महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,531

महाराणी सईबाई यांची समाधी व गडकिल्ल्यांच्या विदारक वास्तवाबाबत

By Discover Maharashtra Views: 4605 10 Min Read

महाराणी सईबाई यांची समाधी व गडकिल्ल्यांच्या विदारक वास्तवाबाबत

प्रति,

#महाराष्ट्रातील_तमाम_शिवभक्तांनो….

स्वराज्यप्रेमी, राष्ट्रप्रेमी, गडप्रेमी,इतिहासप्रेमी

महाराष्ट्र वासियानो…

#आवाहनकर्ते:– इडियट ट्रेकर्स ग्रुप यांच्याकडून अंत:करणपूर्वक सविनय सादर

विषय:- आऊसाहेब महाराणी सईबाई यांची समाधी व गडकिल्ल्यांच्या विदारक वास्तवाबाबत…

शिवरायांच्या विचारांच्या मावळ्यांनो…

आपण सर्वाना मानाचा शिवप्रणाम…

छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारस म्हणून आपणास हे पत्र लिहीत असताना, महाराष्ट्राच्या दैदिप्यमान ऐतिहासिक वारशाच्या स्मरणाने एकीकडे अभिमानाने उर भरून आलेला असताना; दुसरीकडे मात्र किल्ल्यांच्या आम्ही पाहिलेल्या सध्यस्थितीच्या विचारानं आमचं शिवप्रेमी मन वेदनेनं पानावून गेलं आहे… म्हणून या पत्रातला शब्द नि शब्द शिवप्रेमाच्या भावनांनी ओतपोत भरलेला तर असेलच; पण महाराजांच्या विचारांनी भारावलेलाही असेल…

हे शिवभक्तानो…

छत्रपतींनी दिलेल्या विचारांच्या आणि आचारांच्या वारशाने प्रेरित होऊन शिवविचारांचा जागर करणारे, शिवप्रेरणेचा प्रचार प्रसार करणारे तुमच्या आमच्यासारखे हजारो मावळे महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात झपाटून काम करत आहेत. महाराजांचं चरित्र, कर्तृत्व, पराक्रम याबरोबरच महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक वस्तू आणि वास्तूची प्रेंरणा, जनमानसात पोहचवण्यासाठी तुम्ही आम्ही तन मन धनाने काम करत आहोत. छत्रपतींच्या नुसत्या जयघोषाने रक्ताच्या थेंबा थेंबात पराक्रमाचं स्फुरण चढणारी तुमच्या आमच्या सारखी तरुणाई ह्या महाराष्ट्रात आजही समाजबांधणी करत आहे. शिवविचारासाठी आजही कोणत्याही प्रकारच बलिदान करायला ही तरुणाई तयार आहे… त्यातलेच आम्हीही काही मावळे…

महाराजांच्या गडकिल्ल्यावर भटकंती करणं, भटकंती बरोबरच महाराजांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणाचा वेध घेणं आणि त्याबरोबरीनचं गडकिल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवणं हा आमच्या ग्रुपचा नित्याचा वसा. या वर्षी हा वसा घेऊन आम्ही राजगड ते तोरणा हा ट्रेक आयोजित केला होता… पायथ्यावरून उंचावर स्थिरावलेल्या उंचच उंच डोगंररागातल्या राजगडाला पाहून महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या रुंदावलेल्या पोलादी छात्या अजूनही तितक्याच रुबाबात उभ्या असल्याचा आम्हाला भास झाला. राजगडाच्या त्या अद्भुत रुपाकडं पाहूनच शौर्याचे भाव आमच्या नसानसात भिनले होते… आणि पावलागणिक भिनतच होते…

हे शिवभक्तानो…

गड सर करताना प्रत्येक पावलावर महाराजांच, मावळ्यांच्या बलिदानाचं, महाराजांच्या कर्तत्वाचं दर्शन आम्हाला होत होतं. उभ्याच उभ्या डोंगरकडा पाहून एवढ्या विस्तृत किल्ल्याची बांधणी करणारे पराक्रमी फक्त महाराजांच्या तालमीतच घडू शकतात याची अनुभूती गडाच्या माच्या आणि बुरुजावरून येत होती. बघता बघता गडावर पोहचण्याला आम्हाला अंधार पडला होता..

