शहाजीराजेंची सुटका…
राजमाता जिजाऊ ग्रंथमाला भाग १७…
शहाजीराजांच्या अटकेने जिजाऊंना अत्यंत दुःख झाले होते.राजांना सोडवण्याच्या चिंतेत जिजाऊ होत्या.तेवढ्यातच अदिलशहाचा सरदार फत्तेखानाने जेजुरीजवळील बेलसर गावी कर्हा नदीच्या काठी तळ दिल्याच्या बातम्या आल्या. शिवाजीराजांनी पुरंदर किल्ल्यावर संभाजी कावजी कोंढाळकर यास रवाना केले. शिवरायांचे वय लहान होते. अशाही परिस्थितीत जिजाऊ गोंधळून न जाता संकटकाळी शिवरायांच्या मागे भक्कमपणे उभा राहिल्या. फत्तेखान, मुसेखान व बाळाजी हैबतराव हे विजापूरचे सरदार सगळीकडे संचार करू लागले. बारा मावळातले अठरा पगड जातीचे तीन-चार हजार मावळे पुरंदरला एकत्र जमले. प्रत्येकजण शत्रूच्या विरोधात लढण्यासाठी तयार होता. या सर्वांचे नेतृत्व करत होते शिवाजीराजे व त्यांच्या पाठीमागे उभ्या होत्या त्यांची माता जिजाऊ साहेब.शहाजीराजेंची सुटका.
शिवरायांना लढाईचा फारसा अनुभव नव्हता ; परंतु त्यांची जिद्द, लढाईचा अभ्यास , जिजाऊंची शिकवण यांच्या जोरावर ते रणांगणात उतरले होते .आदिलशहाने फत्तेखानाबरोबर भरपूर सैन्य व साधने पाठवून दिली होती. शिवाजी महाराजांकडे अवघे अशिक्षित, अनुभव नसणारे तीन – चार हजार मावळे होते. शहाजीराजे आदिलशहाच्या कैदेत असल्यामुळे कोणतीही मदतीची साधने त्यांना मिळणार नव्हती. शिवरायांनी आपल्या आईशी खलबत करून फत्तेखानाच्या सैन्याचा अंदाज घेतला व गनिमीकाव्याचा डाव रचला.
शिवाजीराजांचे जिजाऊंनी शिकवलेले डावपेच वेगळेच होते. शिवाजीराजांनी दुसऱ्या दिवशी कावजी मल्हार यास सुभानमंगल किल्ल्यावर पाठवले .कावजी मल्हारने मोठ्या युक्तीने अदिलशहाचे सरदार हैबतरावांच्या छातीत टोकदार भाला खुपसला.बाळाजी हैबतराव पडल्याबरोबर त्याचे सैन्य सैरावैरा पळू लागले. किल्ल्यावरील खजिना, शस्त्र, सामान , हत्ती, घोडे कावजी मल्हारने पुरंदरला पाठवले. बाजी पासलकरांनी छावणीवर हल्ला चढवला .तेव्हा फत्तेखानाची धांदल उडाली.
शिवाजीराजे सुभानमंगल गडावर अडकलेले पाहून खानाने पुरंदरावर हल्ला चढविला .
फत्तेखानाने आपल्या सैन्यासह पुरंदरच्या पायथ्याशी प्रवेश केला. सैन्याने गडावर प्रवेश केल्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगड-धोंडे आणि बाणांचा वर्षाव करून खानाच्या सैन्याला पिटाळून लावले. त्याच वेळी शिवाजीराजांनी किल्ल्याचा दरवाजा उघडला आणि मावळे खानाच्या सैन्यावर तुटून पडले. या युद्धाच्या गोंधळात फत्तेखानाचा सेनापती मुसेखान खाली कोसळला. गोदाजी जगताप यांनी मुसेखानाला ठार मारले .मुसेखान पडल्यानंतर त्याचे सैन्य जीव घेऊन वाट दिसेल तिकडे सैरावैरा पळू लागले. शिवरायांच्या मावळ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ठार मारले. शिवरायांनी जिंकलेले हे पहिले युद्ध होते.
या पहिल्या युद्धाने जिजाऊ व शिवराय सुखावले ; परंतु या युद्धात अनुभवी प्रामाणिक आणि पराक्रमी बाजी पासलकर कामी आले . त्याचे दुःख शिवरायांना अस्वस्थ करत होते. खानाविरुद्ध मोठी लढाई राजांनी जिंकली होती, परंतु बाजी पासलकर यांच्या मृत्यूने या विजयाला गालबोट लावले. शिवरायांवर सावली धरणारा वटवृक्ष आकस्मितपणे उन्मळून कोसळला होता.
