रांजणखळगे, निघोज. ता. पारनेर –
रांजणखळगे, हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजणखळग्यांची निर्मिती होते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजणखळगे तयार होतात.(रांजणखळगे निघोज)
नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गावातून नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे. नदीने वाहून आणलेले दगड-गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड-खोटे या भागात गोलगोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला थोडी-थोडकी नव्हे तर हजारो वर्षे जावी लागतात. कालांतराने या खड्ड्यांचे रांजणाकार खळग्यांत रूपांतर होते.
निघोजचे प्रसिध्द रांजणखळगे –
आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. पाण्याची पातळी कमी होत नाही. अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक या ठिकाणी पहावयास मिळतो. वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौदर्य पहावयास मिळते.
आकर्षक पर्यटन स्थळ म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त आहे.
रांजणखळग्यांमुळे लहान लहान कुंड तयार झालेले दिसते.त्यामुळे निघोजची मळगंगा ही कुंडमाउली मळगंगा म्हणूनही प्रसिध्द आहे. मळगंगेच्या दर्शना सोबत एकदिवसीय फॅमिली पिकनिक पण छान होते.
संतोष मु.चंदने, चिंचवड, पुणे.