याच अंधारात आकाशातल्या ताऱ्यामध्ये भारावलेल्या त्या वातावरणात स्वराज्यासाठी बलिदान करणारे तानाजी, बाजी, मुरारजी यासारखे मावळे पाहत, आम्ही गडावर अनेक गुजगोष्टी केल्या. कोणी पद्मावती मंदिराच्या अंगणात बसलं होतं तर कुनी बालेकिल्ल्याच्या वाटेवरच्या पायऱ्यावर, तर कुणी चोरदरवाज्या कडेच्या बुरुजाकाठी… आणि कुणी पद्मावतीच्या मंदिरासमोरच्या त्या दगडी चबुतर्यावर…!! उद्याच्या शिवतेजानं उगवणाऱ्या शिवरूपातल्या सूर्याची वाट बघत…!

हे शिवभक्तानो…

सूर्य उगवला.. पहाट झाली.. तशी शिवप्रेरणा आम्हा मावळ्यात संचारली आणि आम्ही गड स्वच्छता मोहिमेला सुरवात केली. साफ सफाई करत असतानाच आम्ही पद्मावतीच्या मंदिरासमोरच्या त्या चबुतऱ्याजवळ आलो, ज्यावर मांड्या घालून रात्री काही गड प्रेमींची मैफिल रंगली होती. रात्री ज्या चबूतऱ्याला दगडाचा साधा ओटा समजण्याची चूक करून, त्याकडे फक्त दगड म्हणून पाहणारे गडावरचे आमच्यासकट सर्वच गडप्रेमी सकाळच्या प्रहरात मात्र अनामिक अपराधी भावनेनं अगदी चक्रावून गेले होते. तो चबुतरा ज्याला साधा सुधा दगडाचा ओटा समजण्याची काही लोकांनी चूक केली होती; तो चबुतरा नव्हे तर आऊसाहेब सईबाई महाराणीसाहेबांची समाधी होती ती… याची ओळख पटताच आम्हाला धक्का बसला. त्या समाधीची झालेली पडझड, तिच्या ओळख पटण्याच्या मिटलेल्या खुणा, आणि अनवाणी एकाकी झालेली समाधीची अवस्था पाहून मन विषन्न झालं..

सईबाई….

महाराजांच्या आद्यपत्नी, महाराजांची प्रेरणा, त्यागमूर्ती, स्वराजरक्षक शंभू महाराजांची जन्मदात्री, अवघ्या दोन वर्षांच्या आपल्या पोटच्या गोळ्याला विरहात सोडून ज्या माय माऊलीनं शेवटचा श्वास या गडावर घेतला असेल…ज्या माऊलीनं संकटसमयी महाराजांना याच गडावर आधारच्या बोलांन साथ दिली असेल.. ज्या माउलींन स्वराज स्थापनेच्या संकल्पासाठी आपल्या इच्छा आकांक्षाचा बळी दिला असेल… ज्या माय माऊलीनं बाळ शंभू राजाचं नाहू धुऊ याच गडावर केलं असेल…. ज्या लेकींन जिजाऊ आऊसाहेबांची या किल्ल्यावर सेवा केली असेल… त्याच सईबाई आऊसाहेब आज त्याच गडावर, त्याच स्वराज्यात एवढ्या उपेक्षित भासाव्यात कि, साधा त्यांच्या समाधी जवळ नामफलक लावण्याला सुद्धा त्यांच्या राज्यातल्या सध्य कालीन शासनाला आणि शिवरायांच्या नावानं भांडवल करणाऱ्या भक्तांना वेळ नसावा..! ह्या विचारानं आणि त्यांच्या समाधीच्या नकळत होत असलेल्या विटंबनेच्या जाणिवेनं संताप आणि वेदनांच्या भावना एकाच वेळी आम्हा मावळ्यांच्या मनात निर्माण झाल्या.

हे शिवभक्तानो…

गावागावात, गल्ल्यागल्यात, रस्त्यारस्त्यावर शिवशंभूच्या नावाने राजकारण करणारे राजकारणी, चौक आणि पुतळ्याचा आग्रह धरणारे समाजकारणी किंवा तथाकथित महाराजांच्या फोटोसाठी, झेंडयासाठी दांडा उचलुन झगडणाऱ्या शिवप्रेमींना आऊसाहेबांची, महाराजांच्या गडकिल्याची होत असलेली ही विटंबना व्यथित करत नसावी का??? असा जळजळीत प्रश्न आमच्या मनाला पडला. आपल्या पूर्वजांच्या, आज्या पंज्याच्या समाध्या पर्यटन स्थळासारख्या सजवणाऱ्या श्रीमंत शिवप्रेमींकडे अवघ्या महाराष्ट्राची माय, आजी, पणजी असणाऱ्या सईबाईच्या समाधीला साधा छत्र चामर लावण्याऐवढी दानत नाहीये का?? ज्या शिवशंभुनी गोर गरीब रयतेला न्याय हक्क मिळवून दिले; त्यांच्या कुलराणीना न्याय द्यायला कुणी वालीच नाही का?? ज्या गड किल्ल्याच्या दगड मातीनं शिव शंभू महाराजांचा, त्यांच्या मावळ्यांचा, त्यांच्या पराक्रमाचा पावनस्पर्श झाला त्याच किल्ल्याची भग्न झालेली अवस्था पाहून महाराष्ट्राला चीड कशी येन नाही?? गडांचा राजा राजगड म्हणत असतानाच, त्याची झालेली कंगाल अवस्था पाहून शिवभक्तांना क्रोध येत नाही का??? या व यासारख्या असंख्य प्रश्नाचं वादळ आमच्या मनात घोळत होतं. त्याच वादळातून एका विचारानं आमच्या मनात पेट घेतला….. हे विटंबन थांबलं पाहिजे!!

हे शिवभक्तानो…

सईबाई आऊसाहेबांची हि होणारी हेळसांड थांबली पाहिजे, महाराजच्या अस्मिता असणाऱ्या या गडकिल्ल्यांची वाताहत थांबली पाहिजे.. त्यासाठी या गोष्टी जगासमोर मांडण्याचा संकल्प “इडियट ट्रेक्कर्स ग्रुप” न केला आणि समाधी संबधी एक व्हिडिओ चित्रित केला. Social मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या बरोबरच माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून हा विषय आम्ही जनमानसापर्यत आणि शिवप्रेमीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसा तो तुमच्याकडूनही अपेक्षित आहे. त्या आमच्या प्रयत्नाला आम्हाला दैनिक लोकमत सारख्या वृत्तपत्रांनी, ABP माझा, महाराष्ट्र मॅक्स, जय महाराष्ट्र्र सारख्या वृत्त वाहिन्यांनी मोलाचे सहकार्य केले.

ह्या सर्व बाबी घडत असतानाच, राजगड परिसरातील अनेक व्यक्तींनी आमच्याशी संपर्क साधला आणि एक नवीच माहिती आमच्या समोर आली. महाराणी सईबाई यांची समाधी गडावर नसून ती राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाल गावात आहे अशी राजगड परिसरातील स्थानिक रहिवाशांची आढळ भावना. या नव्या माहितीची शहानिशा करणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी शनिवार दि.०४/११/२०१७ रोजी आमच्यातले काही सदस्य पाल गावी गेले.

हे शिवभक्तानो…

स्थानिक सदस्यांच्या (हनुमान जाधव) यांच्या मदतीने आऊसाहेब महाराणी सईबाई यांच्या पाल गावातल्या समाधीकडे आमच्या ग्रुपचे प्राजक्त झावरे, प्रवीण काळे आणि वेल्हे गावात शिक्षक असणारे अतुल आवटे यांनी प्रस्थान केले.

हे शिवभक्तानो…. तिथली अवस्था तर अत्यंत दयनीय आहे !!!!! वेल्हे गावातून पाल गावाकडे जात असताना डाव्या बाजूला एक अरुंद पायवाट लागली. भातकाढणी झालेल्या शेतातून, रस्त्याचा शोध घेत दोन शेतांतील चिंचोळ्या बांधावरून आणि गुंजवणे नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यावरून जिकरीच्या रस्त्यानं चालत गेल्यावर समोर जे दिसलं ते आमच्या मनाला विदीर्ण आणि क्रोधीत करून टाकणारं होत….. तुम्हालाही ते तेवढंच विदारक वाटेल..

एका शेताच्या कोपऱ्यात चार दिशांना ठेवलेले चार दगड मध्यभागी तीन शिळा आणि वार्यावर हेलकावणारा एक जरीपटका… हीच ती आऊसाहेब सईबाई यांची दुसरी समाधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौभाग्यवती..
सर्जा शंभू राजांच्या मातोश्री सईबाई यांची समाधी.!!

