रणझूंझार शत्रुमर्दिनी –
आज अष्टमी. नवरात्रीच्या आरतीत “अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी हो” अशी ओळ आलेली आहे. महिषासुराचा वध करणार्या देवीची उग्र प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते. पण अशी लढव्वयी शत्रुचा शिरच्छेद करणारी योद्धा स्त्री प्रतिमा मात्र कधी डोळ्यासमोर येत नाही. होट्टल (ता. देगलूर जि. नांदेड) येथील मंदिरावर अशा स्त्रीचे शिल्प कोरलेले आहे. हीला “शत्रु मर्दिनी” या नावाने संबोधले जाते. हीच्या डाव्या हातात नरमुंड आहे आणि उजव्या हातात खङग आहे. संस्कृत ग्रंथ “क्षीरार्णव” यात शत्रुमर्दिनी रूपाचे वर्णन आले आहे. या वर्णनाचा दृश्य पुरावा होट्टलच्या मंदिरावर आहे.
अशी शिल्पं मराठवाड्यात धारासुर (ता. गंगाखेड, जि. परभणी) धर्मापुरी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथेही आहेत. या शिवाय लढाउ स्त्रीयांची छोटी शिल्पेही मराठवाडा परिसरांतील मंदिरांवर आढळून आलेली आहेत.
हा परिसर नेमका मातृदेवतांचा आहे. दक्षिणेतील मात्ृसत्ताक समाज व्यवस्थेचे पुरावे आपल्याकडे स्पष्ट दिसून येतात. पैठणचे सातवाहन राजे आईचेच नाव लावायचे (गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र आळूमावी इ.इ.). मामाची मुलगी बायको केली जाते याचाही संदर्भ मातृकुळाशी नातं घट्ट जोडण्याचा आहे.
आपल्याकडे सार्वजनिक संबोधन “ओ मामा, ओ मावशी” असंच आहे. उत्तरेकडच्या पुरूषसत्ताक प्रदेशात हेच संबोधन “ओ चाचा, ओ चाची” असं आहे. दक्षिणेत स्त्रीया केवळ “सुरसुंदरी” नसून आपल्या सर्वांगिण व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंनी झळाळून दिसतात. ही अतिशय वेगळी स्त्री प्रतिमा. अष्टमीला सामान्य स्त्रीच्या रूपातीला झुंजार अष्टभुजेला नमन. (छायाचित्र सौजन्य Vincent Pasmo)
– श्रीकांत उमरीकर