फत्तेखानाच्या पराभवाने राजे विजयश्री घेऊन जिजाऊंना भेटायला राजगडावर आले .फत्तेखानाचा पराभव ही केवढी मोठी आनंदाची गोष्ट होती. परंतु शहाजीराजांच्या काळजीने जिजाऊंचे मन कातर झाले होते. या पराभवाने आदिलशहा शहाजीराजांना काही त्रास देईल का? या विचाराने जिजाऊ मासाहेब बैचेन झाल्या होत्या .शिवाजीराजांनाही आपल्या वडिलांबद्दल तिच चिंता सतावत होती. एवढ्यात एका खबरेने सर्वांचे मन आनंदले .बंगळुरास शिवाजी राजांचे वडिल बंधु संभाजीराजांनी फरदिखानाचा पराभव केला. या बातमीने राजांना आनंद झाला व युक्तीही सापडली.आता बळापेक्षा युक्तीचाच वापर अधिक आवश्यक होता. शिवाजीराजांनी शहाजी राजांच्या सुटकेसाठी अजब आणि अचूक युक्ती काढली. मोगलांचा स्नेह संपादन केला तर त्यांच्या प्रभावामुळे आपल्या पित्याची सुटका होईल ,असे शिवाजी महाराजांना वाटले. त्यानुसार त्यांनी आपले वकील दक्षिणेचा मोगल सुभेदार शहजादा मुरादबक्ष त्यांच्याकडे पाठवून दिले आणि त्यास विनंती केली की, शहाजी महाराजांच्या पूर्वीच्या कृत्याबद्दल मोगल बादशहाने त्यांना क्षमा करावी आणि त्यांना व त्यांच्या पुत्रास आपल्या चाकरीत घ्यावे .
शहाजी राजांच्या सुटकेसाठी विजापूरच्या शहाला दिल्लीला शह देण्याची ही राजांची मुत्सद्देगिरी खरोखरचा अजब आणि अचाट होती. दिल्लीच्या शहाजहान बादशहाचा शहजादा मुरारबक्ष हा औरंगजेबाचा भाऊ होता. राजांनी वरील आशयाचे पत्र त्वरित मुरादकडे रवाना केले.यावेळी शिवरायांचे वय होते अवघे १८ वर्षे.परंतु आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी शिवाजीराजे मोगलांना गोड बोलत होते. शहाजहान शिवाजीराजांचे कर्तुत्व चांगलेच ओळखत होता आणि शिवाजीराजे यांचा प्रत्यय फत्तेखानाच्या लढाईत आलेलाच होता.अशी पिता-पुत्रांची पराक्रमी जोडी आपल्या राज्यात आल्यास दक्षिणेतील दौलत मोगलांना मिळवायला मोठेच पाठबळ मिळेल, अशा विचाराने शहाजहान व मुरारबक्षला खूपच आनंद झाला.
शहाजीराजे भोसले यांच्या शिवाजीने दिल्लीशी भयंकर पाताळयंत्री कारस्थान बांधून वडिलांच्या सुटकेसाठी विजापूरच्या दरबारात मोठी मोगली आफत आणण्याचा घाट घातला आहे. अशी कुणकुण विजापूरी दरबाराला लागली. शहाजीराजांचे निमित्त करून दिल्लीचा शहाजहान आपल्याला सतावणार, हे दरबारास उघड दिसू लागले .
आदिलशहा हा शिवरायांच्या राजकारणाने पुरता भांबावला होता. आता या पेचातून अब्रुनिशी कसे सुटायचे ? जर शहाजीराजांना सजा फर्मावयाची, तर मोगलांचे भय शिवाजीराजांनी उभे केले आहे. जर शहाजीराजांना तुरुंगातून सोडावे तर दरबारची इभ्रत जाते आहे.आता काय करायचे ? शिवाजीराजांवर पुन्हा फौज पाठवायची सोयच नाही. शिवाजीराजे कसे आहे ते फत्तेखानाला चांगलेच समजले होते. आता तर मोगलही धावतील त्याच्या मदतीला. बादशहाचे सर्व सल्लागार जास्तीत जास्त विचार करू लागले. शिवाजी राजांनी परस्पर दिल्लीच्या मिशा पिळून विजापूरला आव्हान दिले होते.
पुढे आणखी थोडासा उभयतांचा पत्रव्यवहार होऊन असे ठरले की ,शहाजीराजांना पूर्वीची मनसब व शिवाजीराजांना पाच हजारी मनसब मोगल बादशहा देतील. एवढेच नव्हे तर मुरादबक्षने विजापूरला कैदेत असणाऱ्या शहाजीराजांकडे जे पत्र पाठवले आणि कळवले की, आपण लवकरच दिल्लीला जात आहोत. तेव्हा बादशहाकडून जुन्नर व अहमदनगरची देशमुखी मिळावी, अशी विनंती शिवाजी महाराजांनी मुरारबक्षकडे पाठवली होती.
मोगलांशी सुरू केलेल्या महाराजांच्या राजकारणाचा आदिलशहावर निश्चितच परिणाम झाला असावा. कारण शहाजीराजांना दीर्घकाळ कैदेत ठेवून अथवा ठार करून आदिलशहा दिल्लीपतीला दुखवू शकत नव्हता.बादशहाने शहाजीराजांना हत्ती ,घोडे, वस्त्रालंकार दिले. हे पाहून दरबारातील मत्सरी जळफळले.सर्वांनाच आश्चर्य वाटले.
शहाजीराजांची सुटका होण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झालेली घटना म्हणजे त्यांच्या दोन्ही पुत्रांनी जहागिरीच्या जप्तीस आलेल्या फौजांचा केलेला पराभव ही होय. कर्नाटकातील बंगळूरच्या किल्ल्यावर आदिलशहाने फरादखान व तानाजी डुरे यांच्या हाताखाली फौज देऊन स्वारी पाठवली होती.या फौजेस शहाजीपुत्र संभाजी राजांनी मोठ्या पराक्रमाने तोंड देऊन पराभूत केले आणि पळवून लावले होते.
अशाप्रकारे शहाजीपुत्र संभाजी राजे व शिवाजीराजे या दोघांकडूनही आपल्या फौजा पराभूत झाल्याचे पाहून आदिलशाही दरबारापुढे शहाजीराजांना मुक्त करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. यावेळी शहाजीराजांना ठार केले असते तर उभय बंधूंनी कर्नाटक व महाराष्ट्र येथे मोठी धामधूम माजवली असती, आणि मोगल बादशहाची त्यांना सक्रिय सहानभूती मिळाली असती. हे संकट ओढवून घेण्यापेक्षा आदिलशाही दरबारने सुज्ञपणे शहाजीराजांना माफ करून काही अटीवर शहाजीराजेंची सुटका करण्याचे ठरवले.
कर्नाटकातील बंगळूर व कदर्पी ही ठिकाणे आणि महाराष्ट्रातील कोंढाणा हा किल्ला शहाजीराजांच्या पुत्रांनी आदिलशाही सरकारला परत करावा,अशा ह्या अटी होत्या.आपल्या पित्यासाठी दोन्ही पुत्रांनी या अटी स्वीकारल्या आणि त्याप्रमाणे ही ठिकाणे आदिलशहाच्या ताब्यात दिली.१६ मे १६४९ रोजी शहाजीराजांची अदिलशहाच्याु कैदेतून सुटका केली .
कदर्पी, कोंढाणा आणि बेंगलूर या किल्ल्यांच्या मोबदल्यात शहाजीराजांची निर्दोष सुटका झाली होती. कोंढाणा किल्ला देऊन टाकल्यामुळे शिवाजीराजांना फारच दुःख झाले होते. जिजाऊंची मनस्थिती अत्यंत दोलायमान झाली होती. एकीकडे पराक्रमी पुत्राचे स्वप्न पुसले जात होते, तर दुसरीकडे सौभाग्याचा नाश होणार होता .तेव्हा जिजाऊंनी आपल्या पराक्रमी पुत्राला सल्ला दिला होता की,आदिलशाहीला दिलेला किल्ला पुन्हा पराक्रमाने परत घेता येईल ,पण आपल्या पित्याच्या जिवास धोका होता कामा नये. त्यामुळे शिवरायांना हा निर्णय घेणे सोपे गेले होते. अशा रीतीने आदिलशाहीच्या कैदेतून शहाजीराजेंची सुटका झाली.