प्राचीन मंदिराचे अवशेष, अंकाई, ता. येवला –
अहमदनगर कडून शिर्डी-येवला मार्गे मनमाडला राज्यमार्ग जातो. या मार्गावर येवला आणि मनमाडच्या मध्ये प्रसिद्ध अंकाई-टंकाई चे जोडकिल्ले उठावलेले आहेत. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. अंकाई टंकाई हे जोड किल्ले शिवपूर्वकाळापासून अस्तित्वात आहेत. अंकाई किल्ल्याचा ज्ञात इतिहास हा यादव काळापासून सुरू होतो. शके ९७४ साली श्रीधर दंडनायक हा अंकाई किल्ल्याचा द्वारपाल होता, अशी नोंद सापडते. तसेच यादव काळात अंकाई किल्ल्याचा उल्लेख एककाई दुर्ग असा येतो.प्राचीन मंदिराचे अवशेष, अंकाई.
अंकाई गावातून पुरातत्व विभागाने बांधलेल्या पायऱ्यांवरून चढाईला प्रारंभ केल्यानंतर थोड्या चढाईनंतर टंकाई किल्ल्याच्या डोंगराच्या पोटात असलेला जैन लेणी समूहाच्या अगोदर डाव्या बाजूला काटेरी झुडपात आपल्याला एका भग्न मंदिराचे अवशेष दिसून येतात. मंदिराच्या बहुधा सभामंडपाचा हा भाग असावा. सभामंडपातील केवळ स्तंभ आजमितीस शिल्लक आहेत. पुढे एक कमान आपल्याला दिसून येते. स्तंभ कोरीव कामाने युक्त असून त्यावर कीर्ती मुखाचे अंकन केलेले आहे. हे बहुधा यादवकालीन शिवमंदिर असावे. मंदिराला चुन्याचा गिलावा केलेला आपल्याला दिसून येतो. अंकाई गडावर पर्यटकांची तशी नेहमीच वर्दळ असते पण यादवकालीन वैभवाची साक्ष असणारी ही वास्तू मात्र आज उपेक्षित आहे.
Rohan Gadekar