क्षणभर आमचे मावळे निशब्द झाले. कुणाच्याही तोंडून शब्द निघेना.अत्यंत खेदाने ते शिवप्रेमी त्या फडकणाऱ्या जरीपटक्या कडे पाहत राहिले. राजमाता जिजाऊ या शिवरायांच्या प्रथम प्रेरणा होत्या हे निर्विवाद. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा शिवाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबानी दिली हे जितके सत्य तितकेच त्यांची १९ वर्ष साथ करणाऱ्या सईबाई या देखील महत्त्वाच्याच. सईबाई आणि शिवाजी महाराज यांचा सहवास १९ वर्षाचा. हि वर्षे स्वराज्य निर्मितीत अत्यंत मोलाची. या काळात महाराणी सईबाई यांनी शिवाजी महाराजांना अर्धांगिनी म्हणू दिलेली साथ अमुल्य अशीच ठरते.

संभाजी महाराजांसारखा अजेय महापराक्रमी योद्धा ज्यांच्या पोटी निपजला त्या सईबाई महाराणी साहेबांच्या या ठिकाणी असणाऱ्या समाधीचीही तितकीच उपेक्षा? याही ठिकाणी साधा नामफलक सुद्धा नाही. ना कसला डोलारा, ना कसला कसलं शुशोभिकरण… एकाच महाराणीच्या दोन समाध्या असून दोन्हीही उपेक्षित…. त्यांच्याच स्वराज्यात… दोन्ही ठिकाणी जे पाहिलं ते मनाला सुन्न करणारं होतं. आमचा आवाज खरंच शासन दरबाराला, शिवभक्तांना ऐकू येईल का? आमच्या वेदना सर्वांना आपल्याश्या वाटतील का? आपल्याला जे शक्य आहे ते तर नक्कीच करायला हवं असं मानून,गडकिल्ले आणि सईबाई आउसाहेबांच्या समाधीला उर्जित अवस्था देण्यासाठी आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचा निर्धार केला आहे. उद्देश केवळ महाराणी आऊसाहेब सईबाई, आणि महाराजांच्या गडकिल्ल्यांना न्याय मिळावा हाच…

हे शिवभक्तानो….

आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचाराचे पाईक आहोत. ज्या शिवप्रेरनेतून महाराष्ट्रात कालांतराने अनेक व्यक्तिमत्वाची जडणघडन झाली. ज्या महाराजांच्या रयतेच्या राज्याच्या संकल्पनेतून अनेक संघर्ष गाथा आणि सहर्ष पुरुष जन्माला आले.. ज्या महाराजांनी अवघ्या जगाला न्यायाच्या राज्याची आदर्शवत संकल्पना दिली … त्याच छत्रपतींच्या किल्ल्यांची आणि सईबाई आऊसाहेबांची होत असलेली ही उपेक्षा थांबण्यासाठी, महाराजांच्या वारशाचं अद्ध:पतन रोखण्यासाठी, छत्रपतीच्या पराक्रमी इतिहासाला गडकिल्ल्यातून जिवंत ठेवण्यासाठी, आपण शिवविचारांच्या शिवप्रेमीनं रान उठवून शासन दरबारात आणि आणि नसेल तिथेही होत तर स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन महाराजांच्या इतिहासाचं संवर्धन करण्यासाठी आवाज उठवण्याचं काम हाती घ्यावं; आम्ही तर महाराजांचे मावळे म्हनून जीवाचं रान करून संघर्षाला प्रारंभ केला आहे. रक्ताचं पाणी करून या मोहिमेसाठी आमचे मावळे काम करत आहेत… शिवरायांना मानणाऱ्या संबंधित सर्व राजकीय पुढार्यांना, संघटनांना, आणि दस्तुर खुद्द मुख्यमंत्र्यादेखील पत्रव्यवहार सुरू आहे…

करीता आमच्या नव्हे; तर संबध महाराष्ट्राच्या भावना जडलेल्या सईबाई आऊसाहेब व गडकिल्याच्या संवर्धनासाठी आपण सर्वानी मिळून पाऊल उचलुन आमच्या या मोहिमेत आम्हाला साथ द्यावी..हि शिवप्रेमी, शंभू प्रेमी, सईप्रेमी, स्वराजप्रेमी म्हणून आपणाकडे मनोभावे कळकळीची विनंती आहे….

गड किल्ले हीच महाराष्ट्राची, महाराजांच्या इतिहासाची, तरुणाईच्या प्रेरणेची ताकत आहे.. त्या ताकदीला महाराष्ट्रवासीयांकडून बळ मिळावं..हिच अपेक्षा..

ही अस्मितेची लढाई आहे.. तुमच्या आमच्या आणि प्रत्येकाच्या

-आपलेच मावळे-
दादासाहेब ,श्री किसन थेटे ,प्राजक्त झावरे पाटील, प्रवीण काळे पाटील
Leave a Comment