महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,31,285

रास्ते वाडा, पुणे | Raste Wada, Pune

By Discover Maharashtra Views: 1513 4 Min Read

रास्ते वाडा, पुणे –

दारूवाला पुलावरून डावीकडे वळून पुणे स्टेशनकडे जाताना समोर एक भव्य वाडा दिसतो. तो म्हणजे रास्ते वाडा. भव्य प्रवेशद्वार असलेला हा वाडा लांबूनच ओळखता येतो. सदर वाडा तीन मजली असून, छपरावर कौले आहेत. या वाड्याच्या एका बाजूस आगरकर हायस्कूल असून, तिथून अपोलो टॉकीजपर्यंत व मागे के.ई.एम्. हॉस्पिटलपर्यंत वाडा पसरलेला आहे. पेशवाईतील एक प्रमुख सरदार आनंदराव रास्ते यांचा हा वाडा. (रास्ते वाडा, पुणे | Raste Wada, Pune)

गुहागरमधील वेळणेश्वर या गावातील रास्ते यांचे आडनाव पूर्वी गोखले हे होते. आदिलशाहीत या घराण्याचा करवसुली व सावकारीचा व्यवसाय होता. गोखले घराण्याचा प्रामाणिकपणा व सचोटी पाहून त्यांना रास्ते हे नामाभिधान मिळाले. छ. शाहू महाराजांच्या कारकीर्दीत भिकाजी नाईक रास्ते व सदाशिव नाईक रास्ते हे सावकारी व्यवसायानिमित्त साताऱ्यात स्थायिक झाले. त्यांचा शाहू महाराजांशी परिचय होऊन त्यांची छत्रपतींच्या विश्वासू व्यक्तीमध्ये गणना होऊ लागली. काही कालावधी नंतर भिकाजी रास्ते यांची कन्या गोपिकाबाई हिचा विवाह नानासाहेब पेशवे यांच्याशी झाला. भिकाजी यांच्या सात मुलांपैकी मल्हारराव यांना पेशव्यांची सरदारकी मिळाली, ते पेशव्यांच्या घोडदळाचे प्रमुख होते. त्यांच्या नंतर आनंदराव हे सरदार झाले. आनंदराव रास्ते यांनी वाई प्रांतात आपले मुख्य ठाणे ठेवले. वाई येथे महालक्ष्मी, विष्णु, गणपती, काशी विश्वेश्वर, गंगारामेश्वर, पंचायतन ही देवालये, कृष्णा नदीस घाट, धर्मपुरी ही नवी पेठ वसवून ब्राम्हणांना त्यांनी तेथे घरे बांधून दिली. बोपर्डीचा रस्ता व सोनजाईचा मार्ग यांच्या दुतर्फा तीन मैलाच्या परिसरात आंब्याची झाडे लावली. अनंतपूर येथे किल्ला बांधला. याखेरीज नाशिक, त्र्यंबकेश्वर, सातारा, तासगाव, अनंतपूर, अथणी, पंढरपूर, वाल्हे, मांडवगड, तालीकोट येथे वाडे बांधले. सरदार रास्ते यांनी आपल्या पराक्रमाने कर्नाटक व दक्षिणेकडील प्रदेशात आपली घडी बसवली.

पुणे शहराच्या पूर्वभागात सरदार आनंदराव रास्ते यांनी गणेश मंदिर उभारून रास्ता पेठ वसवली आणि भव्य वाडा बांधला. सवाई माधवरावांच्या कारकीर्दीत इ.स. १७७९ ते इ.स. १७८४ या काळात रास्ते वाड्याचे बांधकाम झाले. या बांधकामाला नऊ लाख रुपये खर्च आला. रास्ते वाड्याला भव्य लाकडी प्रवेशद्वार असून प्रवेशद्वाराच्या लाकडी दरवाज्यांवर उठावदार नक्षी कोरलेली आहे. या वाड्याला तीन मजले व दोन चौक आहेत. वाड्याच्या सभोवती तटबंदी असून या तटबंदीच्या लगत तबेले व घोडदळाच्या इमारती होत्या. या वाड्याचे क्षेत्रफळ अकरा हजार चौरस फूट आहे. तत्कालीन इतर मराठा शैलीतील इमारतीप्रमाणेच या वाड्याच्या बांधकामात कलात्मकरीत्या लाकडांचा मोठ्या प्रमाणात चापर करण्यात आलेला आहे.

प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस मुख्य निवासस्थान आहे या इमारतीचेही प्रवेशद्वार भव्य असून त्यावर गणेशपट्टी कोरलेली आहे. आत प्रवेश केल्यावर घडीव दगडांची फरसबंदी असलेला मोठा चौक आहे. चौकाच्या समोर तीन पायऱ्या चढून ओसरीवर डाव्या हाताला शंकराचे देऊळ आहे. या चौकाच्या चारही बाजूंस लाकडी खांब व प्रशस्त ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांना लागून चारही बाजूंनी सोपे, कोठी, माजघर, मुदपाकखाना, जामदारखाना व मोठे भोजनकक्ष होते. या वाड्यात पाचशे लहान-मोठी दालने होती. या इमारतीत दोन जिने व छत्तीस दरवाजे आहेत. ओसरीतील खांब व कडीपाटांना तेलपाणी दिल्यामुळे त्यांची झळाळी आजही उठून दिसते. या वाड्यातील दिवाणखाने भव्य असून या दिवाणखान्यांच्या मध्यभागी सुरूदार खांब आहेत. या दिवाणखान्यांच्या छतावर विविध प्रकारची नक्षी कोरलेली आहे. दिवाणखान्यात काचेच्या हंड्या व छतावर मध्यभागी झुंबरे लावलेली आहेत. दिवाणखान्यांच्या भिंतींना लागून जिने व खोल्या आहेत. दुसऱ्या मजल्यावरील दिवाणखान्यांत पूर्वी कारंजी होती. हा दिवाणखाना पूर्वजांची तैलचित्रे, ऐतिहासिक प्रसंगाची चित्रे, हस्तिदंती व संगमरवरी कोरीव काम केलेली टेवले, दुर्मीळ घड्याळे, तांब्याची शोभिवंत भांडी, इत्यादी वस्तूंनी सजवलेला आहे. पूर्वी या वाड्याच्या भिंतींवर भित्तिचित्रे काढण्यात आली होती. या चित्रांचे अस्पष्ट दर्शन एखाद्या भिंतीवर आढळून येते.येथे असलेल्या दरबार हॉलमध्ये सध्या लक्ष्मीबाई रास्ते विद्यालय असून काही भागात कार्यालये आहेत.

सदर वाडा सध्या फक्त बाहेरून बघता येतो. रास्ते कुटुंबीय आजही या वाड्यात राहतात.

संदर्भ:
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
वैभव पेशवेकालीन वाड्यांचे – मंदा खांडके
पुण्यनगरीतील वाडे व वास्तू – डॉ. एच. वाय. कुलकर्णी
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोवनी
फोटो ०२ : https://ashutoshpotnis.wixsite.com/home/post/rastes

पत्ता : https://maps.app.goo.gl/pEpupXCZWFpniVyW7

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment