एक होतं शिवमंदिर…
अकोले तालुक्यात रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी व अमृतवाहिनी प्रवरेच्या किनाऱ्यावर वसलेल्या रतनवाडी गावातील अमृतेश्वर मंदिर तसं सर्वांच्या परिचयाचं आहे. पण याच रतनवाडी गावापासून अगदी काही अंतरावर, आजमितीस केवळ अवशेषरुपी शिल्लक असलेले एक पुरातन शिवमंदिर अजूनही भक्तांच्या व पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.
रतनवाडीहून साम्रदकडे जाताना रतनवाडी पासून साधारण अडीच किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला एका पुरातन मंदिराचे भग्नावशेष नजरेस पडतात. मंदिर अगदी रस्त्याच्या बाजूलाच आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून आजमितीस केवळ मंदिराच्या गर्भगृहाचा थोडासा भाग शिल्लक आहे. गर्भगृहात शिवलिंग नजरेस पडते.
मंदिराचे अनेक भग्नावशेष आपल्याला परिसरात विखुरलेले दिसतात. मंदिराजवळ काही वीरगळ देखील आपल्या नजरेस पडतात. कदाचित या मंदिराचा अमृतेश्वर मंदिराशी कुठला संबंध तर नसेल… किंवा दोन्ही मंदिराची निर्मिती एकाच व्यक्तीची तर नसेल… अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज जरी अनुत्तरित असली तरी यामुळे या वास्तूचे महत्त्व कांकणभरही कमी होत नाही. आपल्या वैभवशाली संस्कृतीची ओळख असलेला परंतु आज नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला आपला हा ठेवा सांभाळणे आजमितीस जास्त गरजेचे आहे.
रोहन गाडेकर