतो. काही ठिकाणी गडासमोर असणारा डोंगर रांजणासारखा असल्याने या किल्ल्याला रांजणगिरी नाव पडले असे वाचनात आले होते पण मला मात्र तो आकार रांजणासारखा जाणवला नाही. किल्ल्याच्या समोर एक लहानशी गोलाकार टेकडी असुन या टेकडीला वळसा घालुन हि टेकडी व किल्ला यांच्यामधील खिंडीत जावे लागते. या खिंडीतून वर चढताना येथे मोठया प्रमाणात घसारा असल्याने सांभाळूनच वर चढावे लागते कारण वर चढणाऱ्याच्या पायाखालुन घसरणारे दगड त्याच्यानंतर असणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर येतात. हे छोटेसे प्रस्तरारोहण करुन आपण खिंडीत पोहोचतो.

खिंडीतून समोर दिसणाऱ्या चार-पाच पायऱ्या चढल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. येथे खडकात असलेल्या खाचा पहाता पुर्वी काही प्रमाणात बांधकाम असण्याची शक्यता आहे आता मात्र केवळ खुणाच दिसतात. पायथ्यापासुन गडावर पोहोचण्यास दिड तास लागतो. समुद्रसपाटीपासुन २९२७ फुट उंचीवर असलेल्या या गडाचा माथा निमुळता असुन पूर्व-पश्चिम लांबवर पसरला आहे. गडाचे क्षेत्रफळ साधारण चार एकर असुन गडाच्या माथ्यावर चढताना लागणाऱ्या ४-५ पायऱ्या, साचपाण्याचा एक तलाव व खडकात खोदलेली दोन टाकी याशिवाय किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत. गडावरून गडगडा,अंजनेरी,बहुला हे किल्ले तसेच खुप लांबवरचा प्रदेश नजरेस पडतो. संपुर्ण गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गडावर एकही झाड नसल्याने विश्रांतीची काहीही सोय नाही त्यामुळे हा रांजणगिरी किल्ला (Ranjangiri Fort)  शक्यतो सकाळच्या वेळेतच करावा. टेहळणीचा किल्ला अशी ओळख असणारा रांजणगिरी किल्ला इतिहासाबद्दल पुर्णपणे अबोल आहे.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment