महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,769

खानदेशातील भिल्लांचे हक्क

Views: 3746
7 Min Read

खानदेशातील भिल्लांचे हक्क –

खानदेशातील भिल्ल या विषयावर गोविंद गारे यांचे पुस्तक आहे. सखोल अभ्यास केला आहे.

खानदेशातील भिल्लांचे उठाव असे डॉ.सर्जेराव भामरे यांचेही पुस्तक आहे. पण कॅप्टन ब्रिग्जने जे सखोल अभ्यास आणि भिल्लांबद्दल काम केले आहे त्यांचा आढावा नंतरच्या लेखात घेईनच, पण सध्या खानदेशातील भिल्लांचे हक्क काय होते आणि त्यामुळे त्यांच्यात झालेल्या बदलामुळे त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले आणि परिणामही काय झाले याचीही चर्चा नंतरच्या लेखात करीन सध्या सरंजामशाही सुरु असतांना खानदेशातील रयतेवर काय परिणाम झाले याचा विचार करतांना भिल्लांवर काय परिणाम झाले आणि काय परिस्थिती होती याचाच विचार केला आहे.

भिल्लांचा हक्क थोरले बाजीरावाच्या काळापासून चालत आला होता तो म्हणजे  खानदेशातील भिल्लांना चोपडा, अडावद, रावेर तसेच धुळे, भडगाव,  बहाळ, उत्राण, मेहुणबारे , चाळीसगाव परगण्यांच्या जमिनदारांना पाठवला होता. तो म्हणजे महालातील जकातीचा चौथा हिस्सा वसुलीचा हक्क दिला होता. परंतु पेशवे नानासाहेब यांनी तो जप्त केला आणि परगण्यातील जमिनदाराकडे सोपवला.

भिल्लांचा हक्क दर गावास दर राऊतास दाणे केली, एक डोले, उसाच्या मेरीस गुळाची एक भेली दर एक गावास एक रुपया, दर गावास, एक बकरे गावातील कारागिरांच्या कडून जोडा जुता, व पासोडी या प्रमाणे चालत असे.

खानदेशातील रयतेस लुटमारीचा वारंवार उपद्रव होई (ही लुट आणि उपद्रव ते का करीत याची चर्चा आधीच्या काळातील घडलेल्या घटनांमध्ये दडलेली आहे. त्याविषयी पुढच्या लेखात)

त्यासाठी रयतेच्या रक्षणासाठी जबाबदारी भिल्लांवर सोपविण्यात आली आणि त्यांनी गावगन्ना जागल करावी व मुलूखात दंगा करणार नाही  असा करार भिल्लांशी थोरल्या बाजीराव पेशव्यांचे काळात पेशव्यांनी नायकांशी केला होता. भिल्लांनी रानात व डोंगरात केलेल्या हट्टया मोडाव्यात,हत्यारे तसेच तलवार बंदूकी बाळगू नये तीर व कामठा जागल्यासाठी वापरावे.

लाखेचा लखोटा गळ्यात सरकारच्या मोहोरचा बाळगावा व मोहरेचा लखोट्याशिवाय जे भिल्ल होते त्यांचे पारिपत्य करण्यासंबंधी करार पेशव्यांनी केला होता. खानदेशातील जामनेर, शेंदुर्णी, चाळीसगाव, पाचोरे,  मेहुणबारे, बहाळ, भडगाव, उत्राण, येथील जमिनदार व मुकादमास हे पेशव्यांनी लखोटा आणि जागल्याविषयी कळवले होते.

वतनदारांचा जनतेवरील जुलूम आणि सरकारशी बेइमानी –

देशमुख, देशपांडे, जमिनदार शत्रूशी हातमिळवणी करून त्यांच्या दुष्कृत्यात सामील होत अशी उदाहरणे जागोजागी सापडतात. इ.स. २७६४-६५ मध्ये यावर्षी देशमुख व देशपांडे यांनी मोगलांच्या दंग्यात मनासारखी खंडणी वसूल केली.काही मुघलांना दिली.बाकी सरकारकडे न देता स्वतःकडे ठेवली. बऱ्हाणपूर येथील मिठाराम सोनार यांजकडून  वतनदार धर्माजी गोपाळ यांनी सातशे रुपये जबरदस्तीने घेतले तर काही परगण्यातील शेटे महाजन यांनी खंड घेतले, देशमुखांनी लोकांची घरे लुटून हजारो रूपये घेतले, या सर्व पेशव्यांकडे आलेल्या तक्रारीतून ही माहिती कळते.

यातील काही उदाहरणे महादजी शिंदे यांच्याकडील वतनदार निंबाजी देवजी देशपांडे यांनी शामाबाईला पाहुण्यांच्या स्वयंपाकास ठेवली होती, तिची अब्रू घेतल्याने तिने जीव दिला. एदलाबाद परगण्यातील मौजे चांगदेव येथील मल्हार दिनकर चाकणकर देशपांडे होता त्याने पांड्या गुजराती ब्राम्हणांच्या बायकोशी बदकर्म केले आणि मारेकऱ्यांना  तिच्या पतीस ठार करण्यास पाठवले.

बागलाणकर देशमुख वतनदाराने परगण्याचा गावात दंगा करून रयतेवर जुलूम जबरदस्तीने केल्याचे पुरावे आहेत. अशा तक्रारी अहिल्याबाई होळकर यांच्याकडे सुध्दा आलेल्या आहेत.

सरंजामी समाजातील अलुतेबलुतेदारांचा वर्ग –

ग्रामिण जिवनात बलुतेदार पध्दत रूढ होती.  अलुतेदार आणि बलुतेदार  असे दोन वर्ग होते. यातील महार, मांग, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, कोळी यांना बलुतेदार म्हणत तर तेली, तांबोळी, साळी, शिंपी, माळी, गोंधळी,भाट, गोसावी, भोई, यांना अलुतेदार म्हणत. सरकारची सेवा करणाऱ्यांना बलुतेदार यांना जमिनी इनाम मिळालेल्या होत्या. शिवाय शेतकरी व गावातील दुकानदार व मोहतर्फा लोकांच्या कडून सेवेच्या मोबदल्यात वस्तूंच्या स्वरूपाने हिस्सा मिळत असे. बलुतेदार यांना गावातील शेतकरी आणि वतनदारांची काम करावी लागत. त्याचा मोबदला शेतकरी धान्याच्या बलुता ठराविक हिस्सा देत असत.गावाच्या शिवेच्या आतील संरक्षण व चोरांना पकडण्याची, तपास करण्याची जबाबदारी त्यांचीच असे.

जमिन महसूल गोळा करण्याचा कामात पाटील, कुलकर्णी यांना मदत महारांची असे. गावातील न्यायनिवाडा करतांना त्यांची आणि इतर बलुतेदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण असे. गावात एखादे जनावर मरून पडले तर त्यांनाच बाहेर न्यावे लागे. गावातील मृत व्यक्तीच्या सरणासाठी लाकूड त्यांनाच  स्मशानभुमीवर वहावे लागे.

गावातील सुतार, चांभार, कुंभार, लोहार, हे शेतकरी लोकांना शेतीची अवजारे व साहित्य पुरवत. उदाहरणार्थ चांभाराने मोट बनवायच, तर मांगाला मोट दुरूस्तीची कामे, सुताराने लाकडी अवजारे दुरूस्ती अवजारांची कामे, लोहार लोखंडी अवजारे व मोबदला धान्यात बलुत्याचा हिस्सा  असे.

खेड्यातील न्यायनिवाडा करतांना वरील बलुतेदारांचा वर्ग साक्षीला असे.  न्याय निवाड्याच्या पत्रावर ज्याला “महजरवर” असा शब्द आहे.वतनदारांप्रमाणे प्रत्येक बलुतेदाराची खूण अथवा शिक्का असे. जसे की पाटील नांगराची खूण,कुंभाराचे चाक, चांभाराची आरी, न्हाव्याचा आरसा, सुताराचे हत्यार, सोनाराचा हातोडा, व महाराची काठी इत्यादि चिन्हे कोरलेली असत.

सरंजामी समाजात बलुतेदार समाज इतर वर्गांशी आर्थिकदृष्ट्या संबधित असे. परंतु बलुतेदार याच्या वस्तूला तत्कालिन व्यवस्थेत मुल्य नव्हते. जसे की चांभाराचा जोडा, मांगाचा दोरखंड, कुंभार, सुतार यांच्या कलाकुसरीच्या वस्तू समाजातील सरंजामदार, वतनदारांचा किंवा इतर उच्च वर्गातील लोक अहोरात्र सेवा घेऊन अल्पसा मोबदला देत की त्यात पोटही भरत नसे आणि उपासमार होई. त्यामुळे या वर्गाची चैन ही या कष्टकरी लोकांवर अवलंबून होती.

या मध्यमयुगीन कालखंडात अजून एक पध्दत (अमानविय) रूढ झालेली दिसते ती म्हणजे वेठबिगारी ही होय. सरंजामी समाजजिवनाचा अतूट घटक म्हणता येईल. ही पध्दत खानदेशातील जिवनाचा भाग झाली यात नवल ते काय!

खानदेशातील सरंजामदार,वतनदार,मोकाशी लोक गावातील शूद्र व अतिशूद्र आणि गरीबांना बिनावेतन सेवा अथवा ज्याला “वेठ” घेत असत. ज्याला वेठबिगारी म्हणत. जसे की सुतार, महार, मांग, चांभार, इतरांना रानातील गवत कापून रानातील लाकडाची तोड करणे, गावाची जागली करणे, किल्ल्याचे संरक्षण करणे, डोक्यावर ओझे वहाणे इत्यादी कामे विनामूल्य करावी लागत.

इ.स. १७६३-६४ मध्ये परगणे वणीदिंडोरी महालातील कुराणातील गवत काढण्यासाठी दोन लाख पन्नास हजार गवताच्या पेंड्या कापण्यासाठी हजार बिगारी पाठवावे म्हणून पेशव्यांनी कमसिनदारास आज्ञा केली होती. गावचा कुलकर्णी, वतनदार यांच्या शेतात कुणबी ठेवून वेठबिगारी घेत. गावात पाण्याचा बंधारा बांधणे, अंगमेहनत असलेली कामे यांच्याकडून करून घेत. त्यामुळे बरेचदा वेठबिगारी ला कंटाळून गावातील लोख मशागत न करता गावची लावणी सोडून देत. गावे ओसाड होत.

अशा समाजाला स्वयंपूर्ण म्हटले आहे तरी परस्परावलंबी आणि शोषणावर आधारीतच ही व्यवस्था होती. ती इतकी घट्ट रूजली होती नव्हे आहे की हे शोषण आणि मानवी जिवनात अन्यायी आहे हे लक्षातच येत नाही. आले तरी पगडा इतका घट्ट आहे ज्यामुळे खरी मानवी उत्क्रांती भारतीय समाजात होऊ शकली नाही हे दुर्दैव म्हणण्यापेक्षा घट्ट मगरमिठीतून बाहेर पडण्याच्या दृष्टीने तोकडे प्रयत्न झाले असेच म्हणावे लागते.

संदर्भ –

पेशवा डायरीज खंड २,३,४,५,६,७,८,९
पेशवे दप्तर संपादक गो.स. सरदेसाई खंड १०,२२,२५,३९
होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग १,२
ऐतिहासिक पत्रव्यवहार गो.स. सरदेसाई व काळे
चंद्रचूड दप्तर
पेशवे कालीन महाराष्ट्र, वा.कृ.भावे
ऐतिहासिक मराठी साधने संपादक ग.ह. खरे

Leave a Comment